उपरा,लक्ष्मण माने..
मधेच कुरवलीची जत्रा , बकरी कापणं , टांगणं , अंगात येणं , लोटांगण सारं झालं . त्या वर्षी एक असंच खटलं आलं होतं . कैकाड्याच्या उफाड्याच्या पोरीनं वडारी ठिवला होता . ती नवऱ्याकडं नांदत नव्हती . आतापातुर चार – पाच वेळा पोटचं पाडलं होतं . आन् आता ती गरवार होती . नवरा जातीला सांगत होता , ‘
ही शिंदळ हाय … हे माझ्या पोटचं न्हाय . हिला मी सोडतुया . काडीमोड द्या ! ‘ झालं , साक्षी – पुरावं , कै , जमीन – सारं त्याच गतीनं झालं . दोगांच्या कडनं तिदळकी ११२ काढली होतीच . दारूचं फुगं फुटलं होतं . बाईला न्याय द्यायचा , का बाबाला न्याय द्यायचा . एकजण म्हणला ,
‘ लेका , तुझ्या अंगात पाणी न्हाय , मग म्हस दुसऱ्याच्या पानवट्यावर पाणी प्याली , तर का झालं , रं ? दुसरी तुझ्याजवळ नांदल कशी ?
‘ असं बोलल्यावर नागानं डंक मारावा , तसं त्यो उसासला आन् त्याला म्हणला ,
‘ आरं , तुझी बाईल हितं पंचात आन . तिला हितंच गाबन करतु का न्हाय , ते बग !
‘ झालं , दोगांची छनाछन्नी झाली . आता मारामारी होणार , म्हणून सारी जमात पळाली . पोरंसोरं वेंगारली . आयाबाया पळाल्या . आन् पंचांनी मिटवामिटव केली .
पंचांनी त्या बाईला बाहीर टाकली . तिच्या नवऱ्याला काडीमोड दिली . थळभरणी घेतली आन् दुसरं लगीन करायला परवानगी दिली . ती बाई सारकं रडत होती . तिच्या डोळ्यांचं पाणी पुराच्या लोटावाणी वाहात होतं . सारी तिच्याकडं बगून हसत होती . आन् ती गाबन गाय पोराच्या बापाचा पत्ता शोधायला रानोमाळ हिंडत होती . म्होरं तिच्या डोक्यावर परिणाम झाला . नवऱ्यानं सारं बनवाबनवीनं पंचान्ला दारू पाजून घडवलं होतं . त्यानंच वडाराची बाई रांड ठेवली होती . त्या बाईला जे वेड लागलं , ते कायमचं . ती बाळंत झाली , पण पोराचं काय झालं , कुणास ठावं ?
कुरवलीची जत्रा उरकून बिराडं फलटणला आली . शांती चित्रमंदिराच्या म्होरं बिहाडं उतरली . चुली पेटल्या . आपुन ह्या बिराडावर थांबलो तर शाळेतलं कुणी बगल आणि आपली चेष्टा पोरं करतील , अपमान होईल , ह्या धास्तीनं मी आन् दत्त्या , कैकाड्याचा इठल्या बिराड सोडून गावात निगालो . वेळ रात्रीची साडेनऊची असंल . शांती चित्रमंदिराच्या म्होरनं मधनंच एस.टी. स्टँडला रस्ता जातो . त्या रस्त्यानं जवळ पडतं म्हणून आमी अंधारातनं निघालो होतो . एस.टी. स्टँडच्या मागच्या बाजूला घडसुलीची झोपडपट्टी हाय . आमी अंधारातनं शिगरेटी वडत निगालो होतो . जत्रंतल्या गमतीजमती एकमेकाला सांगत शिगरेटीचे झुरके घेत निगालो होतो . तेवढ्यात अंधारातनं एक मध्यम वयाची बाई म्होरं आली , ए पोरांनो ! ‘ म्हणून हाक मारली . आमी उभं राहिलो.इठल्यानं तिला काय म्हणून इचारलं तसं … पावडर तोंडाला फासून , पान खाऊन तोंड लालभडक झाल्याली बाई म्हणती कसं , ‘
आरं बोंडुल्यांनू बसायचं का ?
‘ आमाला कायच समजेना . मी म्हणालो ,
‘ कुठं ? ‘
‘ या माझ्या मागं . ‘ ती म्हणाली .
आमी दोगांनी एकमेकांना खुनीवलं . आन् काय भानगड हाय ते बगू , म्हणून तिच्या मागनं निगालो , चार – पाच झोपड्या वल्यांडल्या .
‘ गटारात पाय पडला , तर सारं हातरून नासवाल ‘ म्हणत तिनं कोपीचं दार ढकललं .
आत रॉकेलची चिमणी ढणढणत होती . खाली पोतं हातारलं होतं . त्याच्यावर चादर टाकली होती . एका कोपऱ्यात चहाचं रिकामं भांडं . मोडका कप आन् च्या गाळायचं फडकं पडलं होतं . आमी दारातच उभं राहिल्यालो , काय करावं समजत नव्हतं . ही काय म्हणती , ते नीटसं कळत नव्हतं . आदी इठल्या आत गेला . त्याच्यामागं मागं मी आत गेलो . बाई सफाईनं बोलत होती . ती काय बोलत होती , ते समजावं , म्हणून मी म्होरं झालो . ती उठली आन् दार लावाय लागली तसं माझ्या काळजानं ठाव सोडला . ह्याच्या आईला . ही काहीतरी बिलामत दिसतीया , म्हणून उठाय लागलो . इठल्याला चिमटा घेतला … चल , म्हणून . तिनं निवांत दार दाबलं आन् इठल्याकडं बगून म्हणाली ,
‘ आरं , किती पैसं हायती जवळ ? बोलाल , का न्हाय … नुसतं बगायचं का बसायचं ?
आतामातर आपल्या अंगात थंडी वाजल्यावाणी व्हायला लागली . इठल्या म्हणाला ,
‘ कशाला पैसं ?
” तसं ती म्हणाली ,
“ फुकाटचं बसायचं आसतंया व्हय रं , शेमन्या ?
” इठल्या काय ऐकना … मला तर मुतायला आलं होतं . आयला , हितं कायतरी भानगड हाय . इठल्याला मी खुनीवला , तसं ती ,
“ ए , आरं बस खाली . पान खा , शिगरेट वड . आसं मूत हातात धरून काय आलायास ? ” म्हणत पचकन थुकली .
मी गप्प झालो . इठल्याकडं बारा आणे होते . माझ्याकडे पैसे नव्हते .
‘ पाच रुपये लागत्यात बसायला आन् बारा आण्यात काय होतं ? ‘ म्हणत तिनं बारा आणे घेतले .
बाई इतक्या सरावानं फाजील बोलत होती , की इचारायची सोय न्हाय . इठल्याचं खिसं बघितलं आन् मला म्हणाली ,
” तुझ्याकडं किती पैसं हायती रं , कांड्या ?
” मी खिशात हात घातल्यावाणी केला . आपल्याकडं पैसं न्हाईत , म्हणून उठलो . तशी ती गरजली ,
” बींदाड्या , नुसतं फुकटात भाजी मिळत न्हाय , आन् भाडू आलाय घासायला . उठ उठ ! ” म्हणत धावून आली .
मी इतका गोंदळलो होतो , की माझं मलाच समजलं नाही . धूम पळत स्टँडवर आलो . इठल्या पाच मिनिटांत मागनं चालत आला . मनातनं त्याला शिव्या देत होतो , पण ती बाई काय म्हणत होती , हे इठल्याला माहीत असंल , म्हणून तो येस्तोर उभा राहिलो . त्यो आला त्यो हसतच . ‘ आयला , ही काय भानगड हाय … ह्यो रांडचा हासतुया आन् मला तिनं हुसकावलं . जे काय सांगायचं , ते त्यालाच सांगतीया . ‘ मनात उत्सुकता होती . त्यो आला , तसं त्याला दोन -चार शिव्या हासडल्या . त्यो जाम हसत होता . त्यानं पानं घेतली , दोगांनी पानं खाल्ली . स्टँड रिकामा झाला होता . एका बाकड्यावर जाऊन बसलो . मी त्याला काय झालं म्हणत इचारलं . तसा त्यो फिदीफिदी हसाय लागला .
‘ आयला , तू इतका शिकलायास , पर तुला आकाल काय आली न्हाय . आरं , आठ आण्यांतसुद्धा भागतंय .
‘ माझी उत्सुकता आणखीन ताणीत त्यो म्हणला ,
‘ आणखी चार आणे असतं , तर मी बसूनच आलो असतो .
‘ आता ही बसण्याची भानगड काय हाय , तेमातर मला समजत नव्हतं . तसा इठल्या माझ्याहून लहान . दिसायला अगदी गरीब … त्याला माहीत हाय , आन् आपल्याला न्हाय , याचं वाईट वाटत होतं . मी गप्प झाल्यावर त्यो म्हणला ,
‘ आरं , तू गेलास पळून आन् तिनं मला दाकिवली सरकस .
‘ आता ह्याच्या आईचं ! आरं , कोड्यात काय बोलतुयास ? त्या कोपटात तुला सरकस कशी दिसली ? ‘ मला काय कोडं उलगडत नव्हतं .
तसं आनखीन हसत , माझ्या फिरक्या घेत त्यो मुद्दाच काय सागंना , तवा ‘ च्या आयला ! जाऊ दे तिकडं ! ‘ म्हणत मी उठलो .
तसं त्यो म्हणला ,
‘ बरं , बस सांगतो . आरं , तू भाईर गेल्यावर तिनं लुगडं फेकलं . मला बग म्हणली . मी बगितलं आन् झालं . बारा आण्यात येवढीच मजा . रुपया असता , तर फुडचं .
‘ आता मला टूब लागल्यागत झालं . खिनभर आपली संधी गेल्यागत वाटलं . पण पुन्हा पुन्हा तो जे वर्णन सांगत होता … त्यानं किळस आली . रातच्या बारा वाजस्तंवर त्यानं पोरीच्या भानगडी सांगितल्या आन् पैसं देऊन असं चालतं , हे पहिल्यांदाच समजलं .
मनात आलं … त्येच्या आईला , आपुन खरंच गाढव हाय . आपुन आपल्या वर्गातल्या आपल्या आवडत्या पोरीलाच पत्र लिहित बसलोय . पण ह्योजवळचा रस्ता काय आपल्याला उमाजला न्हाय .
आता तिला किती पैसं घेती , ते इचारावं , असा इचार करीत बिराडावर आलो . पण उभ्या हयातीत ती एकदाच बोलली . बोलली , तवा तिच्या बाची बदली दुसरीकडं कुठं झाली होती ! ती साऱ्या वर्गातल्या मुलांना सांगत होती , साऱ्यांचा निरोप घेत होती . आपुनबी त्यातंच एक ! ती बोलली , ‘ जाते ‘ म्हणाली . क्षणभर रड कोसळंल , असं वाटत होतं . पण मनाची समजूत घातली … शिंक्यावर दही आन् दैवात न्हाई , त्याला आपुन तरी काय करणार ?
उन्हाळ्याची सारी सुट्टी लग्न वाजीवण्यात गेली . दहावीचा रिझल्ट लागला . पास झालो . आता अकरावीला गेलो , म्हणजे आपुन फार मोठे झालो . आता आपण कॉलेजला जाणार , म्हणत खुशीत होतो . सोमंथळीतल्या मारुतीला पेढे वाटले . काळुबाईला जाऊन पेढे वाटून आलो . घरात साऱ्यांना आनंद झाला होता . आईनं तर सारं घर डोक्यावर घेतलं होतं . ज्याला – त्याला मी पास झालो ह्याशिवाय चार – आठ दिवस ती दुसरं काय बोलतच नव्हती .
