श्रीगोंदयात ‘रात्रीस खेळ चाले’…

महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून बेकायदेशीर उत्खनन..
अधिका-यांचे अवैध व्यावसायिकांसोबत साटेलोटे?..

दिनांक ९ डिसेंबर, श्रीगोंदा:

तालुक्यातील अजनुज येथे रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळुचे उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. वाळूने भरलेले डंपरची वाहतूक वन विभागाच्या हद्दीतून होत आहे. याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक नागरिकाने माहिती देऊन सुद्धा, कारवाई करण्यास अधिकारी धजावत नाहीत. अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून, अधिकारीवर्ग मात्र, याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत असल्याने यामागे मोठे ‘अर्थ’कारण दडले असल्याचा दाट संशय स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत.

शासनाकडून अद्यापही वाळू उत्खननला बंदी आहे. सायंकाळ झाल्यानंतर येथे कोणीही फिरकत नाही. याचा फायदा वाळू/गौण खनिज चोरांनी उचलला आहे. वाळू काढल्यानंतर ती लगबगीने डंपरमध्ये भरून तालुक्यात ठिकठिकाणी पोहचवली जात आहे. गेले दोन महिने हा सारा खेळ राजरोस उरकला जात आहे, अशी माहिती येथील स्थानिकांकडून मिळत आहे.

मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन होऊनही महसूलचे अधिकारी डोळेझाक का करीत आहेत? असा सवालही येथील स्थानिक ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. एकीकडे बेकायदेशीर वाळू उत्खनन केल्यास कारवाई केली जाईल, असे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. परंतु, अजनुज येथे होणारे वाळू उत्खनन संबंधित अधिका-यांच्या नजरेत येत नाही का?, या अधिका-यांनी ‘धृतराष्ट्र’ची भुमिका का घेतली आहे?, अधिका-यांचे वाळू व्यावसायिकांसमवेत साटेलोटे आहे का?, यामुळे शासनाच्या होणाऱ्या लाखो रूपयांच्या नुकसानीची भरपाई कशी होणार? आदी प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

स्रोत:(पत्रकार अनिल तुपे,श्रीगोंदा)

Leave a Reply