“आ. बबनराव पाचपुते यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर; दादा साधणार नागरिकांशी संवाद”

दिनांक ७ सप्टेंबर २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त, काष्टी येथील त्यांच्या निवासस्थानी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची माहिती भाजपचे युवा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाचपुते यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी भाजपचे संदीप नागवडे सर व राजेंद्र उकांडे हे उपस्थित होते.

विक्रम पाचपुते यांनी मागील पाच वर्षांत आ.बबनराव पाचपुते यांच्या केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. त्यांनी श्रीगोंदा तालुक्यातील रस्ते, पाणी, वीज या मुलभूत सुविधां संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक पद्धतीने काम केले असल्याचे सांगितले.

यावेळी, स्थानिक पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर चर्चा झाली. विक्रम पाचपुते यांनी तालुक्यातील विविध प्रश्नांसंदर्भात पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि प्रशासनाच्या कारभारावर चर्चा केली.

विक्रम पाचपुते यांनी दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजी आमदार बबनराव पाचपुते यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त भाजपा डॉक्टर सेलच्या माध्यमातून सर्व रोग निदान व आरोग्य शिबिराचे आयोजन केले असल्याचे सांगितले. साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात येणार असून कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांशी आमदार बबनराव पाचपुते संवाद साधणार आहेत.

विकासकामांचा आढावा

विक्रम पाचपुते यांनी श्रीगोंदा तालुक्यातील रस्ते, वीज, आणि पाणी प्रश्नांवर चर्चा करताना सांगितले की, सुमारे ५०० किलोमीटरचे रस्ते जिल्हा मार्गातून राज्य मार्गात परिवर्तित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर, ६०० किलोमीटरच्या ग्रामीण रस्त्यांचे रूपांतर जिल्हा मार्गात करण्यात आले आहे. पूर्व आणि पश्चिम भाग जोडण्यासाठी भानगाव, घारगाव, बेलवंडी फाटा, श्रीगोंदा अशा विविध रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे.

नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील, गुंडेगाव, भापकरवाडी अशा गावांना नगर शहराला जोडण्यासाठी रस्त्यांची निर्मिती करण्यात येत आहे. तसेच, आगडगाव येथील काळाराम मंदिर आणि शनि मंदिर यांना देवालय क दर्जा प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या विकासाचा मार्ग सुकर झाला आहे.

कोरोनाच्या आपत्तीकालात तीन वर्षांचा अवधी वाया गेला असला, तरी बबनराव पाचपुते यांनी उर्वरित दोन वर्षांत तालुक्याच्या विकासासाठी उल्लेखनीय प्रयत्न केले आहेत.

पोलीस आणि तहसील प्रशासनाच्या कामांबाबत प्रश्नचिन्ह..

पत्रकारांनी तहसील आणि पोलीस प्रशासनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. पोलीस निरीक्षक किरण शिंदे आणि तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांच्यासोबत बैठक घेऊन लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक केली जाईल, असे विक्रम पाचपुते यांनी सांगितले.

उपक्रम आणि निधी

सध्या ६० छोटे बंधारे, साठवण बंधारे, आणि कोल्हापूर बंधाऱ्यांचे काम सुरु आहे. कुकडी आणि नारायण डोह प्रकल्पासाठी २०० कोटींचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील आंबेडकरी अनुयायांसाठी स्मारक आणि सुशोभीकरणासाठी १ कोटीचा निधी देण्यात आला आहे. तर शहीद जवान मेमोरियलसाठी १ कोटी आणि थीम पार्कसाठी २ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. इदगा मैदानासाठी ही निधी मंजूर करण्यात आला आहे.

शहरातील एमआयडीसी प्रश्न आणि जिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक जागेची निश्चिती लवकरच पूर्ण केली जाईल, असे पाचपुते यांनी नमूद केले.

स्त्रोत:(पत्रकार परिषद)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading