दिनांक २१ ऑगस्ट २०२५, श्रीगोंदा :
श्रीगोंदा तालुक्यातील सुरोडी गावच्या सरपंच मीनाक्षी सकट यांच्यावर काही दिवसांपूर्वी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या भीषण घटनेत त्यांच्या अंगावर आणि गाडीवर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हल्ल्यात त्या किरकोळ जखमी झाल्या. तर, राज्यभरातून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
सध्या शिव, फुले, शाहू, आंबेडकरी, पुरोगामी संघटना आणि विविध संघटनांचे पदाधिकारी श्रीगोंदा पोलीस ठाण्यासमोर, उपविभागीय पोलीस कार्यालय तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. पोलिसांवर आरोपीचा शोध घेऊन तातडीने अटक करण्यासाठी दबाव आणला जात आहे.

दरम्यान, तपासात मोठी प्रगती झाली आहे. घटनास्थळी वापरण्यात आलेले पेट्रोल कोणत्या पंपावरून खरेदी करण्यात आले.. याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे.? तसेच हल्ल्यात वापरण्यात आलेली माचिसची डब्बी हस्तगत करून ती फॉरेन्सिक तपासणीसाठी सुपूर्त करण्यात आली आहे. यामुळे पोलिसांना सबळ पुरावे मिळविण्यात मदत झाली आहे.
📌 फिर्यादीत काय म्हटले आहे?
दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८:१० वाजता पीडिता आपल्या मुलासह स्कुटीवरून जात असताना संशयित आरोपीने तिच्या डोळ्यांवर बॅटरी चमकावली. त्यानंतर गाडी खाली पडल्यावर आरोपी जवळ येऊन, “माझ्यावर दाखल केलेली केस मागे घे, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही,” असे धमकावत पीडितेच्या अंगावर व स्कुटीवर पेट्रोल टाकले. यानंतर आरोपीने तिच्या केसांना धरून मारहाण केली आणि माचिस पेटवून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पीडिता बाजूला झाल्याने पेटलेली काडी तिच्या स्कुटीवर पडली आणि स्कुटी जळून खाक झाली. पीडितेच्या साडीला देखील पेट लागून त्या जखमी झाल्यात. यानंतर आरोपी मोटरसायकलवरून पळून गेला.

जमिनीचा वाद..:
याआधी जमिनीच्या वादातून पीडितेने आरोपीविरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर आरोपीवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच वादातून सूड उगवण्यासाठी नमूद महिलेवर याअगोदर एकदा हल्ला करण्यात आला होता. त्यात त्यांचा मुलगा किरकोळ जखमी झाला होता. यासाठी पिडीतेने आरोपी अटक करण्यासंदर्भात आंदोलनाचा निर्णय घेतला होता. मात्र काही कारणास्तव ते आंदोलन होऊ शकले नाही.
आरोपी अटक करण्यात तांत्रिक अडचणी:
जळीत प्रकरणातील संशयित आरोपी हा सर्वसाधारण मजूर कुटुंबातील असून, त्याच्याकडे अँड्रॉइड मोबाइल नसल्याने पोलिसांना सीडीआर मिळाला असला.. तरी लोकेशन ट्रेस करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे तपासात तांत्रिक विलंब झाला असतानाही पोलिसांनी महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केले आहेत.

घटनेचा निषेध:
राज्यभरातील पुरोगामी संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते या घटनेचा निषेध करत आहेत. पोलिसांवर दबाव वाढत असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी जोर धरत आहे.
पोलिसांच्या हाती सबळ पुरावे:
पोलिसांच्या हाती आलेली पेट्रोल पंपावरील खरेदीची व्हिडिओफुटेज आणि माचिसची डब्बी हे महत्त्वाचे पुरावे ठरत आहेत. त्यामुळे लवकरच आरोपीला अटक होऊन या प्रकरणाचा तपास पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सामाजिक सलोखा राखावा.
काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक मुद्दा उपस्थित होणाऱ्या प्रकरणांमध्ये घटनेची वस्तुस्थिती आणि प्रशासकीय भूमिका लक्षात घेऊन आपले अभ्यासपूर्ण मत आणि निदर्शन नोंदवली पाहिजेत. जेणेकरून सामाजिक सलोखा राखण्यात मदत होईल. असे स्पष्ट केले आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)



Check out this shop on Meesho – https://www.meesho.com/MSANVIKINTERNATIONAL?_ms=3.0.3
