सेतू नव्हे लुटीचा हेतू: समाज माध्यमांवर फिरणाऱ्या खोट्या बातम्या आणि सेतू चालकांचा निषेध..

दिनांक ८ सप्टेंबर २०२४, श्रीगोंदा:

मागील काही दिवसांपासून समाज माध्यमावर “सेतू नव्हे लुटीचा हेतू” या मथळ्याच्या बातम्या फिरत असून, या खोट्या बातम्यांमुळे सेतू केंद्र व ऑनलाईन सेवा सुविधा केंद्र (CSC) चालकांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न काही विघ्नसंतोषी समाजसेवक आणि स्वघोषित राजकीय पुढाऱ्यांकडून केला जात आहे, असा आरोप सेतू चालकांनी केला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील अनेक वर्षांपासून ऑनलाईन सेवा सुविधा माफक दरात पुरवणारे सेतू केंद्र चालक, ज्यांनी मागील १० वर्षांपासून नागरिकांना विश्वासाने आणि इमानेइतबारे सेवा दिली आहे, ते आज या बदनामीच्या मोहिमेचा निषेध करत आहेत. याबाबत सेतू चालकांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे की, सेतू केंद्रावरून कोणत्याही प्रकारची अनैतिक आर्थिक वसुली किंवा नागरिकांची फसवणूक होत नाही.

सेतू आणि CSC केंद्रांमधील कामकाजाची तफावत असताना, काही लोक समाज माध्यमांद्वारे या दोन प्रकारच्या केंद्रांना एकसारखे काम करत असल्याचे चुकीचे चित्र रंगवत आहेत. नागरिकांत द्विधा परिस्थिती निर्माण करून ते सेतू केंद्र चालकांच्या कामावर संशय निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकारामुळे नागरिकांची दिशाभूल होत असून सेतू केंद्रावरील सेवांबद्दल अविश्वास निर्माण होत आहे.

सेतू केंद्र चालकांच्या मते, समाजातील काही तथाकथित समाजसेवक आणि राजकीय पुढारी हे स्वार्थासाठी या प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवत आहेत. त्यांच्या या खोट्या बातम्यांमुळे सेतू केंद्र चालकांच्या कार्यावर आघात होत आहे आणि गेल्या अनेक वर्षांच्या प्रामाणिक सेवेला धक्का लागत आहे.

तहसीलदार कार्यालयाकडे किंवा कोणत्याही संबंधित अधिकाऱ्याकडे आजवर सेतू केंद्राविषयी कोणतीही तक्रार आलेली नाही, असे सेतू चालकांनी स्पष्ट केले आहे. मात्र, सोशल मिडियाच्या माध्यमातून आलेल्या या बदनामीच्या मोहिमेमुळे त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सेतू केंद्र चालकांनी एकत्र येऊन या खोट्या बातम्यांचा निषेध करत तहसीलदार साहेबांसमोर आपले निवेदन सादर केले. या निवेदनावर संदीप नागवडे, विकास काळे, दत्तात्रय जाधव, सोमनाथ बोर्डे, निलेश गोरखे, अनिल देवकर, राहुल मांडगे, हेमंत शेंडगे, कृष्णा जाधव, संदीप दळवी, सचिन हिरडे, यशवंत पोटे, हर्षद कळस्कर, मुबारक पठाण आणि मनीषा काकडे यांनी सह्या केल्या आहेत.

सेतू चालकांनी नागरिकांना विनंती केली आहे की, त्यांनी खोट्या बातम्यांवर विश्वास न ठेवता सेतू केंद्रांवरील अधिकृत सेवांचा वापर करावा आणि अफवांपासून दूर राहावे.

स्त्रोत:(निवेदन)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading