अर्ध्या शतकानंतर पुन्हा जुळणार मैत्रीचे सूर.! श्रीगोंद्यात १९७६ च्या बॅचचा रंगणार ‘स्नेहमेळावा’..

दिनांक १८ मार्च २०२६ श्रीगोंदा:

काळाच्या ओघात विखुरलेले सवंगडी, हरवलेला तो शाळेचा कट्टा आणि पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या सोनेरी आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्यासाठी श्रीगोंद्यातील १९७६ च्या बॅचचा भव्य स्नेहसंमेलन मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

तब्बल ५० वर्षांनंतर प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन काळातील मित्र-मैत्रिणी पुन्हा एकत्र येणार असल्याने या आगळ्यावेगळ्या मेळाव्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दिनांक १२ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या कोअर कमिटीच्या विशेष बैठकीत या मेळाव्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

मेळाव्याचे आयोजन श्रीगोंदा येथील ‘A स्टार हॉटेल’ व ‘महादजी शिंदे विद्यालय’ येथे करण्यात आले असून, ज्या शाळेत शिक्षणाचे बाळकडू मिळाले, त्याच महादजी शिंदे विद्यालयाच्या प्रांगणात जाऊन आपल्या आदरणीय गुरुजनांचा सन्मान करणे, हा या सोहळ्याचा सर्वात भावनिक क्षण असणार आहे.

या मेळाव्यासाठी कोणत्याही प्रकारचे सक्तीचे शुल्क ठेवण्यात आलेले नाही. आर्थिक योगदान पूर्णपणे ऐच्छिक असून, ज्यांना सहकार्य करायचे आहे त्यांनी श्री. शशिकांत आंधळकर यांच्याकडे आपली रक्कम जमा करावी असे सूचित करण्यात आले आहे.

कोअर कमिटीच्या बैठकीस सतीश बोरा, पांडुरंग खेतमाळीस, शशिकांत आंधळकर, रामदास घोडेकर, भास्कर नरके, दत्तात्रय शिंदे, सुनील गांधी व दीपक घोडके या मान्यवरांनी उपस्थित राहून नियोजनाचा आढावा घेतलाय.

अनेक दशकांनंतर मित्र-मैत्रिणी एकत्र येणार असल्याने गप्पांच्या मैफिलीत जुन्या खोड्या, वर्गातील किस्से आणि आयुष्याच्या प्रवासातील अनुभव मांडले जाणार आहेत.

या मेळाव्यास १९७६ च्या बॅचमधील मित्रांनी आणि मैत्रिणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा सोहळा अविस्मरणीय करावा, असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

काळ कोणासाठी थांबत नाही, हे खरं असलं तरी काही क्षण मात्र काळजाच्या कोपऱ्यात कायमचे कोरलेले असतात. पन्नास वर्षांपूर्वी शाळेच्या कट्ट्यावर विखुरलेली ती ‘पाखरे‘ पुन्हा एकदा या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने आपल्या जुन्या घरट्यात परतणार आहेत.

तब्बल पाच दशकांनंतर जुने मित्र-मैत्रिणी एकत्र येणार असल्याने, संपूर्ण वातावरणात एक वेगळीच भावनिक ओढ निर्माण झाली आहे.

शाळेच्या त्या वर्गातून बाहेर पडताना प्रत्येकाच्या मनात भविष्याची स्वप्ने होती. आज पन्नास वर्षांनंतर मागे वळून पाहताना गदिमांच्या ओळींची प्रकर्षाने आठवण येते

“अशी पाखरे येती आणि स्मृती ठेऊनी जाती..
दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती..”

शिक्षण संपवून आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटांवर गेलेली ही पाखरे आता अनुभवांची शिदोरी घेऊन पुन्हा एकत्र येत आहेत. कुणी व्यापारात नाव कमावले, कुणी शिक्षण क्षेत्रात, तर कुणी प्रशासनात; पण २१ मार्च रोजी जेव्हा हे सर्वजण भेटतील, तेव्हा ते केवळ ‘१९७६ चे विद्यार्थी’ असतील  यात शंका नाही..

शाळेच्या दिवसांतील तो निळासावळा झरा आणि टेकडीकडचे ते छोटेसे गाव आजही अनेकांच्या डोळ्यांसमोर उभे असेलच.

“श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे.. क्षणात येते सरसर शिरवे.. क्षणात फिरुनी ऊन पडे..”

आयुष्यातील ऊन-सावल्यांचे खेळ अनुभवल्यानंतर, आता पुन्हा एकदा त्या बालपणातील ‘हिरवळीचा’ आणि आनंदाचा अनुभव घेण्यासाठी सर्व मित्र सज्ज झाले आहेत.

ज्या काळात तंत्रज्ञान नव्हते, मोबाईल नव्हते, फक्त मनांची ओढ होती, त्या काळातील आठवणींना उजाळा देताना कुणीतरी म्हटल्याप्रमाणे..

“एल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन,
निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटांतून..
चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे…”

अगदी याच ओळींप्रमाणे, त्याकाळी श्रीगोंद्याच्या छोट्याशा गल्ल्यांमधून, महादजी शिंदे विद्यालयाच्या त्या जुन्या इमारतीत शिक्षणाचे धडे गिरवणारे हे विद्यार्थी आज वयाची साठी ओलांडल्यानंतर पुन्हा एकदा त्याच ‘निळ्या सावळ्या’ आठवणींच्या झऱ्याकाठी एकत्र येऊन तृप्त होतील..! हे मात्र नक्की..

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading