“श्रीगोंदा: श्री. संत शेख महंमद महाराज.. मंदिर जीर्णोद्धार आंदोलनाची तीव्रता कमी..? दुसऱ्या दिवशी सौम्य प्रतिसाद..? स्थानिक रहिवासी विश्वस्तांच्या की.. आंदोलकांच्या पाठीशी”..?

श्रीगोंदा, दिनांक १८ एप्रिल २०२५:

श्रीगोंदा शहरातील सुफी संत शेख महंमद बाबा उर्फ श्री संत शेख महंमद महाराज यांच्या मंदिर-दर्गाहच्या जीर्णोद्धारासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला काल उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. संपूर्ण शहर बंद पाळण्यात आले होते. मात्र आज दुसऱ्या दिवशी आंदोलनाचा टेम्पो काहीसा ओसरताना दिसून आला. काल पूर्णतः बंद असलेले शहर आज काही अंशी उघडले गेले असून, काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरू करत आंदोलनापासून आपली बाजू वेगळी केल्याचे चित्र दिसून येत आहे.

यासोबतच, सामाजिक माध्यमांवर या आंदोलनाबाबत चर्चेला उधाण आले आहे. शहरातील काही जबाबदार नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत, जीर्णोद्धारासाठी पुढे सरसावलेल्या पदाधिकाऱ्यांपैकी बहुतांश मंडळी या शहराबाहेर तालुक्यातील असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे स्थानिक जनतेमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसतोय.

दरम्यान, श्री.संत शेख महंमद महाराज/बाबा हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असल्याने, दर्गा-मंदिर ही एकात्म संकल्पना घेऊन समन्वयाने जीर्णोद्धार व्हावा, अशी मागणी काहींनी केली आहे. त्याचबरोबर, या दर्गा-मंदिराच्या जीर्णोद्धाराचे सर्व अधिकार त्यांच्या वंशज व रक्ताच्या वारसदारांकडेच असावेत, असेही मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

नियोजन, बैठक आणि आंदोलनादरम्यान व्यक्त होणाऱ्या भाषणांतून काहीजणांकडून असंवैधानिक आणि भावना दुखावणारी वक्तव्ये झाल्याचे प्रकार उघडकीस आले असून, त्यावरही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

शनी चौक, होनराव चौक, कुंभार गल्ली परिसर आणि संत शेख महंमद बाबा दर्गा परीसरातील रहिवासी मात्र विश्वस्थानच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचवेळी सर्वांचे आदर्श असलेले श्री.संत शेख महंमद महाराज यांच्या रक्ताच्या वारसदार व वंशजांच्या विरोधात आंदोलन करणे हे विसंगत असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे.

विशेष बाब म्हणजे, आंदोलनात बहुसंख्य हिंदू बांधव उपस्थित असून, इतर समुदायांपैकी मुस्लिम बांधवांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे या आंदोलनाच्या माध्यमातून विश्वस्थानवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही काहींकडून केला जात आहे.

आज दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरू असताना, शहर बंदची हाक आणि प्रत्यक्ष उपस्थित लोकसंख्या पाहता आंदोलनाची तीव्रता घटल्याचे पदाधिकाऱ्यांकडून बोलले जात आहे. यामुळे भविष्यात हे आंदोलन बेमुदत बंद रूप धारण करणार का, आणि त्याची दिशा काय असेल.?, याबाबत शहरात तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

स्रोत:(अधिकृत माहितीनूसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading