“श्रीगोंद्याच्या या शाळेत शिक्षकाची क्रूरता..!; अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरुध्द पालकांचा आक्रोश”.. धिंड काढण्याचा निर्णय…! मात्र…

दिनांक २८ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरातील एका नामांकित शाळेत काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन शाळकरी मुलावर झालेल्या शिक्षकाच्या मारहाणीमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर संतप्त पालकांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून, या घटनेने शिक्षण क्षेत्रावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

साधारण चार-पाच दिवसांपूर्वी श्रीगोंद्याच्या एका प्रसिद्ध शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला. एका लहान मुलाला त्याच्या शिक्षकाने इतक्या क्रूरतेने मारले की, त्याच्या अंगावर वळ उठले. मारहाणीमुळे मुलगा मानसिकदृष्ट्या खूपच दडपणाखाली गेला होता. घरी आल्यानंतर त्याच्या पालकांनी हा प्रकार लक्षात घेतला. त्यांनी मुलाकडून संपूर्ण माहिती मिळवून या गंभीर घटनेबाबत शाळा प्रशासनाकडे विचारणा केली.

या घटनेनंतर संतप्त पालक आणि त्यांच्या समर्थकांनी एकत्र येत संबंधित शिक्षकाविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली. काही पालकांनी संताप व्यक्त करत शिक्षकाची धिंड काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, स्थानिक राजकीय नेत्यांनी प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला आणि प्रकार दडपण्याचा आरोप पालकांनी केला आहे.

तालुका शिक्षणाधिकारी सत्यजित मच्छिंद्र यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांचा काही प्रतिसाद मिळाला नाही. मागील काही महिन्यांत तालुक्यात शिक्षण क्षेत्रात असे प्रकार सातत्याने घडत आहेत. काही दिवसांपूर्वी आदिवासी विद्यार्थ्यांकडून टॉयलेट स्वच्छतेचे काम करून घेतल्याची घटना उघड झाली होती. आता पुन्हा एका अल्पवयीन मुलावर शिक्षकाकडून मारहाणीचा प्रकार उघडकीस आल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे.

या घटनेनंतर संतप्त पालकांनी आरोपी शिक्षकावर कठोर कारवाई होण्याची मागणी केली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबतही पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.

स्रोत: अधिकृत माहितीनूसार

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading