श्रीगोंदा, दिनांक ७ जून २०२५:
श्रीगोंदा तालुक्यातील राष्ट्रसंत सद्गुरू शेख महंमद महाराज यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात आज श्रीगोंदा येथील घनश्याम अण्णा शेलार यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

पत्रकार परिषदेत बोलताना आंदोलनाच्या आयोजकांनी स्पष्टपणे सांगितले की, पंढरपूर आषाढी वारी समाप्त होताच दिनांक १४ जुलैपूर्वी मंदिर जीर्णोद्धार व नामकरणाची कार्यवाही न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. यावेळी त्यांनी मागील आंदोलनात लोकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचा उल्लेख केला आणि यंदाच्या आंदोलनातही अशाच तीव्रतेची शक्यता व्यक्त केली.

यावेळी घनश्याम अण्णा शेलार यांनी सांगितले की, “या आंदोलनात संपूर्ण राज्यातील वारकरी संघटना सक्रीय होणार असून, आंदोलनाची दिशा आणि स्वरूप राज्यातील सर्व संघटनांच्या एकत्रित चर्चेनंतर निश्चित केली जाईल.”

या पत्रकार परिषदेत यात्रा कमिटीचे सदस्य बाबासाहेब भोस, गोपाळ मोटे, शेख महंमद महाराज यांचे वंशज रियाज शेख यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी एकमताने या प्रश्नावर सामाजिक आणि निर्भीड भूमिका घेत आंदोलन चालविण्याचा निर्धार केला.

तसेच, वक्फ बोर्डाची नोंदणी आणि मंदिराच्या नावाचे अधिकृत नामकरण लवकरात लवकर व्हावे, ही या आंदोलनाची मुख्य मागणी असून याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी स्पष्ट मागणी यावेळी करण्यात आली.

या संदर्भातील पुढील टप्प्यातील कार्यवाही आणि आंदोलनाच्या तारीख-ठिकाणाबाबतची माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्रोत:(पत्रकार परिषद)
