“बाबा मेलो तर विमानानेच घरी येईल ! अशी कामगिरी करायची मला”.. जवानांची विरगाथा…सचिन साके..शहीद दिनांक १७ सप्टेंबर १९९९ कोळगाव तालुका श्रीगोंदा..

सचिन साके..

आपल्या वडिलांपेक्षा मोठी कामगिरी करण्याचे ध्येय ठेवून सचिन सावळेराम साके यांनी बास्केट बॉल खेळात मुंबई, नागपूर, दिल्ली गाजविली आता देश गाजविण्याच्या जिद्दीने १९९६ साली सैन्य दलात भरती झाले. घरात त्यांची लगीनघाई सुरु असताना ते कारगील युद्धात उतरले. काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्ये झालेल्या लढाईत पाच पाकिस्तानी अतिरेक्यांना त्यांनी कंठस्नान घातले. मात्र, शुक्रवारची ती रात्र काळरात्र ठरली. अतिरेक्यांच्या बंदुकीतून सुटलेल्या एका गोळीने सचिन यांच्या डोक्याचा वेध घेतला, अन एकुलता एक लाडाचा लेक १७ सप्टेंबर १९९९ रोजी धारातीर्थी पडला. कारगील युद्धातील उल्लेखनीय कामगिरीमुळे साके यांचा मरणोत्तर सेना पदक देऊन लष्कर प्रमुखांनी सन्मान केला.

श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव ही जवानांची भूमी. सावळेराम साके यांना वडिलोपार्जित दोन एकर शेती. त्यामुळे सावळेराम साके हे भारतीय सैन्य दलात भरती झाले आणि सेवानिवृत्त झाले. सावळेराम व रंभाबाई यांना शोभा ही पहिली मुलगी झाली. त्यानंतर ३० एप्रिल १९७६ रोजी सचिन यांच्या रुपाने साके परिवारात वीर पुत्राचा जन्म झाला. सावळेराम साके यांनी सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर नागपूर महानगरपालिकेमध्ये नोकरी स्वीकारली. त्यामुळे सचिन यांचे बालपण नागपूरमध्ये गेले .

धरमपुरीमधील माध्यमिक शाळेत सचिनने बारावीपर्यंत शिक्षण घेतले. बास्केट बॉल खेळाडू म्हणून सचिन यांचा नागपूर शहरात लौकिक झाला. पुढे मुंबई, दिल्ली येथे झालेले राष्ट्रीय सामने त्यांनी गाजविले. सचिन घरात सर्वांचेच खूप लाडके होते. नागपूर शहरात एखाद्या कंपनीत सचिन यांनी जॉब करावा, अशी आई – वडिलांची इच्छा होती. पण कुणाला न सांगताच सचिन यांनी बेळगाव गाठले अन भरतीत १६ मराठा रेजिमेंट तुकडीत शिपाई म्हणून लष्कराच्या सेवेत दाखल झाले. घरी आल्यानंतर त्यांनी आई, वडिलांना सांगितले. त्यावेळी ते वडिलांना म्हणाले , ‘ बाबा , तुम्ही शिपाई म्हणून नोकरीला लागले आणि शिपाई म्हणून सेवानिवृत्त झालात. पण मी शिपाई म्हणून दाखल झालो असलो तरी साहेब म्हणून सेवानिवृत्त होईन. मला काहीतरी वेगळे करून दाखवायचे आहे. जरी मेलो तरी माझा मृतदेह विमानानेच येईल, अशी कामगिरी करणार आहे. मला आशीर्वाद द्या .

सचिन सैनिक म्हणून रणभूमिवर उतरले . आई – वडील आणि बहीण शोभाने सचिनसाठी गावाकडे मुलगी पाहण्यास सुरुवात केली . इकडे लगीनघाई अन काश्मीर खोजयात युद्धाची परिस्थिती काश्मीरमध्ये अशांतता माजली . भारत- पाक यांच्यातील वाद चिघळला . १ ९९९ मध्ये कारगील युद्ध सुरू झाले . त्यानंतर काश्मीर खोजयात मागे राहिलेल्या आतंकवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारताने रक्षक ऑपरेशन राबवले . सप्टेंबर १ ९९९ मध्ये काश्मीरमधील राजौरी सेक्टरच्या पहाडी क्षेत्रात अनेक अतिरेकी लपून बसले होते . या अतिरेक्यांना ठार मारल्याशिवाय पर्याय नव्हता . सचिन यांनी पाच अतिरेक्यांचा खात्मा केला . रात्रीच्या वेळी पहाडी शांतता पसरली होती . सचिन साके दरीत अतिरेक्यांवर लक्ष ठेवून होते . रात्रीची वेळ पाहून अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला . अतिरेक्यांच्या एका गोळीने सचिन साके यांच्या डोक्याचा वेध घेतला अन २३ वर्षीय सचिन साके हे १७ सप्टेंबर १ ९९९ रोजी शहीद झाले .

ही वार्ता समजताच श्रीगोंदा तालुका व कोळगाव परिसरात शोककळा पसरली. आई – वडील अन बहिणीने आक्रोश केला. माजी उपसभापती बाळासाहेब नलगे यांनी कोळगाव येथे सचिन साके यांचे स्मारक बांधण्यासाठी पुढाकार घेतला . त्यासाठी खासदार दिलीप गांधी यांनी पाच लाख रुपयांचा निधी दिला. सचिन साके व भाऊसाहेब तळेकर यांचे स्मारक कोळगावकरांचे शक्तिस्थान बनले आहे. बाबा ! तुम्हाला जे जमलं नाही . ‘ बाबा , तुम्हाला जे जमलं नाही ते मी करुन दाखवणार आहे. साहेब होईन, तुमचे नाव अभिमानाने मिरवीन , मेलो तरी माझे प्रेत विमानातून येईल , ‘ असे सचिन आपल्या वडिलांना म्हणायचा अन् तसेच झाले सप्टेंबर  १९९९ मध्ये त्याचे पार्थिव विमानातून आले. अन त्याचे ते लाडाचे बोल वारंवार आठवत राहिले , असे सांगताना वीरमाता रंभाबाई यांच्या दाटलेल्या अश्रृंचा बांध फुटला.

सेना पदक आणि दिल्लीत अश्रूंचा पूर

सचिन शहीद झाल्यानंतर दिल्लीला सेना पदक स्वीकारण्यासाठी गेले. त्यावेळी पदक स्वीकारताना लता मंगेशकर यांनी गायिलेले ‘ये मेरे वतन के लोगो’ हे गीत आठवले. ते पदक पाहून खूप रडले. शासनाने आम्हाला खूप दिले. पण मानवी आधार मिळाला नाही. गेल्या वर्षी पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आता मुलगी शोभा व जावई तुकाराम हे मायेचा ओलावा देण्यासाठी पुण्यातील घरदार सोडून माझ्याबरोबर राहतात. सचिनची आठवण मरेपर्यंत येत राहणार, अशी भावना वीरमाता रंभाबाई यांनी व्यक्त केली .

शब्दांकन : विशाल चव्हाण, पुण्यनगरी
(स्रोत:अग्निपंख फौंडेशन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading