दिनांक ५ जून २०२५, श्रीगोंदा/पुणे :
“माझी जगण्याची इच्छा संपली आहे” असा हृदयद्रावक मजकूर असलेली चिठ्ठी ठेवून एका २५ वर्षीय आयटी अभियंता तरुणीने हिंजवडीतील ‘द क्राऊन ग्रीन’ सोसायटीच्या २१व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे (वय २५, रा. हिंजवडी, मूळगाव श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

ही घटना ३१ मे रोजी पहाटेच्या सुमारास घडली असून, तिच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांवर व जवळच्या मित्रमैत्रिणींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आयटी क्षेत्रातील तणाव आणि मानसिक आरोग्याच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा चर्चेचे वळण लागले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिलाषा सेनापती बापट रस्त्यावरील एका खाजगी आयटी कंपनीत नोकरी करत होती. तिच्या हिंजवडीतील एका मैत्रिणीच्या’ द क्राऊन ग्रीन सोसायटीमध्ये ती अधूनमधून येत होती. ३१ मे रोजी पहाटे अभिलाषा सोसायटीत आली, मात्र मैत्रिणीकडे न जाता तिने लिफ्टने थेट २१व्या मजल्यावर प्रवेश केला आणि काही क्षणांतच तिने तिथून उडी मारली.

सकाळी सोसायटीतील रहिवाशांना तिचा मृतदेह आवारात आढळून आला. त्यांनी तत्काळ हिंजवडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तिची दुचाकी सोसायटीच्या पार्किंगमध्ये आढळली. त्यावरून तिची ओळख पटवण्यात आली.

घटनास्थळी मिळालेल्या चिठ्ठीत अभिलाषाने “माझी जगण्याची इच्छा संपली आहे” असे लिहिले होते. यावरून तिने नैराश्याच्या स्थितीत आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तथापि, अधिक तपास सुरू असून, तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घटना, मानसिक आरोग्य, व कामाच्या ठिकाणचे तणाव यांचा तपास केला जात आहे.

अभिलाषाच्या मृतदेहाचे पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अहवालात ती उंचावरून पडल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
