“शेअर मार्केट फसवणूक प्रकरणात श्रीगोंद्यात काही दलाल ताब्यात, मुख्य सूत्रधार फरार!”

दिनांक ७ जुलै २०२५ | श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहर व तालुक्यात सध्या सर्वाधिक गाजणारे प्रकरण म्हणजे शेअर मार्केटच्या नावाखाली झालेली मोठी फसवणूक! या प्रकरणामुळे अनेक गुंतवणूकदारांचे आर्थिक कंबरडे मोडले असून, संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

शेकडो कोटींची रक्कम गुंतवणूकदारांकडून गोळा करून, ‘शेअर मार्केटमध्ये भरघोस परतावा मिळेल’ असे आमिष दाखवून श्रीगोंदा तालुक्यातील काही महिला आणि पुरुष एजंटांनी मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे आणि त्यांच्या पथकाने तत्परतेने कारवाई करत काही दलालांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे. मात्र, या संपूर्ण फसवणुकीमागचा मुख्य सूत्रधार अद्यापही फरार आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीती व अनिश्चितता आहे.

या प्रकरणात काही गुंतवणूकदारांनी हजारो रुपये तर काहींनी लाखो-कोटींची रक्कम गुंतवली होती. मात्र, सध्या गुंतवणूकदारांना मूळ रक्कमही परत मिळालेली नाही. त्यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली असून, काही जणांवर कर्जाचे डोंगर उभे राहिले आहेत.

विशेष बाब म्हणजे, या एजंटांनी स्थानिक पातळीवर विश्वास संपादन करत गुंतवणूक वाढवली. त्यामुळे सामान्यांपासून व्यावसायिकांपर्यंत अनेकजण या जाळ्यात अडकले. आज दिवसभर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अनेक फसवणूकग्रस्त नागरिकांनी पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी आपली कैफियत मांडत पोलिसांकडून न्याय मिळावा, अशी मागणी केली.

हे प्रकरण केवळ एजंटांनीच केलेली फसवणूक आहे की त्यांच्या मागेही एखादी मोठी कंपनी किंवा वरिष्ठ पातळीवरील मास्टरमाइंड आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. लवकरच यामागील संपूर्ण सत्य बाहेर येईल, अशी अपेक्षा गुंतवणूकदारांमध्ये आहे.

एकंदरीत, श्रीगोंदा तालुक्यातील ‘शेअर मार्केट’ नावाच्या गाजलेल्या स्वप्नाचा आता एक मोठा फसवणुकीचा भयानक चेहरा समोर येत असून, अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या वाटेवर आहेत. पोलिसांची चौकशी निर्णायक व सखोल होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी तालुकावासियांची मागणी आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading