शिखर शिंगणापुरच्या मंदिराला कोळगावच्या धजाचा पहिला मान…

दिनांक ११ एप्रिल २०२४,कोळगाव:

गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी कोळगाव येथील महादेव मंदिरातील श्री महादेवाचा पोशाख म्हणजेच धजला १४० किलोमीटर अंतरावरील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथे अष्टमीला श्री शंकर व बळी मंदिराच्या कळसाला लावल्या नंतरच तेथील शंकर व पार्वती चे लग्न लावले जाते. कोळगाव येथून मोठ्या संख्येने भाविक त्यासाठी उत्साहाने रवाना झाले आहेत.

या परंपरेला अनेक वर्षाचा इतिहास आहे. कोळगाव मधील महादेव मंदिर छत्रपती शिवरायांच्या काळातील असावे असे मानले जाते. तर, परिसरातील आखीव रेखीव बारव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधली असावी, असे मानले जाते.

महादेव देवस्थान ची मालकी व मंदिर देवस्थानला असलेली २५० एकर जमीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या मालकीची आहे. त्या काळी ही जमीन साळी समाजाच्या व्यक्तींना सेवेकरी म्हणून इनाम देण्यात आली होती. या देवस्थानचा मानाचा ध्वज म्हणजेच पोशाख पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी प्रवास सुरू होऊन सहा दिवसानंतर शिखर-शिंगणापूर येथे सेवेकरी साळी महाराज व ग्रामस्थ पायी घेऊन जातात.

तेथे अष्टमीला हा ध्वज शिखर शिंगणापूरच्या बळी व महादेव मंदिराला लावला जातो. कोळगावच्या ध्वजाचा मान घेतल्यानंतरच शिंगणापूर येथील महादेव – पार्वती चे लग्न दुपारी बारा वाजता लागते. तेथून ग्रामस्थ नवमीला माघारी कोळगावला येतात व हनुमान जयंतीला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कोळगावचे कुलदैवत श्री कोळाईदेवीची यात्रा भरते. त्यामुळे छत्रपतींचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूरला कोळगावच्या ध्वजाचा विशेष मान असतो. हा ध्वज येथील मंदिरांना लावल्यानंतर इतर मानाचे हजारो ध्वज लावले जातात. दरवर्षी हजारो भाविक हा धज लावण्यासाठी १४० किलोमीटर अंतर चालत शिखर शिंगणापूरला पायी जातात.

सदर धज व कावडीची मिरवणूक गावातून काढली जाते व दुसऱ्या दिवशी गैबीनाथ मंदिरासमोरील माळावर हजारांच्या संख्येने भाविकांची उपस्थितीत या धजाचे प्रस्थान शिखर शिंगणापूरला केले जाते.

शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव हा महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव दोन्हीही यादव कुळातील चक्रवर्ती सिंधणदेव महाराजांनी वसवली आहे, असे म्हणतात. मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात पाच मोठे नंदी आहेत. देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघण राजा येथे येऊन राहिला होता.

स्रोत:(पत्रकार महेश शिंदे)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading