पारधी कुटुंबाला लागला शेतीचा लळा, त्यातूनच फुलला डाळिंबाचा मळा.

दिनांक १५ जुलै,श्रीगोंदा:

पारधी समाजावर असलेला गुन्हेगारीचा शिक्का आपल्या कामाद्वारे पुसून टाकून प्रगतशील शेतकरी बनण्याचा संकल्प श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे राहणाऱ्या पारधी समाजाच्या तरुण पिढीने उचलला आहे आणि त्यातूनच दिवाण भोसले या तरुणाने यशस्वी डाळिंब उत्पादक शेतकरी होण्याचा मान मिळवला असून, पारधी समाजातील युवा पिढीला एक चांगला आदर्श घालून दिला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ पासून तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मडकेवाडी, शाहूनगर भागात पारधी समाजाची १० कुटुंबे राहतात. ३० वर्षांपूर्वी त्यांनी येथील गायरान जमिनीवर शेती करायला सुरुवात केलेली आहे. त्या काळात मानवी हक्क अभियान चे प्रमुख अॅड. एकनाथराव आव्हाड व ऍड. डाॅ. अरुण जाधव यांनी लोणी व्यंकनाथ येथील आसाराम काळे, विलास भोसले, सुभाष काळे, लैलंग काळे, गौरीलाल भोसले, राजु भोसले, रामदास भोसले, सुमन काळे, प्रभू भोसले, किरण भोसले, टाबर भोसले व संविधान भोसले या पारधी समाजातील कार्यकर्त्यांना मानवी हक्क अभियान मध्ये सहभागी करून घेतले. त्यांना त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी अरुण जाधव यांनी २५ वर्षे लढा दिला. त्या लढ्यातून पारधी कुटुंबांनी २२ एकर जमिनीवर ताबा मिळवला. व या जमिनीचे १० कुटुंबांना वाटप केले.

त्या गायरान जमिनीवर आता द्राक्ष, डाळिंब, मोसंबी, लिंबू, संत्रा, आंबे, कांदा, भुईमूग अशी नगदी पिके व फळ बागायती शेती ही कुटुंबे करू लागली आहेत. दिवाण फुलदास भोसले या तरुणाने श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्याचे आई-वडील फुलदास भोसले व आई हलिफा भोसले शेतात काबाडकष्ट करीत होते. त्यामुळे दिवाणनेही शेती काम सुरू केले. त्यापूर्वी जमिनीचे लेव्हलिंग करून घेतली. शेतात पोयटा माती टाकून घेतली. फळ बागायतसाठी शेतात विहीर व बोअर घेतले. दीड वर्षापूर्वी सुपर भगवा डाळिंबाची लागवड केली. त्यासाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था केली. खत टाकने, छाटणी, औषध फवारणी, ठिबक सिंचन, कीटकनाशक, बुरशीनाशक फवारणी करणे. फळाची चांगली वाढ व्हावी म्हणून स्वतंत्रपणे खत देणे ही कामे भोसले कुटुंबीयांनी केले. त्यामुळे एक डाळिंब ५०० ग्रॅम वजनापर्यंत पोसले. असून आता हे डाळिंब तयार झाले आहेत. एक एकर क्षेत्रावर दहा ते बारा टण डाळिंब उत्पादन होईल. सरासरी ५० ते ६० रुपये प्रति किलो भाव मिळाला.तर, चार ते पाच लाख रुपयांचे डाळिंब होईल. असा अंदाज दिवान भोसले यांनी व्यक्त केला आहे.

शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालन,,गाय पालन, म्हैस पालन कुक्कुटपालन हा व्यवसाय देखील केला जातोय. उर्वरित क्षेत्रावर कांदा व भुईमूग यासारख्या नगदी पिकातून फळबागायती साठी पैसे मिळवायचे आणि त्यातून मग फळबागा विकसित करायच्या असा पायंडा त्यांनी पाडला आहे. त्यामुळे आता पारधी समाजातील तरुणांना देखील शेती कामाचा चांगला लळा लागला आहे. कुकडी चारीच्या पाण्याचा लाभही हे शेतकरी घेतात. तर एप्रिल – मे या पाणी टंचाईच्या काळात शेततळ्याचा वापर त्यांनी सुरू केला आहे.

भोसले कुटुंबातील सदस्य दिवसातून किमान चार तास काम करतात. त्यामध्ये गवत काढणे, छाटणी करणे पाणी देणे आणि आता डाळिंब तोडणी सुद्धा तेच करणार आहेत. डाळिंब लागवड ते फळ तोडणी या दीड वर्षांच्या कालावधीत साधारणपणे दीड लाख रुपये खर्च आला असून त्यापासून आता किमान चार ते पाच लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे. गेल्या ३० वर्षांपासून कसत असलेल्या गायरान जमिनी शासनाने आदिवासी कुटुंबाच्या नावावर कराव्यात यासाठी आता त्यांचा संघर्ष सुरू आहे. कारण जमिनीचे उतारे निघत नसल्यामुळे या शेतकऱ्यांना कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. पिक विमा, नुकसान भरपाई, वीज कनेक्शन मिळत नाही. त्यामुळे गायरान जमिनी आदिवासी कुटुंबांच्या नावावर कराव्यात ही त्यांची शासनाकडे त्यांची प्रमुख मागणी आहे.

(स्रोत व शब्दांकन: भगवान राऊत अहमदनगर ९८२२८४४०८० यांची माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading