दिनांक ३ एप्रिल (रायगव्हान,श्रीगोंदा):
तालुक्यातील रायगव्हाण येथील भानुदास भाऊ वराळे यांच्या शेतामध्ये बिबट्याची पिल्लं आढळली असून, अनेक दिवसांपासून बिबट्याचा येथे वावर असल्याने रायगव्हाण मधील लोक दहशतीखाली वावरत आहेत. वीज रात्री उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना रात्री उशिरा घराबाहेर पडावे लागत असल्यामुळे सर्व सामान्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. सदरील परिस्थिती पाहता, तातडीने रायगव्हाण गावामध्ये पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने वन विभागास निवेदन देऊन करण्यात आली आहे.

काही दिवसांपासून रायगव्हाण शिवराममध्ये बिबट्याचा वावर वाढत आहे. वारंवार या श्वापदास पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी होत आहे. एकीकडे वन खाते पिंजरा लावन्यासाठी उदासीन दिसत आहे. तर, वीज वितरण कंपनी शेतीसाठी दिवसा लाईट देण्याऐवजी रात्रीची लाईट देत असल्याने शेतकऱ्यांना शेतीला रात्रीचे पाणी देण्यासाठी जीव मुठीत धरून बाहेर पडावे लागत आहे. अश्या कारभारामुळे बिबट्याची दहशत वाढली असून, सर्व नागरिक भयभीत झाले आहेत.(Shrigonda… An atmosphere of fear in Raigavan after finding leopard cubs.)
रायगव्हाण शेजारील माठ, राजापुर, म्हसे गावामध्ये काही दिवसांपूर्वी २ ते ३ बिबटे वनखात्याने पकडलेली आहेत. आत्ता या भागातील ऊस मोठ्या प्रमाणात कारखान्यासाठी तुटून गेला असल्यामुळे अश्या वन्यजीवांना लपण्यासाठी जागा राहिली नाही. यामुळे बिबट्यांचा मानवी वस्तीकडे वावर वाढत चालला आहे. भाऊसाहेब वराळे यांच्या शेतामध्ये उसाची तोडणी चालू असतांना ऊस मजुरांना बिबट्याची पिल्ले दिसली. बाजूलाच बिबट्याची मादी सुद्धा दिसून आल्याने आता गावातील नागरिकांनी आक्रमक होऊन तातडीने बिबट्यासाठी पिंजरा लावण्याचे वनखात्याला कळवलेले आहे.

यावेळी रायगव्हाण गावचे (सरपंच) संजय रिकामे, (कुकडीचे संचालक) बाळासाहेब पठारे, (माजी.चेअरमन) मोहन हार्दे, (माजी सरपंच) गोवर्धन हर्दे, गणेश शिंदे, रोहिदास कदम, सागर भानुदास वराळे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
स्रोत:(अमोल बोरगे, ढवळगाव)
