दिनांक १ फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा:
रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने फूड फेस्टिवल, पुष्परचना सजावट, फनी गेम्स, संगीत खुर्ची यांसारख्या विविध उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयात मिस मॅच डे देखील उत्साहात साजरा करण्यात आला. या सर्व उपक्रमांना विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्गाचा प्रतिसाद लाभला.

समारंभाचे उद्घाटन महाविद्यालय विकास समितीचे सदस्य महावीर पटवा यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी बोलताना त्यांनी महाविद्यालयीन युवक-युवतींनी अशा उपक्रमांमधून उद्याच्या उद्योग-व्यवसायाच्या वाटा शोधाव्यात आणि आपले व्यक्तिमत्त्व समृद्ध करावे, असा मोलाचा सल्ला दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. महादेव जरे होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलात्मक व व्यावसायिक उर्मिंना जागृत करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. “विद्यार्थ्यांनी या संधींचा पुरेपूर आनंद घेत आपले कौशल्य विकसित करावे,” असे आवाहन त्यांनी केले.

फूड फेस्टिवलचे समन्वयक वाणिज्य विभागप्रमुख डॉ. रावसाहेब काळे यांनी प्रास्ताविक करत उपस्थितांचे स्वागत केले. पुष्परचना सजावटीचे समन्वयक म्हणून डॉ. हरिभाऊ वाघिरे यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. फनी गेम्सचे समन्वयक म्हणून प्रा. कल्पना बागुल आणि प्रा. संजय डफळ यांनी उत्कृष्ट संयोजन केले.

उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, उपप्राचार्य शहाजी मखरे, पर्यवेक्षक प्रा. रत्नाकर झिटे, डॉ. सुदाम भुजबळ, डॉ. नितीन थोरात, कार्याध्यक्ष डॉ. बापू देवकर, प्रा. सुनिता सोनावळे, श्री रघुनाथ लबडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. राजाराम कानडे, प्रा. रमेश थोरात, एन.सी.सी. प्रमुख डॉ. किरण ढवळे, एन.एस.एस. प्रमुख प्रा. भाऊसाहेब बुलाखे, प्रा. देवेंद्र बहिरम, डॉ. राहुल गायकवाड, अधीक्षक बाळासाहेब राऊत आदी मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी डॉ. राम ढगे यांनी कुशलतेने पार पाडली. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)




