दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ श्रीगोंदा:
ऐतिहासिक वारसा असलेल्या श्रीगोंदा शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील पोलीस स्टेशनच्या पश्चिम बाजूस असलेली ब्रिटिशकालीन पोलीस वसाहतीची इमारत कोणत्याही शासकीय परवानगीशिवाय पाडून जमीनदोस्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या इमारतीचे मौल्यवान दगड, माती आणि इतर साहित्यही घटनास्थळावरून गायब करण्यात आले असून, याप्रकरणी प्रशासकीय यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.
श्रीगोंदा शहरात वडाळी रोड लगत ही जुनी पोलीस वसाहत होती. ही इमारत सरकारची मालकी असतानाही, दिवसाढवळ्या काही अज्ञात व्यक्तींनी ती पाडली. नियमानुसार कोणतीही सरकारी इमारत पाडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि गृह विभागाची रीतसर परवानगी आवश्यक असते.

मात्र, या ठिकाणी नियमांची पायमल्ली करत हे बेकायदेशीर कृत्य करण्यात आले आहे.
या गंभीर विषयाबाबत वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित विभागाकडे विचारणा केली. मात्र, विभागातील अधिकारी यावर स्पष्ट बोलण्याचे टाळत असून एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत.
सरकारी मालमत्तेची अशा प्रकारे चोरी होणे आणि त्यावर अधिकारी गप्प राहणे, यामागे काही मोठे संगनमत तर नाही ना? असा संशय आता व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून श्री. घन:श्याम शेलार यांनी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून सखोल चौकशीची मागणी केली आहे. या पत्राच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार व एकनाथराव शिंदे यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.
श्रीगोंदा येथील ब्रिटिशकालीन इमारत पाडणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यावा.., गायब करण्यात आलेल्या शासकीय साहित्याचा (दगड, मुरूम, भंगार इ.) पंचनामा करावा.., कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि माहिती लपवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
“सरकारी मालमत्ता ही जनतेची संपत्ती आहे. ब्रिटिशकालीन वारसा असलेली इमारत कोणतीही परवानगी नसताना पाडणे हा राजरोसपणे केलेला गुन्हा आहे. या प्रकरणातील दोषींवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही पाठपुरावा सोडणार नाही.”
— घनःश्याम शेलार (तक्रारदार)आता या प्रकरणाकडे संपूर्ण श्रीगोंदा तालुक्याचे लक्ष लागले असून, जिल्हाधिकारी यावर काय पावले उचलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
स्रोत:(तक्रारी अर्ज)
