दिनांक ५ जून २०२५,श्रीगोंदा/कर्जत/पारनेर:
नगर जिल्ह्यातील निमगाव वाघा, श्रीगोंदा, कर्जत व पारनेर तालुक्यात पाच ठिकाणी झालेल्या घरफोड्यांचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोठे यश मिळाले आहे. चोऱ्यांचे सत्र राबवणारी चौघांची टोळी पकडण्यात पोलिसांना यश आले असून, यातील तिघेजण अद्याप फरार आहेत. अटकेत असलेल्या आरोपींकडून तब्बल २ लाख ८४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

अटक केलेले आरोपी म्हणजे चंद्या पिंपळ्या भोसले (वय ४७), राकेश चंद्या भोसले (२१, रा. घोसपुरी, ता. नगर), अर्जुन संभाजी काळे (२०), व गोपीचंद चंद्या काळे (१९, रा. कंदर, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांचा समावेश आहे.

२३ फेब्रुवारी २०२५ रोजी निमगाव वाघा येथील जयंत केदार यांच्या घरात झालेल्या चोरीच्या प्रकरणाचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले होते. तपासादरम्यान ३ जून रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, चंद्या भोसले व त्याचे साथीदार अरणगाव शिवारात रेल्वे पटरीजवळ थांबले असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने तत्काळ सापळा रचून चौघांना अटक केली.

या टोळीतील शकल्या सुरेश भोसले (रा. निपाणी जळगाव), सफ्या रुस्तम चव्हाण (रा. निपाणी जळगाव) आणि रोहित चाचा भोसले (रा. सय्यदमीर लोणी, ता. आष्टी) हे अद्याप फरार असून, त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

अटक आरोपी चंद्या भोसले याच्याकडून चौकशीदरम्यान श्रीगोंदा, कर्जत, पारनेर व अहिल्यानगर येथेही घरफोड्या केल्याची कबुली मिळाली आहे. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी ३३.७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. सर्व आरोपींना नगर तालुका पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
