उपरा,लक्ष्मण माने..
गावातलाच . आकुबा मास्तर साऱ्या गावाला माहीत . काही नवं वाटत नव्हतं . हात – पाय बांदल्यावानी वाटायचं . पर सारी माझ्या वर्गातली पोरं माझ्या सिनंची . माझ्याहून लहानच . मीच टोनगा दिसायचो . माझ्या एवढाली पोरं तिसरी – चौथीच्या वर्गात असल्याली … तवा बानं साळंत नाव घातलं . मास्तरनं इचारलं ,
‘ वय काय …
बा म्हणला ,
‘ कुनास ठावं … आसंल आठ – दहा वर्साचा . गांधीबाबा गेला , त्या सालचा .
‘ ‘ जन्म कुठं झाला ? ‘ मास्तरनं इचारलं .
बाम्हनला ,
‘ आकुबा , आता कंचं गाव सांगू ? कोकणात ह्याच्या वेळी ती बाळात झाली ते गाव आठवत न्हाय .’… मग मास्तर म्हनला , निरगुडीच लिवतो .
‘ बा व्हय म्हनला .
‘ आता शाळंत रोज आलं पायजे . शाळा चुकवू नगं . ” मास्तर म्हनत हुता .
शाळा सुरू झाली . रोज शाळंत जायचो . शाळा सुटली , की हुंदडायचो . गावच्या गावंदरीलाच मळं हुतं . मळ्यात जायचो . कुणाच्या पपया काड , कुणाची केळ मोड , आसं दिस मावळसतोवर चालायचं . मार खायचा … शिव्या खायच्या .
‘ कुत्र्याच्या जल्माला रया आसती , पर तुझ्या जल्माला रया न्हाय . ‘ आई कावली की असंच काय काय म्हनायची .
पावसाळा तोंडावर आला व्हता . बानं कर्ज काडलेलं वाजवून फेडत आनलं व्हुतं . रोज सांच्याला बाला घोर असायचा .
कैकाडी काम कुनी मागायचं न्हाय . कोर – चतकूर भाकरीसाठी बा कुळवाड्यांची मरनाची वझी वाहायचा . बैलं पानी पाज , कुनाच्या कुपाच्या काठ्या लाव , कुनाची गंज लाव , कुनाचं इंज्यान गाडीत चढव- असलं धंदं करायचा . मिळंल ते आनून द्यायचा . मधीच कधीतरी प्यायचा . पावसाळा आला की ‘ काळ ‘ आला , असं म्हणायचा .
शेतात कामं नसायची . कपाशीला पानी पाज . कुठं रातचं दारी धरायला जा . कपाशीवर औषध मारायला जा . अशी कामं करायचा . आई मिळंल ते सारवान भांगलान टूपलान करायची . मजुरी पैशात नसायची . वटाभर मिरच्या , कनसं , शेंगा , कालवाण , आसं जे काय कुळवाड्यात आसंल ते आनायची .
मी नेमानं शाळंत जात व्हतो . सकाळी शाळा भरस्तंवर गाढवं राकायची . गाढवांच्या मागं जळान येचायचं , काटक्याकुटक्या जमवायच्या . शाळा भरली , की शाळंत जायचं .
पावसाला उघडीप असली , की कामं करायची . आकाड – सरावन वैरी होऊन कराय ५० ५१ यायचं . आई चार – चार दिवस जेवताना दिसायची न्हाय . दोन – चार भाकरी व्हायच्या . कोर – चतकोर आमी खायचो . आई – बा माझ्याम्होरं तर जेवाचे न्हाईत . मागं कुणास ठावं ? सरावणात कापूस येचायला मानसं लागायची . मजुराला मजुरी रोक मिळायची . सुट्टी दिवशी मी , समी , आई , बा , सारी कापूस येचायला जायचो , आई – बाला पुरा रोज मिळायचा . एक एक रुपाया . आम्हा बहीन – भावंडान्ला चार – दोन आणे . तेवढीच मीठ – मिरची . कुरकुर करायला जागाच नसायची . सारं कसं अंग झाडून लागायचं . भांगलान , टुपलान , कापूस येचनी , आसली कामं करीत करीत दिवस ढकलायचं .
