संत शेख महंमद महाराजांचे जीवन चरित्र,.. संदेश आणि त्यांचे विचार विश्वस्तांना मान्य नाहीत..: घनश्याम आण्णा शेलार..!    श्रीगोंद्यात मंदिर जिर्णोद्धारासाठी संघर्ष तेज..  गाव बंद आंदोलनाची घोषणा..

दिनांक १५ एप्रिल २०२५, श्रीगोंदा

सदगुरु संत शेख महंमद महाराज यांच्या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यासाठी श्रीगोंदा शहरातील तसेच तालुक्यातील भाविक, वारकरी, टाळकरी, माळकरी आणि नागरिक उत्स्फूर्तपणे पुढे सरसावले असून, लवकरच संत शेख महंमद महाराज यांचा श्वास मोकळा होईल, असा विश्वास आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त करण्यात आला.

आज घनश्याम अण्णा शेलार यांच्या श्रीगोंदा येथील निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये घनश्याम अण्णा शेलार, बाबासाहेब भोस, गोपाळ मोठे पाटील आणि यात्रा कमिटीतील भाविक भक्तांनी पत्रकारांशी संवाद साधला.

या वेळी विविध प्रश्नांवर खुल्या दिलाने चर्चा करत, आंदोलनाची पार्श्वभूमी आणि गरज स्पष्ट करण्यात आली. पत्रकारांनी उपस्थित करत असलेल्या प्रश्नांना उत्तर देताना, जिर्णोद्धाराच्या प्रक्रियेत समाजातील एकात्मता अबाधित राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

पत्रकारांनी विचारले — ट्रस्टचे पदाधिकारी मुस्लिम समाजाचे असून आंदोलनात बहुसंख्य हिंदू बांधव सहभागी असतील, याचा ट्रस्टवर दबाव आणण्याचा उद्देश आहे का..? या प्रश्नाला उत्तर देताना शेलार म्हणाले, “ही लढाई धर्मातली नसून सर्वसामान्य ग्रामस्थांच्या हक्काची आहे. आम्ही कोणत्याही जाती-धर्माविरोधात नाही. ट्रस्टींनी ग्रामभावना आणि परंपरा मान्य कराव्यात, इतकीच आमची मागणी आहे.”

या आंदोलनाचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजे ट्रस्ट आणि त्यांचे वागणे. ट्रस्टमधील केवळ एकच व्यक्ती जिर्णोद्धार प्रक्रियेला विरोध करत असून, २००८ पासूनच या कामात अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. प्रशासनाच्या उपस्थितीत बैठकाही झाल्या, परंतु त्या निष्फळ ठरल्या.

मंदिरात अनेक अनधिकृत बांधकामे, दुकाने उभारण्यात आली असून, त्यांना कोणतीही परवानगी नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. त्याचबरोबर ट्रस्टींनी यात्रेच्या देणगी स्वीकारण्याच्या ठिकाणी ‘पाय धुण्याची’ व्यवस्था केली आहे, हे श्रद्धेच्या दृष्टिकोनातून अत्यंत चुकीचे असल्याचे मतही यावेळी व्यक्त झाले.

संत शेख महंमद महाराज यांचा इतिहास हा हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जिवंत पुरावा आहे. त्यांचे साहित्य अपवादात्मकरित्या मराठी भाषेत आढळते. औरंगजेब बादशाहाने त्यांना जमीन देऊन सन्मान केला होता. संत शेख महंमद महाराज यांचे जीवन चरित्र, संदेश आणि विचार विश्वस्तांना मान्य नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलाय.

दिनांक १७ एप्रिल २५ रोजी होणाऱ्या आंदोलनात राज्यभरातील नामांकित विचारवंत, अभ्यासक उपस्थित राहणार आहेत. बंडातात्या कराडकर, माणिक आप्पा मोरे, छोटे माऊली कदम हे भाविक भक्त व ग्रामस्थांना मार्गदर्शन करणार आहेत.

ग्रामस्थांनी बेमुदत गाव बंद आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला असून, विश्वस्तांनी दोन पावले मागे घ्यावेत, अन्यथा पुढील आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी बोलताना बाबासाहेब भोस म्हणाले, “सदरील प्रश्न शांततेत सुटावा ही आमची मनस्थिती होती. मात्र, मागील बैठका निष्फळ ठरल्याने आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.”

या पत्रकार परिषदेसाठी घनश्याम अण्णा शेलार, बाबासाहेब भोस, गोपाळ मोठे पाटील, यात्रा कमिटीचे सदस्य आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्रोत:(पत्रकार परिषद)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading