दिनांक ५ जुलै २०२५, श्रीगोंदा :
श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव रोडवरील इनामदार वस्ती येथे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने मोठी कारवाई करत सुगंधी गुटख्याचा साठा व वाहन जप्त करत ११ लाख ५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे या कारवाईत मुख्य आरोपी रवी बबन दळवी याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

या विशेष कारवाईचे नेतृत्व पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी केले. पथकाने इनामदार वस्तीतील एका घरावर छापा टाकून सुगंधी RMD व सुगंधी विमल गुटखा भरलेला छोटा हत्ती टेम्पो आणि घरात साठवलेला गुटखा असा एकूण ५ लाख ५५ हजार ६०० रुपयांचा गुटखा व चार चाकी वाहन असा एकूण ११ लाख ५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सदरील कारवाई श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली असून पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे (अहिल्यानगर) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. गुटखा विक्रीसारख्या अवैध धंद्यांवर पोलिसांकडून सातत्याने लक्ष ठेवले जात असून ही कारवाई त्याचाच एक भाग आहे.

पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, श्रीगोंदा तालुक्यात जर कुठेही अवैद्य वेश्या व्यवसाय, गुटखा विक्री, दारू/ताडीची विक्री, गांजाचा व्यापार, बिंगो सारखे अवैध प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले, तर तत्काळ पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना याबाबत माहिती द्यावी. अशा कारवाया पुढील काळातही अधिक तीव्रतेने राबविण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

स्रोत:(अधिकृत माहिती)

