दिनांक १ फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा/पुणे:
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प नोकरदार, करदाते, सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा असल्याचे प्रतिपादन आमदार विक्रम पाचपुते यांनी केले. करदात्यांसाठी दिलेल्या सवलती, कररचनेतील मोठे बदल आणि कृषी क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण तरतुदींमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

नोकरदारांना दिलासा:
नोकरदारांच्या स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 50,000 रुपयांवरून 75,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपयांपर्यंत असलेल्या नोकरदारांना आता प्राप्तिकर भरावा लागणार नाही.

प्राप्तिकर रचनेतील मोठे बदल:
- 4 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त
- 4 ते 8 लाख रुपयांपर्यंत 5% कर
- 8 ते 12 लाख रुपयांपर्यंत 10% कर
- 12 ते 16 लाख रुपयांपर्यंत 15% कर
- 16 ते 20 लाख रुपयांपर्यंत 20% कर
- 20 ते 24 लाख रुपयांपर्यंत 25% कर
- 24 लाखांच्या पुढे 30% कर
याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी करकपातीची मर्यादा पन्नास हजारांवरून एक लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. घरभाड्याच्या करकपातीच्या मर्यादेतही वाढ करण्यात आली आहे.

कर विवरणपत्र भरण्याची सुविधा:
अर्थसंकल्पात चार वर्षांपर्यंत मागील विवरणपत्र भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कर विवरणपत्र न भरणाऱ्या करदात्यांना दिलासा मिळणार असून प्राप्तिकर खात्याच्या उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण तरतुदी:
- किसान क्रेडिट कार्डची मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत वाढवणार
- सूक्ष्म उद्योगांना कर्ज देण्याच्या योजना
- मागासवर्गीय महिलांना विशेष मदत
- 100 जिल्ह्यांमध्ये कृषीधन योजना लागू

इतर महत्त्वाच्या घोषणा:
- 2025 पर्यंत 40,000 नागरिकांना घरे उपलब्ध करणार
- LED, LCD, वैद्यकीय उपकरणे, टीव्ही पार्ट, इलेक्ट्रिक कार आणि मोबाईल संच स्वस्त होणार
- 2047 पर्यंत 100 गिगा वॅट अनुशक्ती धोरणाचा संकल्प
- वैद्यकीय शिक्षणाच्या जागा 75 हजारांपर्यंत वाढवणार
आमदार विक्रम पाचपुते यांनी सांगितले की, मध्यमवर्गीयांच्या क्रयशक्ती वाढवण्यासाठी करण्यात आलेले कररचनेतील बदल अर्थव्यवस्थेला चालना देणारे आहेत. एकंदरीत सर्वसामान्य, मध्यमवर्गीय नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी हा अर्थसंकल्प दिलासादायक ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