वराड निघालं , तवा बराच येळ झाला होता . बायकापोरांचा कालवा चालला होता . समदा गाव लग्नाला निगाला होता . एकशेएक गाडी वराड निगालं . बैलगाड्या सजीवल्याल्या . बैल रंगवून झुली घातलेल्या . गाडीच्या तट्याला नोटांचं हार घातलेले . बरग्यांचं लगीन मंजी साऱ्या गावाला उरूस झाल्याला , बर्गे लई बडी असामी . गावात पैल्यांदा ट्रॅक्टर घेतला त्यो बानं . दरसाल कारखान्यात समद्यात जास्त ऊस बर्यांचाच . पाच – पन्नास माणसांचा राबता . अन् थोरल्या बर्यांच्या पोरीचं लगीन ! साऱ्या गावाला आवतन . पोरीची साखर चिर्डी झाली , तीच गावजेवन घालून . सारा गाव लाडवाचं जेवण जेवल्याला . नुसता कासार बांगड्या भरत होता दोन दिस . म्हारा – मांगापास्नं मुसलमानापातुर साऱ्यांच्या बाया – पोरीन्ला साखरपुड्याला बांगड्या भरलेल्या . साखरपुड्यादिवशी नुसता साखरंचा च्या दिसभर चालला होता . किती माणूस जेवलं , त्याला गणितच नव्हतं ! मोठ्या थाटात साखरपुडा झाला होता . गोरगरिबांची चार – पाच लग्नं तेवढ्यात झाली असती . इवाईबी तसाच तोलामोलाचा होता . गावातली माणसं मुलाच्या टिळ्याला गेली होती , तर दोन टायल्या करून . साऱ्यान्ला इवायानं टोप्या आन् टॉवेल दिले होते . त्याच्या टिळ्याच्या खर्चातबी चार – पाच गरिबांची लग्नं झाली असती . लई सुखी घरात पोरगी जाणार , म्हणत सारा गाव आनंदात होता आन् म्हणूनच एकशेएक गाडी वराड निघालं होतं . आमचा गावातला बाजा म्हणून आमाला सुपारी दिलेली . फलटणच्या पटाणाचा बाजा होताच . आन् बारामतीचा झाऱ्याचा बाज्याबी होता . तीन बाजे नवरीच्या मालकानं लावल्यालं .
वाजतगाजत , गुलाल उधळीत वराड निघालं . शिवंवर नाऱ्याळ , लिंबं टाकली . आनि वराड गावाबाहेर निघस्तंवर वाजीवलं . आमाला एका गाडीत जागा दिली . आमी दहा – बारा जण दाटीदाटीनं गाडीत बसलो . आन् वराड निघालं कांबळीसराला . कांबळीसरापातूर लागत्याल तेवढ्या गावात आमी वाजवीत होतो . शीव आली की वराडावरनं नारळ उतरून टाकीत होते . लिंबं टाकीत होते . झाडून सारं गाव वराडात निघालं होतं .
गाडीवाल्यांनी आपली आपली बैलं सजीवल्याली . तरण्या बाया ज्या गाडीत बसलेल्या असायच्या त्या गाडीवानान्ला लई चेव यायचा . आपली गाडी म्होरं गेली पायजे , म्हणून परतेक जण बैलाच्या शेपटी दामटायचा . आसुडाचं पोत्यरं व्हायचं. आन् गाड्या धुरळा उडवीत धडधडत वाऱ्यावाणी सुटायच्या. मदीच एकांद्या गाडीचा बैल बसायचा , न्हायतर एकाद्याची खिळ निसटायची .
असं करीत करीत वराड एकदाचं कांबळीसरात कडुसं पडताना पोचलं . वराड वाजवीत गावातनं नेत होतो . गावात वराड जाताना जत्रंला माणसं जमावीत, तसं माणूस जमल्यालं!
गावात एका मोठ्या वाड्यात जानवसा दिला होता. हळदी लागायला पहाट उजाडली . डोळं चुरचुरत होतं . ढोल बडवून बडवून हाताचं बावकं दुकून आलं होतं , तरी हळदीच्या बाया काय संपत नव्हत्या. हरभऱ्याच्या घुगऱ्या आन् एक – एक पैसा जमून बाच्या धोतराचा सोगा गच्च भरला होता.
फटफटीत झालं . नवी हळद झाली . नवऱ्याची हळद त्याच्या घरी लागली होती .
नवरीची हळद जानवसघरी लागली होती. लग्नाचा दिस उजाडला . धावपळ चालूच होती . पाच – दहा गावची माणसं लग्नाला आल्याली . मानाचा पावना आला की, ‘ आरं, बँडवालं कुठं गेलं ? ‘ म्हणून पुकारा व्हायचा. आमी पळत जायचो आन् पावण्याला वाजवीत आणायचो. बड्याचं लगीन, सारी पुढारी मंडळी आल्याली. लगीनघरी भला मोठा कमानी मांडव घातलेला, मांडव नुसता नजर लागावी असा सजविलेला. सकाळपास्नं स्पीकर चालू झालेला, नवरा मुलगा बराच शिकलेला. गोरागोमटा . त्यात भारी कापडं अंगावर. राजबिंडा दिसत होता. मांडवात मानूस मावत नव्हतं. सकाळपास्नं पंगती सुरू झालेल्या . कित्येक…
क्रमशः
स्रोत:(पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या उपरा कदंबरीतून)
