श्रीगोंदा/अहिल्यानगर, दि. १२ जून २०२५ –
“एस.टी. कामगार कंडक्टर नवनाथ राऊत याने मारहाण केली, लज्जास्पद शिवीगाळ करत असभ्य वर्तन केले आणि माझ्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले,” असा गंभीर आरोप पुणे जिल्ह्यातील मांजरी बु. (ता. हवेली) येथील सौ. रंजना आबा घाडगे यांनी केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा म्हणून त्यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची दखल न घेतल्याचा आरोप करत, आता त्यांनी २३ जूनपासून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

१५ मे २०२५ रोजी सौ. रंजना घाडगे आपल्या मुलीसह नातेवाईकांकडून परत पुण्याला जात होत्या. त्यांनी कर्जत-स्वारगेट एस.टी. गाडीत बसण्याचा प्रयत्न केला असताना त्यांची मुलगी प्रियंका घाडगे गाडीत चढत असताना कंडक्टर राऊत याने अचानक दरवाजा ओढल्याने तिचा पाय दरवाज्यात अडकला. परिणामी ती तब्बल ३०-४० फुट फरफटत गेली. ही धक्कादायक घटना रस्त्यावरून जात असलेल्या लोकांनी पाहून गाडी थांबवली आणि काहींनी संबंधित कंडक्टरला मारहाण केली.

सदर प्रकरणात घाडगे यांनी स्पष्ट केले की, त्या व्यक्ती कोण होत्या ..? हे त्यांना माहीत नाही. मात्र, त्यानंतर कंडक्टर राऊत यांनी सौ. घाडगे यांचे भाऊ राजू डाडर यांच्यासह चार जणांविरुद्ध खोटी तक्रार दिली असून, त्या प्रकरणात त्यांच्या नावांचा आधारही नसताना तक्रारीत त्यांचा समावेश करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष..?
सौ. रंजना घाडगे यांनी कंडक्टर राऊत यांनी त्यांच्यावर मारहाण करून शिवीगाळ केली व त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतल्याचे स्पष्टपणे सांगितले. परंतु पोलिसांनी या आरोपांची दखल घेतली नाही, आणि मंगळसूत्र गहाळ झाल्याचे कारण पुढे करत गुन्हा वेगळ्या स्वरूपात नोंदवण्यात आला, असा दावा त्यांनी केला आहे.

आंदोलनाचा इशारा..!
आपल्यावर झालेल्या अन्यायाला अनुसुचित जाती प्रवर्गातील महिला म्हणून न्याय मिळावा, अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी करत सौ. घाडगे यांनी दिनांक २३ जूनपासून अहिल्यानगर येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

“जर माझ्या तक्रारीची योग्य प्रकारे दखल घेतली नाही व गुन्हा अॅट्रॉसिटी कायद्यानुसार नोंदवला गेला नाही, तर मला आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही. आणि या आंदोलनातून उद्भवणाऱ्या परिणामांना संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल,” असा इशारा सौ. घाडगे यांनी अर्जाद्वारे दिला आहे.
स्रोत:(निवेदन)
