मानवतावादी दृष्टीने मदत करा तहसीलदार माळी यांचे आवाहन..
दिनांक २९ मार्च,श्रीगोंदा:
लॉकडाऊनमुळे साधारण कुटुंबीयांचे संसार उघड्यावर आले आहेत.अश्यातच तालुक्यातील खेडेगावांत कामानिमित्त आलेले युपी, बिहार राज्यातील मजूर देशात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत परत त्यांच्या गावांकडे फिरू लागलेले आहेत.
असेच २५ पेक्षा जास्त लोकं त्यांच्या गावाकडे जात असतांना,श्रीगोंदा मांडवगण रोडवर नंदनवन हॉटेल जवळ काही सामाजिक कार्यकर्त्यांना आढळून आले. यावेळी(प्रहार संघटनेचे शहरध्यक्ष)नितीन रोही यांनी त्यांना थांबवून विचारपूस केली.तर त्यांनी या साथीमुळे हाताला काम राहिले नाही,अन्नपाण्याची समस्या निर्माण झाल्याने लहान मुलं आणि महिलांना घेऊन गावाकडे निघालो असल्याचे सांगितले.यावेळी त्यानां धीर देत पोलीस निरीक्षक जाधव यांना कळविण्यात आले.दरम्यान त्या लोकांची दुपारच्या नाश्ता पाण्याची सोय केली गेली.
कोरोनामुळे उदभवलेल्या कठीण परिस्थितीत श्रीगोंदा परिसरातील बाहेरून आलेले मजूर लोकांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ही सर्व गरीब लोक अन्न पाणी अभावी संभ्रमित झालेली असतांना.ते त्यांच्या गावी पाई चालत निघाले होते. रोही यांनी हे दृश्य पाहिले, विचारपूस केली, हे सर्व लोक उपाशी असल्याचे समजले, तेव्हा नितीन रोही,विजय गणिशे,नवनाथ आळेकर यांनी त्यांची स्वखर्चाने महादजी शिंदे विद्यालयात आणण्याची सोय केली. या ठिकाणी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, सहाय्य पोलीस निरीक्षक पाटील,सहाय्यक फोजदार अनिल भारती,पोकॉ अमोल आजबे सह १५ ते २० कर्मचारी उपस्थित होते.
तहसीलदार महेंद्र माळी येथे आल्यावर त्या लोकांची विचार पूस करून महादजी शिंदे विद्यालयात राहण्याची व्यवस्था केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार यानंतर श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी नगरसेवक मच्छिंद्र सुपेकर यांनी या लोकांची जेवणाची व्यवस्था केली आहे. उदभवलेल्या आपत्तीत सुपेकर हे श्रीगोंदा शहरातील विविध भागातील गरजूंना घरपोच मोफत जेवणाची व्यवस्था करत आहेत.त्यांनी आत्तापर्यंत ४७३ जेवणाचे डबे पुरवले आहेत. भुकेलेल्या गरीब लोकांची लॉकडाऊन असेपर्यंत सुपेकर यांनी जेवणाची सोय केली असल्याचे समजते आहे.
या मजुरांची जिल्हापरिषद शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात येत असून, अश्या पीडितांना मानवतावादी दृष्टीने(अन्नपाणी)मदत करण्यासाठी सक्षम लोकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन तहसीलदार महेंद्र माळी यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.
