दिनांक २२ ऑगस्ट २०२५, श्रीगोंदा:
रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी विद्यालय, बेलवंडी बुद्रुक येथे दहावीच्या १९९६-९७ बॅचचा भव्य गेट-टुगेदर रविवारी (दि. १०) उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. तब्बल २८ वर्षांनंतर जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट झाल्याने परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमासाठी त्यावेळचे शिक्षक परिवेक्षक सय्यद सर (वय ८१), जगताप सर, टकले सर, प्राचार्य पवार सर, घोडेकर सर हे विशेषतः उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सय्यद सर यांनी भूषवले.

शाळेच्या आठवणींनी आणि प्रवासाच्या कहाण्यांनी भरलेला हा मेळावा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला. सुरुवातीला परिचय सत्र झाल्यानंतर प्रत्येकाने मनोगते व्यक्त केली. शाळेतील दिवसांपासून आजवरचा प्रवास सांगताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आले.
कार्यक्रमात बोलताना सय्यद सर म्हणाले, “२८ वर्षांनंतर तुम्ही मला बोलावले ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. पैसा महत्त्वाचा आहेच, पण तो सर्वस्व नाही. जिवाभावाची माणसे कमवा, आरोग्य सांभाळा आणि मुलांवर चांगले संस्कार करा. पुढील पिढी घडवणे हीच खरी कमाई आहे.” वयाच्या ८१ व्या वर्षी देखील त्यांनी राशीन येथून येऊन उपस्थित राहण्याच कष्ट घेतल्याने सर्व मित्र-मैत्रिणींनी त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.

या गेट-टुगेदरमध्ये सामाजिक बांधिलकी जपत एक विद्यार्थिनीच्या मुलाच्या उपचारासाठी तब्बल ४० हजार रुपये मदत करण्यात आली. तसेच दुसऱ्या वर्गमैत्रिणीला ५ हजारांची मदत देण्यात आली. या उपक्रमात विठ्ठल लबडे, नाना उनवणे यांच्यासह सर्व वर्गमित्र-मैत्रिणींनी सहभाग घेतला.

हा अविस्मरणीय मेळावा यशस्वी करण्यासाठी कल्याण लबडे, मिनिनाथ अडागळे, जयश्री काळाणे, वनीता घोडेकर, वैशाली लाढाने, वंदू गिऱ्हे, अंबादास लबडे, राजू पवार, आप्पा आरकस, विनोद भोसले, विश्वास भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेचे प्राचार्य खेडकर सर, लबडे सर, शेलार सर आणि त्यांच्या टीमनेही खास सहकार्य केले.

सूत्रसंचालन नारायण खराडे यांनी केले तर आभारप्रदर्शन सुनील ढवळे यांनी मानले.
कार्यक्रमानंतर मित्र-मैत्रिणींनी एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला तसेच विविध खेळांचा आनंद घेत पुन्हा एकदा शालेय जीवनाचा गोड अनुभव घेतला. २८ वर्षांनी झालेला हा गेट-टुगेदर सर्वांच्या आयुष्यात कायमस्वरूपी स्मरणात राहणारा ठरला.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
