दिनांक २३ मार्च (श्रीगोंदा):
तालुक्यातील अनुसूचित जाती/जमाती, भटके – विमुक्त समाजातील बहुतांश कुटुंब स्वतःच्या राहत्या घरासाठी संघर्ष करत आहेत. शासनाचे याबाबत वेगवेगळे निकष असून, त्यांना घर व जागा मिळण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ते भूमिहीन असल्याने स्वतःची जागा त्यांना उपलब्ध नाही. स्थानिक ग्रामपंचायत, महसूल व वन विभागाच्या जागेमध्ये ते अतिक्रमण करून राहतात. अशा कुटुंबांना स्वतःची घरे नावावरती नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. त्यांना स्वतःच्या हक्काची घरं मिळून राहत्या जागेचा उतारा मिळावा याबाबत (बहुजन समाज पार्टीचे) जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ यांनी श्रीगोंद्याचे तहसीलदार व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अनुसूचित जाती/जमाती व भटके-विमुक्त समाजामध्ये अनेक कुटुंबांना स्वतःची जागा नाही. ते ग्रामपंचायत, महसूल व वन विभागाच्या जागेमध्ये अतिक्रमण करून राहतात. अशा कुटुंबांना स्वतःची घरं नावावर नसल्याने अडचण निर्माण होत आहेत. हजारो वर्षापासून सदर समाज अपेक्षित असून, स्वातंत्र्यानंतरही त्यांना शासनाच्या लाभांपासून वंचित राहावे लागत आहे. या देशातील हा सर्व मूलनिवासी वर्ग जगण्यासाठी धडपडत आहे. सरकारी अध्यादेश असतांनाही नमूद समाजाला तो वहीती करत असलेली जमीन व जागा त्याच्या नावावर होत नाही. प्रशासनातील काही अधिकारी (लोकसेवक) व स्थानिक जातीवादी पुढारी यांची या वर्गाबाबत नियत व नीती खराब असलेल्या मानसिकतेचे हे एक कारण या सर्व प्रक्रियेमागे आहे. उलट प्रत्येक गावामध्ये धनदांडग्यां पुढाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मोक्याच्या जागेवर अतिक्रमण केलेली आहेत. या शासकीय जागांवर दुकान, बंगले, मॉल, दुध व्यवसाय असे मोठे मोठे उद्योग उभारले असल्याबाबत सुनील ओहोळ यांनी निवेदनात नमूद केले आहे.
असे असतांना भूमिहीन Sc, St, Vjnt समाजाला त्याची स्वतःची जागा असणे गरजेचे असून, वास्तव्यास असलेल्या शासकीय जागेवर त्यांच्या घराची नोंद व्हावी, त्यांना हक्काची जागा उपलब्ध करावी. अन्यथा या उपेक्षित प्रवर्गाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा सुनील ओहोळ यांनी स्थानिक प्रशासनास दिलेल्या निवेदनातूून दिला आहे.
Shrigonda … Sc, St, Vjnt ‘BSP’s demand to maintain government land for the landless living in the society ..
सदर जागेचे उतारे नोंद करून न मिळाल्यास…न्यायासाठी मंगळवार दिनांक ३० मार्च २०२१ रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनातून होणाऱ्या परिणामांची जबाबदारी प्रशासनाची असेल, असे सुनील ओहोळ यांनी निवेदनात म्हटले आहे. दिलेल्या निवेदनावर स्वप्निल पवार, कचरु लष्करे, राजेंद्र राऊत, विठ्ठल मस्के, मोहन काळे, अनिकेत सोनवणे, त्रिंबक साळवे, आकाश सुडगे इत्यादी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
स्रोत:(निवेदन)
