श्रीगोंद्यातील या ठिकाणी बेवारस स्थितीत आढळले एक दिवसीय नवजात बालक..!

दिनांक २४ मे २०२४ श्रीगोंदा:

तालुक्यातील शिरसगाव बोडखा या ठिकाणी नुकताच जन्म झालेला पुरुष जातीचे नवजात बालक बेवारस अवस्थेत आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. तर, स्थानिक लोकांच्या मदतीने व प्रशासनाच्या तत्परतेने सदरील बाळाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील शिरसगाव बोडखा या ठिकाणी सूर्यवंशी वस्ती शेजारी सदरील बाळ कोणीतरी अज्ञात इसमाने ठेवून दिल्याचे स्थानिक रहिवाशांना आढळून आले. याबाबत येथील संतोष सूर्यवंशी यांनी श्रीगोंदा पोलिसांना फोन करून याबाबतची माहिती दिली. त्यानुसार श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार पोसई समीर अभंग आणि कर्मचारी साखरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वैद्यकीय अधिकारी शेळके यांच्या मदतीने सदरील बालकाला ताब्यात घेऊन उपचारासाठी श्रीगोंदा रुग्णालयात दाखल केले.

वैद्यकीय अधिकारी शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार सदरील मूल हे १२ तास आधी जन्म घेतलेले असून, प्रथमदर्शी त्याच्या नाकात व तोंडात माती गेल्याचे आढळून आले. तर, त्याचा जन्मनाळ व्यवस्थित कापला नसल्याचेही दिसून आले. ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी यांनी पोलिसांच्या मदतीने तात्काळ नमूद बालकाला श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात दाखल करत त्याच्या नाकात तोंडात गेलेली माती स्वच्छ करून त्याला पोषक घटक दिल्याने ते बाळ सध्या सुस्थितीत आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे.

पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनीही याबाबत माध्यमांना माहिती दिली. संतोष सूर्यवंशी यांनी याबाबत सकाळी ६:३० वाजता केलेल्या फोननंतर तात्काळ अधिकारी समीर अभंग व कर्मचारी यांना घटनास्थळी पाचारन करत
नमूद बेवारस मुलाला ताब्यात घेऊन, उपचारकामी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात भरती केल्याबाबत त्यांनी माहिती दिली.

याप्रकरणी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी समीर अभंग या प्रकरणाचा पुढील तपास करीत असून, अनेक संशयित बाबींची तपासणी करण्यात येत असल्याचे पोलीस सांगत आहेत. लवकरच या प्रकरणाचा छडा लावण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे.

श्रीगोंदा तालुक्यासह शहरात वाढत चाललेल्या अल्पवयीन मुला-मुलींच्या अत्याचार प्रकरणांसह कॉलेज व विद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वाढत्या प्रेम प्रकरणांची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. संस्कार केंद्र व मोबाईल टीव्ही सारख्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा गैरवापर आणि त्यातून होणारे चुकीचे संस्कार यामुळे सध्याची तरुण पिढी चुकीच्या मार्गाने मार्गक्रमण करीत आहे. त्यातून होणाऱ्या चुका आणि त्याचे निराकरण करण्यासाठी कोणत्याही थराला प्रकरण जात असल्याचे अनेक उदाहरणं पाहण्यात आलेले आहेत.

अल्पवयीन गर्भवती राहिल्यानंतर समाजाच्या बदनामी खातर आणि कायदेशीर अडचणींना सामोरे जाण्याच्या भीतीने घरातच बाळंतपण करून, जन्मलेल्या बाळाला बेवारस लोक वस्ती जवळ सोडणे.. जेणेकरून त्याच्या जीवितास धोका होणार नाही.. किंवा त्याला योग्य वेळी मदत मिळेल. अशा भावनेने हि कृती केली असावी असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध गून्हा दाखल करण्यात येतं आहे.

स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading