दिनांक २७ ऑक्टोबर २०२४, श्रीगोंदा:
महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट) पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली असून, या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) कडून सौ. अनुराधा राजेंद्र नागवडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागवडे या मशाल हाती घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरणार असून, त्यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीला एक नवा जोम मिळण्याची शक्यता आहे.
सौ. अनुराधा नागवडे या उद्या, दिनांक २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:०० वाजता महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरण्याच्या या प्रक्रियेत नागवडे यांच्या समर्थकांमध्ये उत्साह दिसून येत असून, त्यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिवसेनेचे उपनेते साजनभैय्या पाचपुते यांनी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अर्ज भरण्याच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. नागवडे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी शक्तीप्रदर्शनाची शक्यता वर्तवली जात असून, या वेळी त्यांच्या समर्थकांची मोठी उपस्थिती आणि मिरवणूक होण्याचा अंदाज आहे.
शिवसेना (ठाकरे गट) आणि महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये नागवडे यांच्या उमेदवारीबाबत उत्साहाचे वातावरण आहे.
स्रोत:(अधीकृत माहितीनुसार)




