उपरा,लक्ष्मण माने..
सवय व्हत व्हुती . आतापर्यंत संडासाला पानी घिऊन जायचं कारन नव्हतं . दगडानं भागायचं . आता इतरांचं बगून पानी न्हेत व्हुतो . संडासात बसायला जीव नको व्हायचा . पण हागायला जायला दोन मैल चालत जायला जिवावर यायचं . हळुहळू रुळत गेलो .
नववी पास झालो . पन दोन विषय- गणित आन् इंग्रजीत नापास झालो व्हुतो . चांगली समज आली व्हुती . आपन शिकलं पायजे , हा एकच ध्यास व्हता . निदान मॅट्रिक तरी व्हायचं .
पुन्हा उन्हाळा आला . बा शिरा तानून घिऊन गेला . सीझन वाजिवला . पन मन लागत नव्हतं . घरची सारी परिस्थिती नारायनाला माहीत व्हुती . त्याला मी सांगायचो
‘ नारायन , जितं मानसं हागत्यात , तितं राह्यचं . जितं उकिरडं आसत्यात , तितं बसून जेवायचं . आन् शेंबड्या पोरानं वाजीव म्हटलं , की वाजवायचं . नको व्हतं आन् तुमा मंडळीच्या बरोबर फिरायचं . लई लाज वाटते . ह्यो धंदा नको वाटतो . आतापातूर समजत नव्हतं . करीत व्हतो . आता अशी लाचारी नको वाटते .
‘ पन नारायण अतिशय समंजस मुलगा . मी जिथं वाजवायला गेलो असेन , तिथं चार पाच मित्र घेऊन यायचा . जीव किती मोठा व्हायचा ! आपले मित्र आपल्यासाठी आपुन असंल तिथं सायकलनं येत्यात आन् मुख्य म्हणजे आपली सारी स्थिती माहीत असून येतात . फार कौतुक वाटायचं .
नारायण जीव की प्राण झाला . त्यो त्याच्या ह्या वागण्यानं . वर्गात अतिशय हुशार . मित्रांत अतिशय लाडका . साऱ्यांना हवाहवासा वाटणारा . कोणी शत्रूच नाही . ते वय म्हणजे खरं तर उनाडक्या करण्याचं . पण हा इतका पोक्त की मला म्हणायचा ,
‘ लेका मान्या , आपल्याला बायको जर कोरी मिळायला पायजे आसंल , तर आपून इतरांच्या पोरी बाटवीता कामा नये . बाई म्हंजे काचेचं भांड …
‘ कदी कदी वेश्याव्यवसाय करणाऱ्या बायका दिसल्या की म्हणायचा , ‘ ह्या बायकांनी काय केलं असेल … मानुसच ना त्या ?
‘ त्याच्या अशा बोलण्या – वागण्यानं मनावर खोल संस्कार व्हत व्हुते . स्त्री आणि खालच्या जातींच्याबद्दल त्याला अतिशय जिव्हाळा . मला म्हणूनच त्यानं इतकी मदत केली असेल !
दहावीला आलो . आता फलटण म्हणजेच घर वाटायचं . नारायणानं गावात खोली घेतली होती . अभ्यासासाठी . रामदास , नारायण , मी आणि पोपट जगताप नावाचा एक महार समाजातला मुलगा असे आम्ही अतिशय जवळचे मित्र राहत होतो . मला भाडं द्यावं लागत नव्हतंच , पण आता मी हॉटेलात काम करावं असं नारायणाला वाटत नव्हतं . त्यो म्हणत होता ,
‘ लेका , तू आता इथं काम करू नकोस … आम्हाला ते बरं वाटत नाही . वर्गातल्या पोरी – पोरं हसत्यात . तुला आपण इतर काही उद्योग जमवून देऊ . पैसे मी देतो .
‘ बा कदी वरदळीला आला तर त्याचीबी समजूत नारायण घालायचा .
