शिक्रापूर-न्हावरे महामार्गावर भीषण अपघात: बाप-लेकीसह मामाचा मृत्यू, श्रीगोंद्यातील युवकाचाही समावेश..

दिनांक २५ मार्च २०२५, शिक्रापूर/श्रीगोंदा:

शिक्रापूर ते न्हावरे राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. मालवाहू कंटेनरने समोरून येणाऱ्या स्विफ्ट कारला धडक दिल्याने झालेल्या या अपघातात न्हावरेतील बाप-लेकीसह लेकीच्या मामाचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

कैलास गायकवाड हे त्यांच्या ताब्यातील एमएच १६ सीव्ही ४१७६ या स्विफ्ट कारमधून त्यांच्या पत्नी, मुलगी आणि मेव्हण्यासह शिक्रापूरहून न्हावरे दिशेने जात होते. त्याच वेळी न्हावरे बाजूकडून भरधाव आलेल्या एनएल ०५ जी २३९६ या कंटेनरवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोरून आलेल्या स्विफ्ट कारला जोरदार धडक बसली. अपघात इतका भीषण होता की, कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात मृत्युमुखी पडलेले

  1. कैलास उर्फ दादा कृष्णाजी गायकवाड (वय ५०, रा. निवाळकर वस्ती, न्हावरे, ता. शिरूर, जि. पुणे)
  2. गौरी कैलास गायकवाड (वय १८, रा. निवाळकर वस्ती, न्हावरे, ता. शिरूर, जि. पुणे)
  3. गणेश महादेव नेर्लेकर (वय २३, रा. कोकणगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर)

गंभीर जखमी

  • दुर्गा कैलास गायकवाड (वय ४५, रा. निवाळकर वस्ती, न्हावरे, ता. शिरूर, जि. पुणे) या गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघात होताच कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी रवींद्र महादेव सोनवणे (वय ३८, रा. कुटेवस्ती, न्हावरे, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्या आधारे पोलिसांनी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवाजी भोते करत आहेत.

या भीषण अपघातामुळे न्हावरे गावात शोककळा पसरली आहे. स्थानिक प्रशासन व पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू असून, या महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांतून चिंता व्यक्त होत आहे.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading