पायी श्रीगोंदयाला निघालेल्या मजूरांना वडगाव मावळमध्ये स्थानिकांकडून पाणी व फळे वाटप..

दिनांक १८ एप्रिल, वडगाव मावळ:

हाताला काम नाही, खायला अन्न नाही, गाढवांना खायला चारा नाही, अशा अवस्थेत सापडल्याने शेवटी गाढवांसह श्रीगोंदा या आपल्या गावाकडे पायी निघालेल्या मजुरांची अवस्था पाहून युवा उद्योजक सिद्धेश ढोरे यांनी त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नगराध्यक्ष मयुर ढोरे मित्र परिवाराच्या माध्यमांतून त्यांना केळी, टरबूज व पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या देऊन माणुसकीचे दर्शन घडविले.

वेहेरगाव येथील एकवीरा देवीच्या गडाच्या पायऱ्या दुरुस्तीच्या कामासाठी श्रीगोंद्यातून वडार समाजाची ८ कुटुंबे आपल्या गाढवांच्या लवाजम्यासह गेली होती. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्याने,या कुटुंबाच्या हाताला काम राहिले नाही.परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.

त्याचबरोबर त्यांच्या गाढवांना चाराही उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे कुटुंबासह जनावरांचीही परवड सहन न झाल्याने ते कुटुंब गाढवावर संसार लादून पायी चालत घराच्या दिशेने श्रीगोंदयाकडे निघाले होते.

वडगाव मावळ येथून मुंबई – पुणे महामार्गाने पायी चालत जात असतांना त्यांना उद्योजक सिध्देश ढोरे यांनी पाहिले. चौकशी केली,तेव्हा श्रीगोंदे – करांची झालेली परवड त्यांच्या निदर्शनास आली. नगराध्यक्ष मयुर ढोरे मित्र परिवाराच्या वतीने सिद्धेश ढोरे, यशवंत शिंदे, प्रदीप पटेकर, बाबू कडू, कार्तिक यादव आदींनी पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकीतून त्या कुटुंबांना गुरुवार दिनांक १६ सकाळी १०:३० वाजता पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, केळी व टरबूज वाटप केले.

(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading