दिनांक ३ फेब्रुवारी, कर्जत:
कर्जत व जामखेड तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयासाठी कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून स्वच्छतागृह पेयजल हात धुण्याचे स्थानक या अद्ययावत सुविधां बरोबरच मास्क सॅनिटायझर व शालेय साहित्यासाठी तीन कोटी निधी खर्च करावयाचा असून, सर्व शाखा ह्या अद्यावत करावयाच्या आहेत. असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.
ते न्यू इंग्लिश स्कूल शिंदे येथे स्वच्छतागृह पेयजल हात धुण्याची स्थानक या अद्यावत सुविधांच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्कूल कमिटीचे अध्यक्ष रूपचंद अण्णा घालमे होते. ते पुढे म्हणाले की, शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी कोणत्याही प्रकारचे कमी पडू दिले जाणार नाही. विद्यार्थ्यासाठी लागणारे संगणक, साहित्य, खेळ साहित्य याच बरोबर सर्व सुख सुविधा देण्यासाठी मी रयत शिक्षण संस्थेशी बांधील आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अथक परिश्रमातून रयत शिक्षण संस्थेची निर्मिती केली व शिंदे यासारख्या छोट्या खेडेगावांमध्ये या शाखेचे रोपटे लावले. हे रोपटे आज वटवृक्षाप्रमाणे बहरत आहे. त्याचप्रमाणे या विद्यालयातील विद्यार्थी राज्यातील गुणवत्ता यादीमध्ये येत असल्याने, गुणवत्ता टिकून गुणवंत विद्यार्थी या विद्यालयातून इथून पुढे ही घडावेत. अशा विद्यार्थ्यांचा सर्वस्वी अभिमान आहे. असेही ते म्हणाले.
यावेळी अहमदनगर जिल्हा परिषद समाजकल्याण समितीचे सभापती उमेशजी परहर, कर्जत पंचायत समितीचे उपसभापती राजेंद्र (काका) गुंड, बाळासाहेब घालमे, श्रीहरी घालमे, सरपंच मधुकर घालमे ,संदीप घालमे, शहाजी घालमे, विठ्ठल शिंदे, मच्छिंद्र साबळे, यांच्यासह शिक्षण प्रेमी ग्रामस्थ पालक, विद्यार्थी, विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर उपस्थित होते.
स्रोत:(सतीश ओहोळ, सर)
