अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात श्रीगोंदा पोलिसांकडून दिरंगाई; तपास अधिकाऱ्याच्या अश्लील वक्तव्याविरोधात आमरण उपोषणाचा इशारा..!

श्रीगोंदा, दि. ५ जून २०२५ :—

श्रीगोंदा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी पोलिसांकडून दिरंगाई व तपास अधिकाऱ्याच्या असभ्य वागणुकीचा आरोप करत पीडितेच्या आईने पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर ११ जूनपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

दिनांक २० मे २०२५ रोजी १७ वर्षीय मुलीला काही व्यक्तींनी फसवून पळवून नेल्याची तक्रार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. संबंधित गुन्हा भारतीय दंड विधानाच्या कलम ३७५ अंतर्गत नोंदवण्यात आला. दिनांक २५ मे रोजी पीडितेला एमआयडीसी, अहमदनगर येथे सोपवण्यात आले व त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी व न्यायालयीन जबाब नोंदवले गेले.

पीडितेने सांगितल्यानुसार, तिला फसवून नेणाऱ्या व्यक्तीने तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. तरीदेखील तपास अधिकारी ए.पी.आय. यांच्याकडून पोस्को कायद्याअंतर्गत किंवा इतर गंभीर कलमांची नोंद करण्यात आली नाही, असे आरोप अर्जदार महिलेने केले आहेत. इतकेच नव्हे तर ३ जून रोजी तीच मुलगी पुन्हा नेण्यात आली असून यावेळी संबंधित आरोपीसोबत आलेल्या महिलेला थांबवण्याचा प्रयत्नही पोलिसांनी केला नाही.

४ जून रोजी पीडितेच्या आईने पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष भेट देऊन निवेदन देण्याचा प्रयत्न केला असता तपास अधिकाऱ्यांनी अर्वाच्च व अपमानास्पद भाषा वापरली, असेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. “मुलीला सांभाळता येत नाही तर जन्माला का घातली?” असे वक्तव्य करून संबंधित अधिकाऱ्याने मानसिक छळ केल्याचा आरोप आहे.

या सर्व प्रकारामुळे पीडितेच्या आईने अनुसूचित जमातीतील सदस्य असल्यामुळेच आपल्याला ही वागणूक मिळत असल्याचा आरोप करत, आरोपींवर कठोर कार्यवाही व संबंधित अधिकाऱ्यावर विभागीय शिस्तभंगाची मागणी केली आहे. अन्यथा ११ जूनपासून पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल व याला संपूर्ण जबाबदार प्रशासन असेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

या निवेदनाची प्रत पोलीस महासंचालक (मुंबई), विशेष पोलीस महानिरीक्षक (नाशिक), उपविभागीय अधिकारी (कर्जत) व श्रीगोंदा पोलीस निरीक्षक यांच्याकडेही पाठवण्यात आली आहे. तर, या गंभीर प्रकरणात पोलिस प्रशासन कोणती भूमिका घेते आणि संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्रोत:(पीडितेचे निवेदन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading