दिनांक ११ जुलै २०२६,पुणे/श्रीगोंदा:
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपहरण व खूनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यात गेल्या महिनाभरापासून फरार असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-२ ने अटक केली आहे. शिवाजीनगर एसटी बसस्थानक परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे साई संजय मदणे (वय २३, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) आणि वैभव सुभाष चौधरी (वय २६, रा. दौंड, जि. पुणे) अशी आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेही फरार झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही आरोपींविरुद्ध व्यक्ती व मालमत्तेविरोधातील गंभीर स्वरूपाच्या २० हून अधिक गुन्ह्यांची नोंद असून ते सराईत गुन्हेगार म्हणून ओळखले जातात.
गुन्हे शाखा युनिट-२च्या प्रभारी पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, हे दोघे शिवाजीनगर एसटी बसस्थानक परिसरात येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. अटकेनंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना पुढील तपासासाठी श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश सांखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेचे नेतृत्व पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांनी केले असून पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-२च्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी कारवाई यशस्वी केली.
स्रोत:(ऑनलाइन वृत्त)