त्यानं दहा रुपये भांडवल दिलं . साईनाथ बेकरीतनं पाव – बटर विकत घेतलं . मोठी पिशवी विकत घेतली . पैसे त्यानंच घातले होते . दुसऱ्या दिवशी पहाटेच उठून ‘ पाव – बटर … ‘ करीत मी गावातून फिरलो . बटर सकाळी सात – आठ वाजेपर्यंत संपायचे . दीड – दोन रुपये सुटायचे . आता चांगला धंदा करायला लागलो . कुणाची लाचारी नाही . घरनं नवा पैसा मिळायचा नाही . खायची बोंबाबोंब . घराकडं वळावं असं वाटायचं न्हाई . आई , किसन्या , समी , लाली , पुष्पी बाजाराला आली तर भेटत , न्हाईतर सणासुदीला घरी जायचो तेवढंच . बानं लग्नाचा तगादा लावला होता . पण मी दाद देत नव्हतो . आन् त्यालाबी मी मॅट्रिक होईन अशी आशा लागली होतीच .
दिवस कसे बिनकचकचीचे जात होते . रोज सकाळपास्नं सांजपातूर दोन – तीन पाकीट शिगरेट लागत होती . पण सारं शिगरेट ओढणं चोरून . सकाळची थंडी असली की शिगरेटी वढायच्या . निरगुडीची पोरं फलटणातच होती , त्यांच्या गाठी पडायच्या . ती शिकवणीला जायची . आपुनबी शिकवनी लावावी असं वाटायचं . पण जमत नव्हतं . ज्या पोरीमुळं निरगुडी सुटली , त्या पाटलांच्या पोरीलाबी तिच्या बानं मुधोजी हायस्कुलात घातली होती . तीबी दहावीला आली होती . दिसायला अतिशय देखणी , गोरीपान पोरगी . पण ती म्होरनं आली , की मी बगल देऊन बिनबगितल्यागत चोरावाणी खाली मान घालून म्होरं जायचो .
कधी कधी मनातनं विचार उसळी मारायचा , आपण तिच्यासंगं बोलावं , ती आपल्याकडं बगती … हसती , तिला सांगावं … जे तुला सांगितलं गेलं , ज्याची बोंब झाली , ते खरं नव्हतं , ते खोटं होतं … पण आपली कधीच हिंमत झाली नाही . जीभ रेटली न्हाई . मनात भीती असायची . आपण सरळपणानं सांगायला जाऊ . पण ती ऐकल का ? तिनं उडीवली कानसुलात तर ? बाला सांगितलं तर … मनात आलेली ऊर्मी वड्याच्या पाण्यावाणी ओसरून जायाची . आन् मी गप्प म्होरं निगून जायचो .
आख्या चार वर्षांत एकदाबी मी तिला सांगू शकलो नाही . बोलू शकलो नाही . पण मनात सतत असायचं , आपुन केलं तर आंतरजातीय लग्न करायचं आन् तेबी पाटलाच्या पोरीसंगंच करायचं . मनातनं पक्कं ठरलेलं . पण जमलं नाही तर … वास्तवाचं भान आलं , की स्वप्नाचा पक्षी वास्तवाच्या आगीनं होरपळून जायचा .
पाव – बटराचा धंदा बरा चालला होता . शिकताही येत होतं आन् पोटही भरत होतं. पण पैसा वापरताना हात ढिला सुटायचा. पैशाची किंमत समजली होती. मिळाला तर हवाच होता . नाहीतरी दोन रुपयांत दोन वेळचं जेवण बसत नव्हतंच. नारायण बघत होता . अंगात कापडं नव्हती . पैसे साठवायचा अनेकदा विचार केला , पण हातात कातरी होती . पाव – बटर विकायला कारखान्याच्या साईटला जात होतो . कारखान्याच्या जवळ शे – पाचशे झोपड्या असायच्या . ऊस तोडायला आलेल्या नगऱ्यांच्या . उसाच्यापाचटीची कोप १० ९ आन् त्यात खुराडं करून माणसं राह्यची . संडास नसायचा . मी पहाटं पाव – बटर घिऊन जायचो . बायका रस्त्याच्या कडेला हागंदारी समजत होत्या . कुणी न्हात होत्या . उगड्यावरच . मनाला चटका लागायचा . खरंतरी माझी आई न्हाताना अशीच मी बगितलेली असायची . नेमकी आईची आठवण व्हायची . मी ‘ पाव बटर ‘ करीत कोपीम्होरं गेलो , की बारकी उगडीनागडी पोरं घोळका करायची . नगरे ऊस तोडीला जायला निघालेले असायचे . बायकांचं चुलीम्होरं घाईत चार दामटं १० टाकणं चालायचं . चहा होत होता . माझी पाव – बटर खपत होती . उगीच चौकशी म्हणून एकदा इचारलं ,
‘ इतक्या लवकर जावं लागतं का ?
” एकजण म्हणला ,
‘ आज उशीर झाला . रोज पहाटंच फडात जावं लागतं . दिस उगवायला एका गाडीचा ऊस तुटला तर बरं , न्हाईतर दिसबर ऊस तोडून दहा तोंडाची उस्तवारी कशी करायची ? सांचं मागारी येतो . पोरं संगच आसत्यात . ती बी मदत करत्यात ऊस सावळायला . बायकू वाडं , टिपऱ्या गोळा करती … मेळं बांदती … मी मोळ्या करून गाडीत भरतो . सारीजणं राबत्याती , तवा भागतंया …
मी म्होरं सटकायचो . ही बिराडं सहा महिनं सीझन असला की येत्यात … कारखाना बंद झाला की जात्यात … सारी भटकंती . आपल्यावाणीच !
जगात काहीच माणसं कशानं गरीब झाली आसतील ? देव यांना आसं का गरीब ठेवत आसंल ? अनेक प्रश्न डोक्यात यायचे , पण सारे विरून जायचे .
ह्याचं उत्तर मिळत नव्हतं . मिळालं , तर पटत नव्हतं .
दहावीचा अभ्यास चालला होता . कधी कधी सिनेमाला जात होतो . वर्गातल्या मित्रांबरोबर नाहीतर नारायण , रामदास यांच्याबरोबर – सिनेमाच्या गर्दीत घुसायचं . तिकिटासाठी मस्ती करायची . चार – पाच तिकिटं जास्ती काढायची . आन् सिनेमा सुरू झाल्यावर जास्त पैशानं इकायची . सिनेमा फुकटात पडायचा .
गणित आन् इंग्रजी म्हंजे आपले दुश्मन … ते आन् आपुन एका पंगतीला कदी बसलोच नाही . गणिताचा तास सुरू झाला , की आपल्या झोपेची वेळ असायची . गोळे मास्तर रागवायचा , पण डुलक्या चालूच असायच्या . इंग्रजीचा तास पहिला असायचा . पण आपुन सारकं उशिरा ठरलेले , त्यामुळे दांड्या चालू असायच्या .
दहावीला असतानाच एका पोरीमागं लागलो होतो . म्हंजे काय, ती आपल्याबरोबर बोलायची नाही . पण आपुनच तिच्या मागं मागं फिरायचं . त्यात तिला तास नसला , की आपला असलेला तास दांडी मारून जायचा . पत्रं तर कितीदा तरी लिहिली , पण सारी गेली कॅनलच्या पाण्यात वहात – पंढरीला .
दहावीची परीक्षा जवळ आली होती. हायस्कूलची सहल जाणार होती. पन्हाळा, जोतीबा, कोल्हापूर बगायला. सहलीला कधीच जाता आलं नव्हतं. वर्गातली बरीच पोरं जाणार , म्हणून नावं देत होती. मनातनं सारकं असायचं – आपणबी जावं. काय असते सहल ते बगावं , चैन करावी . तेवढीच मजा . पण पन्नास रुपये भरायचे होते . काम त्याचं काय करावं ? घराकडं नाव काढायचं , म्हंजे आगी म्हव उठविल्यागत ११ होतं . मित्रांच्याकडं पाच – दहा रुपये मिळाले असते, पण सहलीइतके पैसे मिळणं शक्य नव्हतं . बऱ्याच जणांकडं पैसे मागितले . पण कुणी हुंगलं नाही . समाधान येवढंच होतं , नारायण सहलीला जाणार नव्हता . वर्गातली पोरं चिडवायची . आपसात सहलीबद्दल बोलायची .
दिवस जवळ यायला लागला . मनाचा कोंडमारा , पोटाचा कोंडमारा , सारं कसं काळोखात घावल्यागत . मन उदास झालंकी कॅनलच्या काठाला जाऊन मन शांत होस्तंवर रडायचं . अगदी गप्प होऊन पोटभर रडून झालं , की माघारी यायचं .
आता नवीनच एक मार्ग समोर आला होता . रुद्रभट्यांच्या दुकानाम्होरं बोर्ड लागला होता . पेपर विकणारा मुलगा पाहिजे . झालं , जाऊन पेपर वाटणाऱ्या मुलाची नोकरी धरली . सकाळी दोन तास काम वाढवलं . सकाळी सहा वाजेपर्यंत बटर विकायचे . नऊ वाजता पेपरची गाडी स्टँडवर यायची . पेपर घ्यायचे . आत दुकानात यायचं , तिथं पेपर वाटून घ्यायचे . आन् ‘ केसरी ‘ , ‘ सकाळ ‘ , ‘ सह्याद्री ‘ करीत रस्त्यात मोठ्यांदा वरडत फिरायचं . वर्गणीदारांना अंक पोचवायचे . सकाळच्या नऊ वाजल्यापास्नं अकरा वाजेपर्यंत पेपर वाटणं चालूच असायचं . अकरा वाजता पेपर वाटून झालं , की कर्यांच्या हाटेलात मिसळ – भजी खायची . खाकी चड्डीत शर्ट खोवायचा . आन् वह्या घेऊन हायस्कूल गाठायचं . सारी धावाधाव . रुपया – दीड रुपया मिळायचा . इतकं करून पळत पळत हायस्कूल गाठायचं , तर तिथं प्रार्थना संपून गेलेली . उशिरा येणाऱ्यांना प्रभो सरांचा शिट्टीच्या नाडीचा न्हाईतर रुळाचा मार , नाहीतर ग्राऊंड साफ करायची शिक्षा व्हायची . मुकाट्यानं शिक्षा भोगायची . बहुतेक पहिला तास संपल्यावरच आमची शाळा सुरू व्हायची .
एकदा अशीच शाळा सुटली . कर्यांच्या हाटेलात सात वाजेपर्यंत कपबश्या उचलल्या . चहा ढोसला – अर्थात , फुकटातच . दप्तर घेतलं आन् खोलीवर निघालो होतो. शेजारीच एस.टी. स्टँड लागतो. रस्त्याच्या कडेला लाईटच्या खांबाखाली माणसांची गर्दी झाली होती . कोंडाळं करून जो – त्यो पुढं सरत होता . गर्दीत सामील झालो . रेटारेटीत पुढं सरलो . तर तिथं तीन – चार मोठी माणसं तीन पानांच्या पत्त्या खेळत होती . वेळ तशी मला निवांत होती . बराच वेळ खेळ बघत बसलो . समोरच्या मानसाचा सराईतपणे हात हलत होता . तीन पाने पटापटा उचलून दाखवीत होता . एक मानूस पत्त्यांच्या एका पानावर दहा रुपये बोलला . त्यानं पान बरोबर ओळखलं . त्याला दहाचे वीस रुपये मिळाले . मी आणखीन पुढं सरलो . आता मीही तल्लीन झालो होतो . समोरचा माणूस राजा , राणी , गुलाम तीनच पानं सफाईनं टाकायचा . लावणारा इसम चुकला , की पैसे जात होते . जिंकला की दुप्पट मिळत होते . बराच वेळ बघत बसलो होतो .
