दिनांक २३ मे २०२४ श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरापासून दहा किलोमीटर पश्चिमेस असलेल्या गावात एक वर्षापूर्वी लग्न झालेल्या विवाहिते सोबत तिच्या सासरचेच लोकं तिचा शारीरिक, मानसिक छळ करीत असल्याचा गंभीर आरोप स्वतः पीडित महिलेने केला आहे. तिची छळवणूक स्वतःच्या सासू आणि दिराकडून होत होती. विशेषतः पतीला तिच्यासोबत अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी सासु, दीर चिथावणी देत असल्याचा आरोप पिडीत महिलेने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमुद केले आहे.
या प्रकरणी सविस्तर वृत्त असे की, दिनांक १४ फेब्रुवारी २०२३ रोजी नंतर सुमारे एक महिन्यापासून ते दिनांक १९ मे २०२४ रोजीच्या रात्री ११:३० वाजेपर्यंत ती सासरी राहत असताना पती, सासू, दीर हे सर्व त्यांचे कर्ज फेडण्याकरता माहेरून पैसे घेऊन ये म्हणत, त्या महिलेला लाकडी काठीने मारहाण करत, तिला उपाशीपोटी ठेवून, तिचा मानसिक व शारीरिक छळ करीत होते. पैसे घेऊन येत नाही म्हणून, पतीने तिला त्याच्या मोबाईल मधील अश्लील व्हिडिओ दाखवून, बळजबरीने तिच्याशी अनैसर्गिक संभोग केला व यासाठी सासू व दिराने त्याला चिथावणी दिली..! असल्याचा गंभीर आरोप त्या महिलेने फिर्यादीत केला आहे.
या घटनेने त्रस्त झालेल्या महिलेने सासू, दीर आणि पती विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार नमूद तीन इसमांवर भादवि कलम ३७७, ४९८(अ), ३२४, ३२३ व १०९ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई समीर अभंग हे करीत आहेत.
स्रोत:(फिर्याद)