सरावण महिन्यातला शेवटच्या सोमारी देवदेव करायचा . पोळ्या हुयाच्या . निवद केलाच पायजे . पाच नारळ , पाच लिंब , पेढं , असा गोडा निवद . पळाट्या काढायला आलेल्या असायच्या . बा एकरावर उक्ती उपटायला घ्यायचा . इस – पंचवीस रुपयं एकर . मग सारं घर त्या कुळवाड्याच्या शेतात पळाटी उपटायचा . रान असलं वलं तर पळाटी लवकर उपटायची . न्हाईतर लई जाचायची . आई – बा , मी , समी , लाली , पुष्पी , सारी कामं करायचो . बा हातात रकट्याचा टुकडा धरायचा . पळाटीचा शेंडा मांडीवर कोपरात धरायचा … दोनी हातांनी बुडका धरायचा . हिसका मारायचा . एक – एक पळाटी उपटायची . हाताला कातडं राहात नव्हतं . फोड आला , तर त्यो तितंच जिरायचा . हाथ हालायचे . बाच्या हाताला घट्ट पडलं व्हतं . माझं हात कवळं . मी पळाटी उपटायचो . दमलो , हाताची आग व्हायला लागली , की ढीग जमा करायचो , सारी पळाटी एका जागी आनून टाकायचो . दोन – तीन दिवस पिट्टा पडायचा .
वीस – पंचवीस रुपये आलं , की देवदेव करायचा . शाळा , काम करीत करीत शिकत व्हतो . बा रोज आब्यास करायला बसवत व्हता . मला गमभन समजत व्हतं . शंभरापतुर आकडं येत व्हतं . असाच दसरा उजाडायचा .
दसरा आला , की घट बसायचं . नवचंडीत नव दिवस रोज सांचं बा देवाम्होरं घुमायचा . आई उदारपादार करीत घर चालवायची . दसऱ्याला देवदेव व्हायचा . अंगात वारं भरावं , तसं साऱ्या कैकाड आळीवर तेज यायचं . कोन कोन कुनाकुनाच्या बिराडात जायचं … ते ठरवायचं . आपली आपली बिहाडं निघायची पोट भरायला , जगायला .
दसऱ्याला कोकनात भाताची सुगी आसती . सारी बिराडं- म्होरं , मागं पण- दसरा झाला , की मावळात जात . भीक मागायला बाहीर पडायचं . गाढवाच्या पाठीवर संसार घालायचे , की लोनंद , शिरवळ , करीत करीत पेन , पनवेल , खारपाडा , खोपोली हिकडं कुणी , तर कुणी म्हाबळीशरावरनं खाली महाडाकडं उतरायचे . बाम्होरं आवंदा अडचन व्हुती . आई पुटूशी व्हती . दिवस भरत आले व्हुते . बानं इचार केला , आपुन खोपुलीच्या बाजूला जावं .
वाटंत लागत्याल तितं गावाच्या हागनदारीत , देवळाच्या मागं , झाडाखाली , मुक्काम बदलत , सुगी करीत करीत पेन , पनवेल गाठायचं . कोकनात नुसता भात खायाचा . सुकट , बोंबील बक्कळ मिळायचं . कोरड्यास आन् भात . किक याचा . शाळा गाढवाच्या पाठीवर चालू असायची , मुक्काम आसंल , तितं बा निहून बसवायचा . कधी शाळंत कधी बाहीर , पण शाळा चालली व्हती . घरी पुस्तकात बघून आब्यास करायला लागलो , की आई – बाला लई आनंद व्हायचा . कोकनात रोकीचं गिराईक लई . त्यात बाच्या हातात पैसा असायचा . पन गाठीला गाठ मारून असायचा . रात रातभर कनगी वळत बसायचा . गि – हाईक लई असायचं . दांडगं कष्ट . रातभर मी त्याला , आईला झोपल्यालू बघायचो नाही . दिवस उजाडला , की दोघं कनगी बांधून पसार झालेलं असायचं . येताना बा फोकाची भलीमोठी मोळी घेऊन याचा . आई सामानसुमान आनायची .
आमच्या बि – हाडाबरुबर आप्पा , तात्याची – माझ्या चुलत्यांची बि – हाडं आली व्हती . आई गरबार व्हती . म्हून बिराडं एका जिवानं राह्यची . कष्ट करायची . खायची पन जीवाभावाला आलं, तर जीव टाकायची . नानी – काकी – आई कंदी भांडल्या न्हाईत . बा भावांच्यासाठी आईला मारायचा , पन भावान्ला तोडायचा न्हाय .
एक दिवस रातची कामं चालली व्हती . मी चिरून देत व्हुतो . आई चिरून देत व्हती . बारकी पोरं झोपली व्हती . बा त्यानं ऐकलेल्या गोष्टी सांगत व्हता . देवादिकांच्या , भुतांच्या , त्यानं पायलेल्या . कधी आप्पा सांगायचा . बाकीच्यांनी हात चालू ठिवतच हुंकार भरायचं . कट घालायचं . कनगी मुरडायच्या , बुडं लावायची . असं चालायचं . बाला आप्पा सांगत व्हता ,
आला गावा नान आज शत्यानी , मिदा आस मिदा . ‘ (भाऊ , आरं, आज मी मेलो व्हतो .)
तात्या , काकी , आई , नानी , बा सारीजण कामं थांबवून इचाराय लागली , ‘ मिदा आस – मिदा आस ‘ (काय झालं?)
आन् आप्पा सांगत व्हता . आज सकाळी डोंगराला फोकाला तिघं भाऊ गेले व्हते . तिघांनी फोका कापल्या . एकमेकाला उचलू लागलं . कुणी डोक्यावर, कुणी खांद्यावर मोळ्या घेतल्या. आन् पाय उचलून चालाय लागलं . बा आन् तात्या बरंच वझं म्होरं गेलं , आप्पा मागं राहिला . दिवस उगावला व्हता . आप्पाचं वझं लई जड झालं व्हतं . त्यानं वझं खाली टाकलं … वझ्यातल्या थोड्या फाका काढून टाकल्या . पुना बांदलं . डोस्क्यावर घेतलं आन् निघाला . तवर बा – तात्या दिसंनासं झालं व्हतं . ह्यो गडी झपाट्यानं चालत व्हता . रस्ता डांबरी – काळाझार . ह्याच्या पायाचा आवाज हुईल तेवढाच , न्हाईतर एकादं पाखरू वरडंल , तेवढंच . रस्त्यानं वहानं येत नव्हती . रस्ता नुसता मोकळा पडलेला . बा – तात्या दिसत नव्हतं . त्यानला गाठायचं या इचारात चालत व्हता . त्यानं म्होरं बघितलं , तर रस्त्यात झाड आडवं पडलंय . आयला रस्त्यात झाड पडलंय वाटतं म्हनून पुढंच चाललाय . आता ते झाड जवळ आलं होतं . त्याच्या नजरंत याला लागलं . पन ह्यो मनात म्हनतुया , आयला झाड लांब दिसत व्हतं . हे चालतंया कसं ! का चितराबितराची भानगड हाय ? कोकणात लई भुतं असत्यात , कायतरी क्योंड दिसतंय . म्हनून मनातनं काळुबाईचं नाव घेऊ लागला . तसं झाड आणखीन जवळ आलं . आता मातुर आप्पाच्या अंगातली पैरन घामानं भिजली … पाय म्होरं हालंनात . समोर ह्योऽ चार मानसांच्या कवळीत मावल येवढा साप . साऱ्या जलमात येवढा मोठा साप बघितला नव्हता . आप्पाचं पाय लटपटाय लागलं . तोंडातनं शब्द फुटंना . जितराब जवळ येत होतं .
तेवढ्यात मागनं चार – पाच सायकली आल्या , तशा आपल्याजवळ येऊन कोकण्यांनी म्होरं जितराब बघितलं . आन् डांबरी रस्त्यावर पाय वाजवायला सुरुवात केली . टाळ्या वाजवल्या . सायकलीच्या घंट्या वाजवल्या . जितराब रस्त्यावरनं खाली उतारलं आन् जंगलात दिसंनासं झालं . कोकनी म्हणत व्हते ,
‘ अरे ह्या वझेवाल्याक , ह्या आजगरान् आत्ता अक्को गिळल्यान् असतो , बरा झाला आमी ह्यसर इलाव .
‘ काळ आला व्हता , पर येळ आली नव्हती , आप्पा सांगत होता . साऱ्यांनी देवाचं आभार मानलं , हात जोडले . बा उठला , टोपल्याजवळ गेला . काय काय बडबडला , गुलाल आन्ला , साऱ्यास्नी लावला . आप्पाच्या बिराडावर टाकला . कपाळाला लावला . मी जरा टरकलो होतो . फॉक टाकलं आन् गप जाऊन झोपलो .
रस्त्याच्या कडंला खोपोली फाट्यावर राहिलो व्हुतो . उंचउंच डोंगरदऱ्या , हिरवीगार पर्वतराई बघत व्हतो . आप्पा , तात्या लाड करायचे . सकाळी पावबटर मिळायची . कवा कवा भेळबीळ मिळायची . मी अभ्यास करावा म्हणून सारी ग्वाड बोलायची . काई चुकलं , तरी लगीच मारायची न्हाईत …. बापजाद्यान्ला कुणालाच अक्षर म्हाईत नव्हतं . टपाल आलं तर मास्तराकडं न्यावं लागत व्हतं . मी साळंत जात व्हतो . कधी बुडवत व्हतो . जवा ज्या गावात जायचं , तवा तीच आमची शाळा . आता सवय झाली व्हती . कुणात मिसळत नव्हतोच . कुणी शिवूनबी घ्यायचं न्हाय . रातचा राकेलाचा खंदील . उघड्यावर वस्ती . तेच आपलं घर . तितंच राह्यचं . उकिरड्यावरच्या मोडासारकं मोठं व्हायचं .
बिहाडं रस्त्याच्या कडंला लावलेली . दिवस मावळतीला गेला व्हता . आईनं तीन दगडांची चूल पेटविली . जेजू घेतल्या . तांदूळ शिजायला घातलं . मी जाळ लावायला लागलो . आई कसंनुसं व्हतंया , म्हनत व्हती . बा उठला , एका आण्याचा गूळ आनला . बुकीची पुडी आनली . च्या केला . आईला दिला . आता जरा बरा वाटत व्हतं . पुन्हा काम सुरू झालं . आप्पाच्या , तात्याच्या चुली पेटल्या होत्या . वारं सुटलं व्हतं . जाळ नीट लागत नव्हता . जाळ नीट लागला न्हाय , की भगुल्यातला भात जाळ लागंल तिकडं शिजायचा आन् ज्या बाजूला जाळ नसायचा तिकडे शिजायचा नाही . म्हून नानी , काकी , “ सुलोट आंट राकेल वतीक्योट फिनगीहुगोट ‘ ( जळू दे , राकेल पडू दे , मडं जाऊ दे ) म्हनू वाऱ्याला शिव्या द्यायच्या .
सारी जेवायला बसलो होतो . आईच्या पोटात दुकत व्हतं . बानं अंगारा लावला . आई सारकी रडत व्हती . जेवनं बाजूला सारली . बानं धोतराचं धडप जोडलं . चार काट्या उभ्या केल्या . खंदील मोठा केला . पळत जावून म्या राकेल आनलं . आप्पानं दोन हांड पाणी आनलं . नानी , काकी कामाला लागल्या , धोतराच्या आडुशाला त्या तिगीजणी काय काय करीत व्हत्या … आमाला पोरान्ला तिकडं जाऊ देत नव्हते . खेकसत व्हते . आसपासची दुकानं बंद होत व्हुती . अंधार वाढत व्हता . डोळ्यात बॉट घातलं , तरी दिसत नव्हतं . खंदील धोतराच्या आडुशाला गेला आन् अंधार आनकीनच वाढला . भ्या वाटत व्हतं . आसपास जंगल झाडीतनं किर्रर्र आवाज येत व्हुता . फाट्यावर मोठी वस्ती नव्हती . वळकीपाळकी नाहीत . आई इवळत व्हती , नानी “ आया गप खान्नी ” ( आग गप बस , सोस ) म्हनत व्हत्या . काय व्हत व्हतं , मला ठावं नव्हतं . बाला इचारलं , तर त्यो चितागती झाला व्हता . बोलत नव्हता . आन् एका जागी बसतबी नव्हता .
अखेर आईचं इवाळनं थांबलं , तसं बारकं पॉर रडल्याचा आवाज आला . तात्या , आप्पा , बा साऱ्यान्ला सुटल्यागत झालं . साऱ्यानला आनंद झाला . नानी आतनं पाणी मागत व्हती . आप्पा पानी देत व्हता . नानीनं आप्पाला शिव्या दिल्या.
” आला , गार तोल त्येन्नी कीर मिया ख्खालकांसी ? ” ( आरं , गार बर्फासारखं पानी हाय . काय मारतूस काय ?)
म्हणत व्हती .
बानं चूल पेटवली. पानी गरम केलं. काटा फुटला, की पानी धोतरामागं गेलं. मूल रडत व्हतं. आईला मूल झालं. मला बहिण झाली व्हती. ‘ समिंदराच्या कडंला
क्रमशः
स्रोत:(पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या उपरा या पुस्तकातुन)
