दिनांक १ ऑगस्ट २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरातील सिद्धार्थ नगर, ससाणे नगर येथील सामाजिक पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रतिमेला अभिवादन, पूजा पाठ, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची मिरवणूक, फुले आंबेडकर विचार मंचचे ॲड. संभाजीराव बोरुडे यांचे प्रबोधन व सायंकाळी लेजर शो आयोजित करण्यात आले.
अभिवादन कार्यक्रमात श्रीगोंदा तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहिले. भाजपचे पदाधिकारी व युवा नेते विक्रम सिंग पाचपुते, तसेच ओबीसी चे तरुण पदाधिकारी ऋषिकेश शेलार यांनी अण्णाभाऊंच्या प्रतिमेला अभिवादन करत जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
दुपारी आयोजित प्रबोधन कार्यक्रमात फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे संभाजीराव बोरुडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी विविध सामाजिक मूल्यांचा दाखला दिला व संविधानाला आव्हान देणारी माणसे तयार झाले असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद शाळा सिद्धार्थ नगरचे विद्यार्थी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्राचा आढावा घेत, त्यांनी न शिकलेल्या माणसाने आपल्या शाहिरी आणि लेखणीतून लोकांची मने कशी जिंकली हे सांगितले. अण्णाभाऊंच्या लेखन संपदेचा वापर करून अनेकांनी पैसा कमावला परंतु अण्णाभाऊंना जीवनाच्या उत्तरार्धात परिस्थितीशी दोन हात करावे लागले. अशी खंत व्यक्त केली.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊंच्या कार्याला पूर्ण करण्यासाठी शिक्षणाच्या मार्गाने मार्गक्रमणे काळाची गरज असल्याचे संभाजी आप्पा बोरुडे यांनी नमूद केले. डीजे वाजवून सभ्यता दाखवण्याऐवजी महापुरुषांचे विचार आणि त्यांची महती समाजाने स्वीकारणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
वृषाली नंदू ससाणे या प्रा.शाळेतील विद्यार्थ्यांनीने अण्णाभाऊंवर आपले विचार व्यक्त केले, तर ॲड.बोरुडे यांनी उपस्थीत विद्यार्थ्यांना संविधान व कायदा याबाबत प्रश्न विचारले. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आरोग्य, पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. पत्रकारिता क्षेत्रात अंकुश शिंदे, चंदन घोडके व अनिल तुपे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विचार मंचावर मुकुंद सोनटक्के, शिवाजी आप्पा घोडके, संदीप मोटे सर, संदीप उमाप, प्रा. संदीप ससाने, सौ. मीना सुरज घोडके उपस्थित होते.
संध्याकाळी लेजर शोच्या माध्यमातून अण्णाभाऊ, डॉ. बाबासाहेब आणि महापुरुषांच्या जीवनाचा गौरव करणाऱ्या गीतांनी तरुणाई थिरकली व कार्यक्रमाचा आनंद साजरा करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदीप भाऊ उमाप, अनिल ससाणे, प्रा. किरण ससाणे, संदीप ससाणे, उमेश उमाप, अर्जुन ससाणे, नंदू शि. ससाणे इत्यादींसह साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती व सिद्धार्थ नगर, ससाणे नगर येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.
स्रोत: (आयोजित कार्यक्रम)






