पेडगाव – शंकरनगर रस्ता खोदून विक्री केलेल्या मुरुमाची रॉयल्टी वसूल करण्याची मागणी. ..
दिनांक ७ ऑक्टोबर, श्रीगोंदा:
पूर्वापार वहीवाटीत असलेला पेडगाव- शंकरनगर रस्ता गेल्या ८० वर्षांपासून मागासवर्गीय बांधव येण्याजाण्यासाठी वापरत असून, तो रस्ता खोदून दैनंदिन सुविधांपासून वंचित ठेऊन सर्वांना वेठीस धरल्याने, राजेंद्र उर्फ ज्ञानेश्वर विश्वनाथ अनभुले, संदेश राजेंद्र उर्फ ज्ञानेश्वर अनभुले यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी बहुजन लोक अभियान संघटनेचे राज्य सचिव वसंत सकट यांनी तहसीलदार मिलिंद कुलथे तसेच, पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना निवेदनाद्वारे केली.

या बाबत निवेदनात दिलेल्या माहिती नुसार पेडगाव – शंकरनगर दिवटेवस्ती मार्गे जाणारा रस्ता दिनांक ०५ ऑक्टोबर रोजी राजेंद्र उर्फ ज्ञानेश्वर विश्वनाथ अनभुले, संदेश राजेंद्रउर्फ ज्ञानेश्वर अनभुले यांनी कुठल्याही प्रकारची कल्पना न देता जेसीबी द्वारे खोदून बंद केला आहे.

मागील ८० वर्षापासून वहिवाटीस असणारा रस्ता खोदून मागासवर्गीय व अन्य राहणाऱ्या लोकांना दळणवळण व दैनिक सुविधांपासून वंचित करण्यात आलेले आहे. मागासवर्गीयांच्या अडचणी व्हाव्यात तसेच, त्यांनी शेतात पिकविलेले पिक अडकून पडावे, त्याचे नुकसान व्हावे या उद्देशापोटी त्यांनी हा रस्ता खोदून बंद केला. रस्त्याला दगड आडवे लावून रस्त्याची अडवणूक करणे अशा प्रकारचे कृत्य करत आहे.

याबाबत दिनांक २६ जानेवारी २०२० रोजी ग्रामसभेत तसेच ०५ जुन २०२० रोजी तहसीलदार यांना तक्रार देखील देण्यात आली होती. परंतु, संबंधित व्यक्ती कोणाचेही ऐकत नसून, दंडेलशाही व जीवे मारण्याची धमकी देत असल्याने, रस्ताची जागा नियमित करून रस्ता मागासवर्गीय व सर्वांसाठी खुला करून मिळावा.अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
सदर रस्त्याची दुरुस्ती होऊन संबंधितावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी बहुजन लोक अभियान संघटनेचे राज्य सचिव वसंत सकट यांनी तहसीलदार मिलिंद कुलथे तसेच पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना निवेदनाद्वारे केली आहे.
रस्त्याच्या कडेने मशीनच्या सहाय्याने ४० फुटी खोदकाम करून त्यातील माती व मुरूम अवैध मार्गाने विक्री केलेले आहे व झालेल्या खड्ड्यामध्ये घोड पाटबंधारे प्रकल्पाचे पाणी प्रत्येक रोटेशनला दोन वेळेस भरून घेऊन, लाखो लिटर पाण्याचा अपव्यय करून शासनाचा महसूल बुडविलेला असल्याने, गौण खनिज (महसूल) तसेच, पाटबंधारे विभागाचे लाखो रुपयाचे बेकायदेशीर पाणी वापरल्यामुळे पाणीपट्टी वसूल व्हावी. अशी मागणी देखील केली आहे.
या बाबत मंडलाधिकारी यांना पाठवून पाहणी करून अहवाल घेतो, जर चुकीचे असेल तर कारवाई करू असे तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी सांगितले.
स्रोत:(प्रसिद्धीपत्र)