दप्तर हातातच होतं . आपल्याला हितं कुणी बघितलं , तर बोंब होईल , असं एकदा वाटलं , पण इतक्यात गर्दीत कोण ओळखतंय म्हणून बघत बसलो . शेजारीच पानाचं दुकान होतं , तिथं शिगरेट घेतली . पान खाल्लं , इनशर्ट काढला . टोपी खिशात घातली . पुस्तकं – वह्या पानवाल्याच्या दुकानात टाकल्या . नजरेसमोर नोटाच दिसत होत्या . बस्स , गर्दीत घुसलो . खिशात दोन – तीन रुपये होते . एक रुपया लावला . पहिल्यांदाच रुपयाचे गुलामाने दोन रुपये दिले . पुन्हा खेळलो . पुन्हा – पुन्हा खेळत राहिलो . जिंकत गेलो . जवळ पाच – सात रुपये आले . आता भीड जरा चेपली होती . खेळाची धुंदी चढली होती . खेळता – खेळता पानाची पिचकारी गटारात टाकली . थुकीचा बारीकसा राळ पत्त्याच्या पानावर पडला . तो नजरनं दिसत नव्हता . आता बघ्यांची गर्दी कमी झाली होती . मी पानाच्या थुकीचा राळ धेनात ठेवला आन् नेमकं त्येच पान ओळखाय लागलो . जवळ जवळ दोन – तीन तासांत सत्तर रुपये कमावले . समोरचा पत्तेवाला जाम चिडला होता . पुन्हा पुन्हा पान न्याहाळून बगत होता . त्याला काय समजत नव्हतं . तो पैसे हरत होता . त्यो एकेरीवर येऊन ‘ ह्या राजाची आई झवली हे गाड्यालाच कसं फळतंया ! ‘ म्हणून तणतणत होता . त्यानं मधेच खेळ थांबवला आन् नवी पानं काढली . नवी पानं काढल्यावर मी खेळायचा थांबलो . मी खेळायचा थांबलो , तसं पाच – सात जण एकदम जमली ! ‘ ए आयझव्या का रं , ए भेंच्चोता , म्हनत मवाली म्होरं आले , तसं टरकलो . झक मारली आन् खेळलो असं झालं . एक – एक जण म्होरं म्होरं सरत आले … मला कुठं पळावं , त्ये काय समजेना . ते म्हणत होते , ‘ खेळ ‘ . आन् मी न्हाई ‘ म्हणत होतो . मी खेळत न्हाय म्हटल्यावर सानकन् एक थोबाडात बसली . दात ओठात घुसला आन् तोंडात रक्ताची धार लागली . मी प्रतिकार करू शकत नव्हतो . ते दोघे – चौघे होते आन् मी एकटा . पोटात , पाठीत , घावंल तिथं हानत होते . मी ओरडत होतो . माणसांची गर्दी वाढाय लागली . काय झालं – काय झालं म्हणून मानसं जमायला लागली तसं गर्दीत ते लोक दिसेनासे झाले . खिशातले सारे पैसे तर गेलेच होते . वर पोटभर मार खाल्ला होता . तोंडाचं रक्त हातानं पुसत पानवाल्याच्या दुकानातनं वह्या घेत पोलिस यायच्या आत पसार झालो . चांगली हाडं शेकून निगाली होती . सारं अंग दूक भरल्यागत ठणकत होतं . येडी झवली , हाक ना बोंब . सारं गप्प बसून सोसलं . त्यात दोन दिवस काम आन् शाळा , दोन्ही बोंबलली .
दहावीची परीक्षा झाली . शाळेला सुटी लागली . तसं बा फलटणातनं घरी येऊन गेला . आता सीझन संपस्तंवर वाजिंत्र्या . आता गावात करमत नव्हतं . चार – दोन दिवसातनं फलटण होतंच. पेपराचं काम सोडलं होतं…
क्रमशः
स्रोत:(पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या उपरा कादंबरीतुन)
