श्रीगोंद्यात अन्यायाचा कळस..! कॉलेज तरुणाला जनावरासारखं बांधून केली मारहाण.. अनं त्याचा व्हिडिओ बनवून केला इंस्टाग्राम वर शेअर..!

दिनांक ८ डिसेंबर, श्रीगोंदा:

शहरातील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात अकरावी कला शाखेत शिकणाऱ्या एका तरुणाला वर्गात शिकत असताना बेंचवर बसण्याच्या कारणावरून झालेल्या वादातुन मारहाण करण्यात आली. अक्षरश: जनावराला दाव्याने बांधतात तसे त्या तरुणाला बांधून लाकडाने/लाथाबुक्यांनी जबर मारहाण करत, त्याचे चित्रीकरण करून, तो व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर अपलोड करण्यात आला.

या प्रकरनाप्रमाणे टवाळखोरांचा हैदोस शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्यातच घडलेल्या घटनेनंतर नमूद मारहाण करणाऱ्या दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चित्रीकरण करणाऱ्या व घेऊन जाणाऱ्या निळ्या रंगाचा मोपेड गाडीचा पोलिस तपास करत आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदा शहरातील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात अकरावी कला शाखेत शिकणाऱ्या ओमकार गलांडे या घुगल वडगाव येथील युवकाला दिनांक ७ डिसेंबर २१ रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास कॉलेज सुटल्यानंतर पियुष घोडके व रोहित घोडके राहणार सिद्धार्थनगर, श्रीगोंदा या दोघांनी पेट्रोल पंपावर जाऊ, तुझ्याकडे एक काम आहे असे म्हणत, त्यांचे कडील मोपेड गाडी वरून बसवून नेले.

ईसार पेट्रोल पंपा शेजारी फॅक्टरी रोड लगत असलेल्या बागेत पियुष व रोहित यांनी ओंकारला दम दिला की, अश्पाक सय्यद व कपिल शेख यांचे सोबत का भांडण केले? म्हणून, शिवीगाळ करत पडलेल्या लाकडी काठ्या घेऊन ओंकारला मारहाण करण्यात आली. यामध्ये ओंकार गंभीर जखमी झाला आहे. आमच्या नादी लागला तर तुला श्रीगोंद्यात येणे कठीण करून टाकु..! असा दमही त्याला दिला. हे सर्व होत असताना ओंकारला रस्सीने हाताला बांधले व पडलेल्या लाकडी दांड्याने त्याला जबरी मारहाण केली.

या सर्वाचं चित्रीकरणही तेथे उपस्थित रोहित व पियुष यांच्या मित्रांनी केले आणि हा मारहाणीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर टाकण्यात आला. शिक्षणाच्या प्रवाहात येणार्‍या सर्वसामान्य कुटुंबातील युवकावर जर शहरातील गुंड प्रवृत्तीचे लोकं दहशत करत असतील आणि त्यांना जनावरा सारखं बांधून मारहाण करत त्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर टाकून दहशत बनवत असतील. तर, हे सर्व अतिशय निंदनीय व अमानवी आहे.

दिनांक २७ नोव्हेंबर २१ रोजी दुपारी २:३० वाजताच्या सुमारास बाकावर बसण्याच्या किरकोळ कारणावरून ओमकार सदाशिव दांगडे व अस्पाक सय्यद अनं कपिल शेख दोघे राहणार शनी चौक यांच्यात वाद झाला होता. सदर वाद आपापसात मिटला पण होता. परंतु, या वादाचा आधार घेत पियुष व रोहित यांनी ओंकारला जबरी मारहाण करून, त्याचा व्हिडिओ बनवला व सर्व कॉलेजमध्ये दहशत पसरवण्याचे काम केले.

याबाबत ओंकारने श्रीगोंदा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. त्याने दिलेल्या माहितीनंतर पियुष घोडके व रोहित घोडके राहणार सिद्धार्थ नगर, श्रीगोंदा या दोन्ही टवाळखोर युवकांवर भादवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, व ३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मारहाण करणारे रोहित आणि पियुष या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, निळ्या मोपेड गाडीवर ओंकारला घेऊन गेले. ती निळी मोपेड गाडी आणि घटनास्थळी मारहाणीचे चित्रीकरण करणारे इतर कोण ? याचा तपास आता पोलिस करत आहेत.

वर्गात घडलेल्या घटनेबाबत महाविद्यालयांच्या शिक्षकांना व प्राचार्यांना माहिती नसल्याचे… त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर समोर आले. महाविद्यालयाच्या कार्यक्षेत्रात अशा गंभीर घटना घडत असतांना स्थानिक शिक्षक व त्यांचे प्रशासन काय करते..? हाही मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. याबाबत महाराजा जिवाजीराव शिंदे जूनियर महाविद्यालयाचे प्राचार्य मखरे सर यांच्याकडूनही प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. तर, त्यांनी कार्यक्षेत्रात अशी कोणतीही घटना घडली नाही. शिवाय आम्ही अशा बाबतीत काळजी घेत आहोत. असेही त्यांनी माध्यमांना सांगितले आहे.

स्रोत:(दिनांक ७ डिसेंबर २१ रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल फिर्याद)

Leave a Reply