दिनांक १ फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा/वर्धा:
देवळी येथील रामदास तडस इनडोर स्टेडियममध्ये झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत श्रीगोंद्याच्या भाग्यश्री फंडने बाजी मारत मानाची गदा आपल्या नावावर केली. अंतिम सामन्यात भाग्यश्रीने अमृता पुजारीचा २-४ गुणांनी पराभव करत विजेतेपदावर मोहोर उमटवली.

या स्पर्धेचे आयोजन माजी खासदार व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी केले होते. राज्यभरातून आलेल्या ३५० महिला कुस्तीपटूंनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.

मानाची गदा उचलल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाग्यश्रीने आपल्या कुटुंबीयांचे आणि सहकाऱ्यांचे आभार मानले. ती म्हणाली, “पहिली ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाल्याचा आनंद आहे. माझ्या यशात आई-वडील, पती, सासू-सासरे यांचा मोठा वाटा आहे. पैलवानांना किती कष्ट करावे लागतात, हे फक्त त्यांनाच माहीत असते.”

वर्ध्यात स्पर्धेचे अतिशय नीटनेटके आयोजन करण्यात आले होते. यासंदर्भात भाग्यश्री म्हणाली, “अशा प्रकारच्या स्पर्धा नियमित घेतल्यास मुलींना प्रोत्साहन मिळेल आणि त्या खेळांकडे आकर्षित होतील. आर्थिक कारणांमुळे अनेक मुली कुस्ती सोडून देतात. त्यामुळे सरकारने अशा मल्लांना आर्थिक मदत दिली पाहिजे.”

महाराष्ट्र केसरी खिताब जिंकणाऱ्या भाग्यश्री फंड हिला चांदीची गदा व रोख ३१ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. या विजयामुळे भाग्यश्री फंडने महिला कुस्तीच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
