लिंपणगाव येथील गट क्र. १३०/१ प्रकरणात तहसीलदारांच्या आदेशावर शंका: स्थानिक प्रशासनाचा निर्णय की, राजकीय हस्तक्षेपाचा डाव..? पिडीताचा उपोषणाचा इशारा..!

दिनांक २३ जानेवारी २०२५, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील गट क्रमांक १३०/१ प्रकरणात तहसीलदारांच्या आदेशावर शेतकऱ्यांनी गंभीर आक्षेप घेतला आहे. या प्रकरणात अशोक नामदेव वाल्हेकर व इतर २८ जणांनी बोगस नाव दाखवून स्थानिक प्रशासनाला हाताशी धरल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात दिलीप संभाजी कुरुमकर यांनी एक लेखी निवेदन प्रसिद्ध करून आपली बाजू मांडली आहे.

तहसीलदार श्रीगोंदा यांच्या आदेशानुसार, गट क्र. १३०/१ मध्ये शहाजी संभाजी कुरुमकर नावाच्या व्यक्तीच्या हक्कासाठी पोलीस बंदोबस्तात रस्ता खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा आदेश २८ जुलै २०२० रोजी दिला गेला असून, त्यानुसार २४ जानेवारी २०२५ रोजी आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

परंतु, गट क्रमांक १३०/१ मध्ये शहाजी संभाजी कुरुमकर अशी कोणीही व्यक्ती अस्तित्वात नाही, असा दावा दिलीप संभाजी कुरुमकर यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, सदर उताऱ्यातील अधिकृत नाव त्यांच्या स्वतःचे असूनही त्यांना २०१८ ते २०२० दरम्यान स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही.

दिलीप कुरुमकर यांच्या मते, प्रशासनाने त्यांना अंधारात ठेवत अन्यायकारकपणे आदेश काढला आहे. त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की, चुकीच्या नावाच्या आधारावर आदेश कसा निघाला.? तसेच, वास्तविक उताऱ्यातील मालकाला कोणतीही नोटीस न देता आदेश लागू करणे हा अन्यायकारक आणि बेकायदेशीर निर्णय आहे.

दिलीप कुरुमकर यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, त्यांनी तहसील कार्यालय श्रीगोंदा येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

स्रोत:(प्रेस नोट)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading