दिनांक १४ एप्रिल २०२५, श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरातील संत शेख महंमद महाराज मंदिराचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला जीर्णोद्धाराचा विषय अखेर मार्गी लावण्याचा निर्धार नागरिकांनी केला आहे. यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील आणि शहरातील भाविक, वारकरी, टाळकरी, माळकरी, भागवत धर्मीय, राजकीय व सामाजिक पदाधिकारी एकत्र येऊन १७ एप्रिल २५ रोजी मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन करणार आहेत.
या संदर्भात आज रत्नकमल मंगल कार्यालयात नियोजन बैठक झाली. या बैठकीत यात्रा कमिटी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी सहभाग घेतला. बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली असून, बसस्थानक परिसरातून भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सुमारे २५,००० नागरिक उपस्थित राहणार आहेत.

जीर्णोद्धाराच्या प्रक्रियेला मंदिराच्या विश्वस्तांकडून अडथळा येत असल्याचा आरोप करत, नागरिकांनी एकत्र येऊन आंदोलनाची हाक दिली आहे. “संत कधी एकाचा नसतो” असे मत मांडत सर्वधर्मीयांनी या लढ्यात सहभागी होण्याचे ठरवले. विशेष म्हणजे, श्रीगोंद्यातील मुस्लिम बांधवही या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
या आंदोलनाचा यात्रा कमिटीशी थेट संबंध नसून, हे सर्व श्रीगोंद्यातील नागरिकांचे आंदोलन आहे. मोर्चा यशस्वी होण्यासाठी मंदिर बंद ठेवण्याचा आणि जीर्णोद्धार समिती गठित करण्याचा ठराव बैठकीत पारित करण्यात आला. ज्या गावचा देव धोक्यात असतो तिथली जनता ही धोक्यात असते,” असे मत व्यक्त करण्यात आले.

बैठकीत पुढील मागण्या करण्यात आल्या:
- मंदिर बंद आंदोलन
- गाव बंद आंदोलन
- मंदिर जीर्णोद्धार समिती गठित करणे
- जिर्णोद्धाराचा नारळ फुटेपर्यंत मंदिर कुलूपबंद ठेवणे
- गुन्हे दाखल करून घेण्यास नागरिकांची तयारी
- राज्य शासनाकडे देवस्थान हस्तांतरित करणे
- सर्वोच्च न्यायालयात याबाबत जलदगती सुनावणी करणे
- अमीन भाई यांनी गावाची माफी मागावी,
बैठकीत बाबासाहेब भोस यांनी यामागे हिंदू-मुस्लिम वाद नसून एका कुटुंबाचा विरोध असल्याचे स्पष्ट केले. “संत शेख महंमद महाराज मंदिर ही श्रीगोंद्याची शिर्डी होईल, यात अडथळा करण्याचा प्रयत्न एका व्यक्तीचा आहे,” असे त्यांनी नमूद केले.

श्रीगोंदा तालुक्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा दाखला देत, “संघटित शक्तीचा उपयोग भक्तीची तहान भागवण्यासाठी करावा,” असे आवाहन केले. त्यांनी आंदोलन कायद्याच्या चौकटीत राहून करण्याचे आणि गर्दीच्या जोरावर अपेक्षित निर्णय होईलच..! असे न गृहीत धरता नियोजनबद्ध लढा देण्याचे मार्गदर्शन केले.
या बैठकीस माजी मंत्री बबनराव पाचपुते, घनश्याम अण्णा शेलार, बाबासाहेब भोस, बजरंग दलाचे कालिदास कोथंबिरे, ॲड. प्रदीप खामगळ, अरविंद कापसे, एम.डी. शिंदे, कांतीलाल कोथिंबीरे, राजू गोरे यांच्यासह असंख्य नागरिकांनी उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले.

एकूणच, १७ एप्रिल २०२५ रोजीचे हे जनआंदोलन सर्वधर्मीय, सर्वसामान्य आणि सर्वपक्षीय नागरिकांचा एकत्रित प्रयत्न असून, संत शेख महंमद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ऐतिहासिक ठरणार असल्याचे याठिकाणी स्पष्ट करण्यात आले आहे.
स्रोत:(आयोजित बैठक)
