“श्रीगोंद्यात भू माफिया बापू मानेविरुद्ध गंभीर आरोप; “बापू मानेसारख्या दहशतवादी प्रवृत्तीला रोखण्यासाठी लेटरपॅडद्वारे पाठपुरावा करणार – नंदकुमार ताडे”

श्रीगोंदा, दि. १२ जून २०२५

‘श्रीरामाचे पठार, श्रीगोंदा मठ ट्रस्ट’च्या मालकीची कसबे श्रीगोंदा येथील गट क्रमांक ११२१ मधील ०.५८ हेक्टर ट्रस्टच्या नोंदणीकृत जमिनीवर बेकायदेशीररित्या कब्जा करून बनावट दस्त तयार करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार त्रिंबक ताडे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

या प्रकरणात चंद्रनंदन सारंग ताडे, बापू बाबा माने, साक्षीदार संदिप दिलीप उमाप व रमेश बबन मखरे, तसेच श्रीगोंदा उपनिबंधक कार्यालयातील प्रभारी अधिकारी जी.व्ही. तारगे यांनी संगनमताने फौजदारी स्वरूपाचा गुन्हा केल्याचे ताडे यांनी नमूद केले. या सर्वांविरोधात लेखी फिर्याद दाखल करण्यात आली असून, संबंधितांवर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ४२० अन्वये गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे.

ताडे यांनी सांगितले की, वादग्रस्त मिळकत ही ट्रस्टच्या मालकीची असून ती धर्मादाय आयुक्त कार्यालयात व नगरपालिका विकास आराखड्यात ‘बाजारतळ व शॉपिंग सेंटर’साठी आरक्षित आहे. परंतु, पोकळीस्त ७/१२ नोंदींचा गैरफायदा घेत खोटे दस्त तयार करण्यात आले. यासंदर्भात यापूर्वी पुराव्यासह दुय्यम निबंधक कार्यालयात अर्ज सादर केला होता. मात्र, त्या अर्जाकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळेच बेकायदेशीर व्यवहार नोंदवले गेले, असा आरोप त्यांनी केला.

नंदकुमार ताडे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, बापू माने आणि त्याचे साथीदार राम शिंदे यांचे मोठे कटआउट लावून स्वतःला राजकीय पाठबळ असल्याचे भासवतात. कैकाडी समाजातील गरीब नागरिकांना गंडवून, गावठाण क्षेत्रात जागा देण्याचे आमिष दाखवून त्यांनी रस्त्यालगतची मोक्याची जमीन बळकावली. यामागे वाडगे भाऊसाहेब यांची भूमिका असून त्यांनीच बापू मानेची ओळख मंत्री राम शिंदेंशी करून दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ताडे यांनी पुढे सांगितले की, बापू माने याने याआधी गावातील अनेक ठिकाणी वाद निर्माण केले. काही घरांमध्ये आगी लावल्या आणि दोन समाजांमध्ये तणाव निर्माण करणाऱ्या घटना घडवल्या. संत शेख महंमद महाराज मंदिरात आमीन शेख आणि राजू शेख यांना फुस लावून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्नदेखील करण्यात आला.

आत्ता या प्रकरनामुळे माझ्या व माझ्या कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, काही अनुचित घटना घडल्यास त्यासाठी बापू माने व त्याचे बगलबच्चे जबाबदार असतील, असा इशारा नंदकुमार ताडे यांनी दिला.

पत्रकार परिषदेत बोलताना ताडे यांनी हेही स्पष्ट केले की, “मी माझ्या संघटनेच्या लेटरपॅडचा कधीही गैरवापर केलेला नाही. मात्र बापू मानेसारख्या दहशतवादी प्रवृत्तीला कायमचा रोखण्यासाठी आता वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत लेटरपॅडद्वारे विधिवत पाठपुरावा केला जाईल.”

या प्रकरणामुळे श्रीगोंदा शहरात एकच खळबळ उडाली असून, संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाईची मागणी होत आहे. प्रशासन व पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन न्याय्य हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा आता ट्रस्टच्या वतीने व्यक्त केली जात आहे.

स्रोत:(पत्रकार परिषद)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading