काट्यावरची पोटं, उत्तम बंडू तुपे.(भाग ३).

काट्यावरची पोटं, उत्तम बंडू तुपे..

खात . डल्ल्या खातू . माझा दादा आढळगावास्नं ती आणतू .’ ” उत्तम, डल्ल्या कसल्या आसतात मला दाखवशील ? “

“व्हय , दावीन की ऐतवारी .

“आता ऐतवार दोन दिवसावर आलेला . आपून घाडगेकाकाला एक आपरुक वस्तू दावणार हे मनात हायलेलं . कवा ऐतवार येतो नि घाडगेकाकाला डल्ल्या दावतो आसं झालेलं.

https://play.google.com/store/apps/details?id=nxtgen.mycity

झालं. एकदाचा ऐतवार उजाडला. दादा झुंजूरकाचं उठला. नेहमीसारखं डंग घिटलं नि हुंबर ढवावर गेला. वाखाचं पिळं केलं. तवर भाऊ मला घिऊन मागनं गेला. केलेल्या पिळ्यांचा घाणा घातला. सात दिवस पाण्यात व्हायलेलं नि पाण्यात कुजलेलं केकताड डंगानं लागलो वडवायला.

डंगाचा दणका टाकला की, केकताडाचा रेंदा अंगावर उडायचा. सारं आंग त्या रेंद्यानं भरून जायाचं . उन्हाचा चटका लागला की , आंगाची आग व्हायची . वाटायचं, आसंच पाण्यात पडावं पर तसं कराय व्हयाचं न्हाय. दादाचा धाक मानगुटीवर. जर का कामात कुचराई केली. तर, दादा तरवाडाचा फोक काढायचा. मनात नसताना खाली बघून पिळं बडवायचा दणका उठायचा.

ऐतवार म्हटलं की, सुळावर हुबं केल्यागत वाटायचं. जाग आली तरी, तोंडावर लेपाट घेऊन पडावं वाटायचं. सहा दिवस सुखाचं वाटायचं. शाळंत जाया लागल्यापास्नं हाताला न्याट न्हवतं. एक काटा हाताला लागला न्हवता, का उन्हाचा ताप न्हवता. कौलाच्या गार सावलीत अक्षरांची वळख करून घेत हुतो. बरं वाटायचं.

शिक्षणाच्या निमित्तानं निदान सुख तरी मिळतंय. पर सातवे दिवशी ऐतवारी मरण हुबं व्हायाचं. सात आठ भारं बडवाय लागायचं. दादा नुस्ता पिळा करून टाकायचा. मग पोतं न्हाईतर धडपं घेऊन आढळगाव गाठायचा. आई मागनं भाकरी घेऊन यायची, तशी म्हस शिरल्यागत पाण्यात शिरायची. खळाखळा पिळं खंगळी करायची. पिळं धुऊन नितळलं की उन्हात टाकायचं, सावकाशीनं आंग घासून आंघुळी करायच्या. कापडं धुयाची. कुठला साबण ! दगडानं आंग घासायचं लालचुटुक हुईस्तवर. तवा साकळकर गुरुजीचं ध्यान व्हयाचं .

सारं उरकलं की, लिंबाच्या सावलीत बसून पोटावर पडायचं. फुडं येईल ते पोटात भरायचं. भुका लागलेल्या असायच्या, म्हणताना चव धरायची न्हाय. त्यात आई बोलायची, ” तुमचा बा गेलाय; सांजेला चांगलं खाया भेटलं. दोन वाट आणाय सांगिटल्यात शिजलं की पैलं तुमास्नी देईन. ” तेवढंच मनात धरून उठायचं. आळाशा बांधायच्या. झोडपून, चोपून भारं घातलं की, ऊन उतरल्यावर दादा यायचा. ऐतवारचं दादा घरचं खायाचा न्हाई. त्याला तिकडं भिका खायाला घालायचा. रेडा न्हाईतर म्हस कापायचा. त्याच्या हेळ्याचं कोरड्यास करायचा. हेळा कवाच वाटपावर घालायचा न्हाई. असा दादा हेळ्याचं कोरड्यास खायाला सोकलेला.

