दिनांक २४ जानेवारी २०२५, श्रीगोंदा:
चांडगाव आणि भिंगाण दरम्यान काल रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत चोरट्यांनी शेतकऱ्यांवर हल्ला करत दोन जणांना गंभीर जखमी केले आहे. शेळ्या चोरीसाठी आलेल्या चोरट्याने शेतकऱ्यांवर चाकूने हल्ला करत पायावर व हातावर गंभीर जखमा केल्या.

हा चोरटा स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आला व श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला. मात्र, सकाळी हा आरोपी पोलिसांनी सोडल्याचे उघडकीस आल्यानंतर नागरिक व शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे.

पोलिसांच्या भूमिकेवर संशय:
सदर घटनेनंतर पीडित शेतकऱ्यांनी पोलिसांच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. पीडित व त्यांच्या समर्थकांनी पोलिस ठाण्यात गाठले असता, आरोपीला भारतीय हत्यारबंदी कायद्यानुसार सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेस पात्र गुन्ह्यांमध्ये अटक न करण्याच्या नियमावरून सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, या निर्णयामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे.

संभाजी ब्रिगेडकडून आंदोलनाचा इशारा:
या घटनेनंतर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे यांनी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने श्रीगोंदा तालुक्यातील अनागोंदी कारभार, वाढते अवैध धंदे, आणि पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करणारे धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. कापसे यांच्यासोबत नाना शिंदे व अन्य शेतकरी पदाधिकारीही या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

शेतकऱ्यांवर गंभीर हल्ला करणाऱ्या आरोपीला गुन्ह्याच्या स्वरूपावर आधारित सोडून देण्यात आले, परंतु यामुळे शेतकरी व नागरिकांच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या प्रकरणातील पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत, आगामी आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला जाग आणण्याचा निर्धार पीडितांनी व्यक्त केला आहे.

सदर प्रकरणात आरोपीला का सोडले?, याची संपूर्ण चौकशी व्हावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व शेतकरी संघटनांनी केली आहे. “कायद्याचा वचक दाखवण्यासाठी आंदोलन अपरिहार्य झाले आहे,” असे मत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष कापसे यांनी व्यक्त केले आहे.
स्रोत:(अधिकृत माहितीनूसार)
