काट्यावरची पोटं, उत्तम बंडू तुपे..
फड्याचं कुराण . या ऽ माडाफडा आस्मानात उशी घिटल्यागत. फडं बघून मांगं हरकली हुती . कष्टाला भलताच जोम आलेला. वाट्यानं फडं करायचं . पंचादेवीचा वाटा . सरकारी संस्था हुती. दोन हिस्सं सरकारला , तीन हिस्सं मांगाला मिळायचं . कष्टाच्या वडीनं माणसं धावायची. खाती तोंडं कष्टाला जुपलेली. पाळण्यातली नि पोटातली तेवढी आयतं खायाची. पाच वर्माफुडची पोरं कष्ट उपसून सांजेला अजगरासारखी पडायची.
त्यांचं हाल या साहेब लोकांस्नी बघवंना म्हणताना घाडगेकाका, भाई कोरान्ने यांनी बारकी – चिरकी पोरं गोळा केली, कचरा गोळा करत्येती तशी. मांगाची कोवळी पिढी अशीच उन्हात करपून जाणार म्हणून, त्यांस्नी कोडं पडलेलं. तवा माझ्याच वयाची, माझ्यापेक्षा दोन चार वसांनी मोठी पोरं त्यांनी जमवली, नि त्यांनी अक्षराची वळख करून देण्याचा सपाटा उठवला.

काट्याच्या कुरणाला विटलेलं मनबी अक्षरात रमून गेल्यासारखं व्हायचं. नि कामं सोडून आम्ही शिकत बसायचं. तवा ही आडाणी, आडवळणाची माणसं बावरली, सायेब लोकांस्नी विरोध केला, “ सायेब, ही हाता तोंडाला आलेली पोरं फितवू नगंसा. आपल्या पोटाची इद्या यांस्नी शिकू द्या. त्या तुमच्या शिक्षणाचा आमांस्नी काय पण उपेग न्हाय. न्हाय म्हणलं तरी दीसभर फडं वरबडत्येती. तेवढाच आमांस्नीवो इस्वाटा.
आणखी चार पेंढ्या जादा हुत्यात. ” काय झालं , काय न्हाय हे कळलंच न्हाय. व्हयनगं म्हणताना पोरं चार भिंतीच्या आत पाटीपेन्सील घेऊन बसाय लागली. तरी काही बेरकी मागं आपली पोरं शाळंत धाडनात. तवा शाळंत पेज वाटायची मोहीम निघाली. दिवस उगवला की, पितळीभर पेज मिळायची. तिचा वासबी गोड, किती प्यावंसं चाटायचं ! तुपाट , गुळमाट पेज प्याली की, तिथंच व्हराण्ड्यात शाळा भरायची.
साकळकर गुरुजी लई मायाळू माणूस. त्यांनी पोरांस्नी किती मायनं वागवलं. तवा काय आमचा अवतार ! ढुंगणात लंगोट नि अंगात बंडी. कशी तरी काया झाकलेली. कधी छातीवर बटनं दिसलीच न्हायती . वर तुळतुळीत गोटा, तर कधी यो ऽ केसाचा झाप. माळरानात कुसळं हुबी व्हावीत तशी. केसं सदा पिंजारलेली. त्याला त्याल तरी कुठलं ? आईलाच कधी मिळालं न्हाई. कवा ध्यान झालं तर, आई खोबऱ्याचा कुटका कचा कचा चावायची. त्येचं पांढरं दूध तळहातावर घ्याची नि त्येच टकुरीला चोळायची. साकळकर गुरुजी स्वत : तेलाची बाटली आणायचे. सारी पोरं एका दोरीत नळाखाली घालायचे . चांगली साबणानं आंधूळ घालायचे . साबणाच्या वासानं मन गुदमरून जायाचं. वाटायचं अंगाचा साबण धुऊन काढूच न्हाई. वातावरणात साबणाचा वास दरवळून जायाचा.
आंगं वल्ली झली की, घाडगेकाका साबणानं खसा खसा घासायचे. पोरं रडकुंडीला यायची. एक एक पोरगं वल्लं अंग उन्हात तापवाय लागलं की, साकळकर गुरुजी तेल वाळवून त्येला घालायचे. बटनं तुटली आसली तर ती लावायची. मग व्हरांडा गच्च भरायचा . एका रांगेत पोरं बसायची. मोगऱ्याच्या फुलाचा हार फुडं ठेवल्यागत वाटायचं नि एका वेगळ्याच आनंदात साकळकर गुरुजी बुडून जायचे.
साकळकर गुरुजी सदा हसतमुख . फळ्यावर ग, म, भ, न काढून ते गिरवाय सांगायचे. गाणी म्हणायचे. सारी पोरं शाळंत येऊ लागली. पोरीबी आमच्यातच बसत हुत्या. हाता हायलं सखूचं घर. सखूचा रामा मोठा बाजिंदा. पेज पिऊस्तवर बसायचा. नि कवा डोळा चुकवून पळायचा. पत्त्या लागायचा न्हाई. एकदा गुरुजींनी त्येला पेज दिलीच न्हाय, तवा लागला भोकाड पसरायला.
” रामा , तू शाळेत का बसत नाही. ”
” आई मारती. म्हणती काम करायव्हवं. “
” अरे, तुझं हे वय शिकण्याचं. कष्टाचं नाही . तुझ्या आईला सांगतो . ” गुरुजींनी सखूला काय सांगितलं कळलं न्हाय पर तवापास्नं रामा, भानदास नि त्याची बहीण शाळंत बसाय लागली .
आमचं बघून आता कुळवाड्याची पोरंबी शाळंत येऊ लागलेली. हिरडेवाडी, दांडेकर मळ्यातून पोरं यायची. व्हरांड्यात जागाच पुरायची न्हाय. तवा बंगल्याची एक बक्कळ जागा आसलेली खोली ; तिथं आमची शाळा भरायची . खोली शेजारीच हाफीस. त्या हाफिसात कोरान्नेसायेब, कवा तरी बसायचे. सकाळी पेज वाढायच्या वक्ताला ही कुळवाड्याची पोरं आमच्यांत बसाय कचरायची . तवा घाडगेकाका बोलायचे, ” का बसत न्हाई ? ” तर पोरं म्हणायची , ” मांगाच्या पंगतीला आपूण न्हाई बसणार.
तुम्ही आम्हांस्नी बाटवता चल मी काय ?
” कसला बाट ? हीबी माणसंच . ”
” न्हाय गुरुजी , ही कायबी खात्याती . ढोरांचं मांस खात्यात .”
” तुम्ही बघितलं?” ” न्हाय. आमचं आईबा सांगत्यात, मांगांच्या पोरांत बसू नक्षसा. त्यांनी शिवलं की बाट लागतो. ती गुरं – ढोरं खात्यात . ” ” आरे, मग तुम्ही नाही का मटण – मांस खात ? ” “न्हाय. आम्ही सागुती खातू बोकडांची, बकऱ्यांची. “दांडेकरांचा मच्छिंद्र बोलत हुता, आता त्यानं आसं बोलल्यावर कायतरी वाटलं नि उठलो. घाडगेकाकासमोर हुबा ऱ्हायलो. ” गुरुजी, आम्ही मांस, मटाण, सागुती नाय..
क्रमशः
स्रोत:(उत्तम बंडू तुपे यांच्या काट्यावरची पोटं या पुस्तकातुन)