कवा आम्ही हेळा मागितला तर, इनूसभाई न्हाई तर गुलाबभाई, न्हाईतर चंदूभाईच्या दुकानातून आणायचा. त्या ऐतवारी दिवसभर कष्ट उपसत हुतो. मनाला हुरहूर लागलेलो. कवा दादा आढळगावाला जातो असं होऊन गेलेलं… दिवस लवकर जावा. सांजेला घाडगेकाकाला डल्ली दाखवायची… हुरपानं कष्ट रेटाय लागलेला. धावपळ करून मी घाणा मांडायचा. बडवलेला घाणा पाण्यात न्हेऊन टाकायचा. ही धांदल बघून दादाला, भाऊला काय वाटलं कुणाला ठावं. दादा खदखदून हासला. मला कळलंच न्हाई. दादा, भाऊ का हासत्यात.

कामाच्या गडबडीत काय झालं ? कळलंच न्हाई. तवा भाऊ बोललाच,

” उत्तम, काय रं हे ? ” भाऊनं वानराचं शेपूट धरावं तसं माझ्या लंगुटाची फिटलेली पडधुनी धरली. मला लाजल्यागत झालं.

” तुला लंगुटी फिटलेली सुद्ध न्हाय. इतकं मन लाऊन आज कष्टात गुतलास. गुलामा, मला ठावं हाय; तुला सांजला धाऱ्या गुडसा मिळावा म्हणून, ही मनधरणी न्हवं का ? चांगली खव. न्हाईतर पुन्हींदा फिटंल. नागवं दिसलं तर आम्हांला दिसभर आन मिळायचं न्हाय.

मन सारखं आढळगावाकडं लागलेलं. लिंबाच्या शेंड्याला जाऊन आढळगावची वाट बघायचो. वाट मेल्यागत वाटायची. कुणी येताना दिसलं की, मन आभाळात मायाचं न्हाई. दादा नसल्याची खात्री झाली की, मनाचा चुरमुरा व्हयाचा. घराकडं आलो तसं दादा नळावर गेला. आई गेली कोरान्नेताईकडं मिरच्या मागायला. भाऊ नाक्षारीला घेऊन गेला. मी दारात हुबा. तवर घाडगेकाका आलं. मोठा गड जितून आल्यागत घाडगेकाकाला बोलावलं, “ या, या, काका.

“शाळंत आसल्यावर गुरुजी म्हणायचो, न्हाईतर काकाच. काका लगबगीनं आलं. ” काका, ह्याला डल्ली म्हणायचं. हे गुडसं, हे दोन धारे, हे चाकळे, हे मुठे, ह्यात, या धाऱ्यात लई वसू असतू. तुपागत लागतू. हे इव्याचं मांस, यो उरकुंदा. ” असं सांगत हुतू तवर दादा नळावरनं पाण्याची घागर घेऊन आला. काकाला खोपटात बघून भेदरला, ” काय काका,

ह्या वक्ताला गरिबाच्या खोपटात ? ”

“आलो होतो उत्तम काय करतो बघायला.

” दादानं घागर उतरून खाली ठवली. तवर मला घाम फुटलेला. पळून जावंसं वाटलेलं. ” आराचरा हे काय सायबाच्या फुड्यात मांडलंसा ? उचल, उचल. ” काय बोलायचं ? वाचा गेल्यागत फुड्यातलं वडून बाजूला घतलं. काका बाहीर गलं,

” बंडूनाना, तुम्ही हे का खाता ? तुम्हाला खायाचं असलं तर बकरं, कोंबडं खा..

क्रमशः
स्रोत:(उत्तम बंडू तुपे यांच्या काट्यावरची पोटं या कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading