दिनांक ३ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरातील ससाणे नगर परिसरातील पटेल वस्ती आणि ससाणे नगर येथील दोन गटांमध्ये काल दिनांक २ नोव्हेंबर रोजी रात्री ९:३० च्या दरम्यान झालेल्या वादामुळे दगडफेक आणि हाणामारीची घटना घडली. या घटनेत सुमारे बारा ते पंधरा जण जखमी झाले असून त्यातील एका व्यक्तीस डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याला श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयातून नगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तसेच, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत आणि काहींना विटा व दगड लागल्याने हात, पाय व डोक्याला इजा झाली आहे.

ससाणे नगरमधून पटेल वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही लहान मुले फटाके फोडत असताना, तिथे येणाऱ्या गाडीवरील तीन व्यक्ती आणि स्थानिकांमध्ये किरकोळ वाद सुरू झाला. हा वाद हळूहळू उग्र रूप घेत गेला आणि दोन गटांमध्ये मोठ्या प्रमाणात हाणामारी व दगडफेक सुरू झाली. या घटनेत दोन्ही बाजूंतील नागरिकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. ससाणे नगर येथील जखमींना ग्रामीण रुग्णालयात तर पटेल वस्तीतील जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ससाणे नगरमधील अनेक समाज बांधव, लहान थोरांसह, श्रीगोंदा पोलीस स्टेशनला जमा झाले होते. त्यांच्याद्वारे घटनेबाबत सविस्तर माहिती मिळाली.

सध्या निवडणूक आचारसंहितेच्या काळात घडलेली ही घटना कायदा व सुव्यवस्थेसाठी आव्हान ठरू शकते. या पार्श्वभूमीवर, ससाणे नगर आणि पटेल वस्ती परिसरात पोलिसांचा (CRPF) तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)




