दिनांक ७ मार्च २०२५, श्रीगोंदा:
श्रीगोंदा पोलिसांनी दहशतवाद विरोधी पथक (नाशिक युनिट) यांच्या सहकार्याने बनपिंप्री शिवारातील एका हॉटेलवर छापा टाकून अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले. या महिलांकडे कोणत्याही प्रकारचे वैध कागदपत्र आढळले नाहीत, तसेच त्यांचे मोबाईल क्रमांक आणि IMO अॅपवरील संपर्क तपासल्यावर बांगलादेशशी त्यांचा थेट संबंध असल्याचे स्पष्ट झाले.

दहशतवाद विरोधी पथकाच्या (नाशिक युनिट) अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, ७ मार्च २०२५ रोजी श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक गणेश अहिरे यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर श्रीगोंदा पोलिस आणि दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरीत्या छापा टाकण्याचे नियोजन केले. या मोहिमेत पोलीस उप निरीक्षक गणेश अहिरे, दहशतवाद विरोधी पथकाचे स.पो.नि. दत्तात्रय नलावडे, पो.उ.नि. सुखदेव मुरकुटे, सफौ भगवान गांगर्डे, मपो.कॉ. प्रमिला उबाळे, पो.शि. योगेश भापकर, होमगार्ड विशाल गोरखे, महिला होमगार्ड दीपाली मोटे यांचा समावेश होता.

सकाळी ६:१५ वाजता शासकीय वाहनाने बनपिंप्री येथील हॉटेलवर छापा टाकण्यात आला. पोलिसांनी संशयित महिलांकडे भारतात येण्यासाठी आवश्यक पासपोर्ट आणि व्हिसा असल्याबाबत विचारणा केली. मात्र, त्यांच्या जवळ कोणतीही अधिकृत कागदपत्रे आढळली नाहीत. तसेच, मोबाईल तपासणीदरम्यान त्यांचे बांगलादेशातील नातेवाईकांसोबत IMO अॅपद्वारे संपर्क असल्याचे आढळले. त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये +880 या बांगलादेशी कोडचे क्रमांकही सापडले.

तपासानंतर नमुद चारही महिला घुसखोर असल्याची खात्री झाल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत त्यांच्याकडील मोबाईल व अन्य वस्तू जप्त करून त्या सीलबंद केल्या. या महिलांविरुद्ध पारपत्र (भारतात प्रवेश) नियम १९५० कलम ३ (a) सह ६(a), परकीय नागरिक आदेश १९४८ परीच्छेद ३(१), परकीय नागरिक कायदा १९४६ कलम १४ आणि भारतीय न्याय संहिता ३३६(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई श्रीगोंदा पोलिस व दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे केली असून, पुढील तपास सुरू आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)

Advertise..
