दिनांक १८ मार्च २०२५ श्रीगोंदा:
बारामती शहर पोलीस ठाण्यात एका महिलेविरोधात व्यवसायिकाला ब्लॅकमेल करून साडेचार लाख रुपये लुटल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील दोघेही बारामतीतील रहिवासी नसून, पुरुष फिर्यादी श्रीगोंदा तालुक्यातील तर महिला कोरेगाव तालुक्यातील आहे.

बारामती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय न्याय संहिता कलम ३०८(२), ३०८(३), ३५१(२), ३५१(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवार (वय ३९, व्यवसाय-ट्रान्सपोर्ट, रा. बारामती, मुळगाव श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली होती.

त्यानुसार, आरोपी महिला (वय ३८, रा. बारामती, मुळगाव कोरेगाव, जि. सातारा) हिने त्यांच्याकडून बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पैसे आणि मौल्यवान वस्तू उकळल्या.

१३ ऑगस्ट २०२४ ते १७ मार्च २०२५ या कालावधीत वेळोवेळी हा प्रकार घडला. पवार यांच्या म्हणण्यानुसार, महिलेकडून सातत्याने ब्लॅकमेल केले जात होते. धमकी देत वेळोवेळी पैशांची मागणी करण्यात आली. एकूण २,८१,६०० रुपये रोख आणि १,६८,००० रुपयांचे हिऱ्याचे मंगळसूत्र पवार यांच्याकडून उकळले गेले.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार खाडे पुढील तपास करत आहेत. महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Advertise..
