दिनांक ७ जून २०२५, श्रीगोंदा/पुणे:
रांजणगाव गणपती (ता. शिरूर) परिसरात सापडलेल्या तरुण महिला आणि दोन लहान मुलांच्या अर्धवट जळालेल्या मृतदेहांच्या तिहेरी हत्याकांडाचा उलगडा पुणे ग्रामीण पोलिसांनी केला आहे. या खळबळजनक घटनेतील आरोपी गोरख पोपट बोखारे (वय ३६, रा. सरदवाडी, ता. शिरूर, मुळ रा. चिखली, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) याला पोलिसांनी अटक केली आहे.

स्वाती केशव सोनवणे (वय २५, रा. वाघोरा, ता. माजलगाव, जि. बीड) आणि तिची दोन मुले स्वराज (वय २) व विराज (वय १) अशी हत्या झालेल्या तिघांची नावे आहेत. आरोपी हा मृत महिलेच्या बहीणीचा दिर असून, दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. स्वाती ही गोरखवर लग्नासाठी तगादा लावत होती. त्यामुळे चिडलेल्या गोरखने या तिघांचा निर्दयपणे खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

हत्या आणि पुराव्यांचा नाश:
२५ मे रोजी खंडाळे परिसरातील बंद पडलेल्या कंपनीजवळ महिला आणि दोन चिमुकल्यांचे अर्धवट जळालेले मृतदेह सापडले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी सात पथके तयार केली. मृतदेहावरील ‘जय भीम’, ‘Rajratan’, ‘mom dad’, ‘RS’ या गोंदणावरून ओळख पटवण्यात आली.

तपास पथकाने राज्यभरातील मिसिंग डेटाची छाननी केली. अखेर बीड जिल्ह्यातील माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात स्वाती सोनवणे नामक महिला व तिच्या दोन मुलांची मिसिंग नोंद आढळली. चौकशीतून मृत महिला हीच स्वाती असल्याची खात्री पटली.

प्रेमातून हत्येपर्यंत:
स्वाती ही तिच्या बहीणीच्या दिरासोबत आळंदी येथून मोटरसायकलवर निघाल्याचे निदर्शनास आले. आरोपी गोरख बोखारे याला ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत, त्याने हत्येची कबुली दिली. त्यानुसार, स्वाती सतत लग्नासाठी दबाव आणत होती. त्यामुळे तिघांचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून हत्या करून मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्यात आले.

पोलिस कोठडी:
गोरख बोखारे याला न्यायालयात हजर केले असता, गुरुवार (ता. १९) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेने पुणे जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
