उपरा,लक्ष्मण माने.(भाग २३)

उपरा,लक्ष्मण माने..

हजार माणसं जेवून उठली होती . तरणी पोरं हालून वाढण्याचं काम खुशीनं करीत होती . मधीच जरा तुटाक बसून आमी जेवलो .

वेळ दुपारची असंल . आमी नवरी मुलीला गडांगणाला २१ नेली होती . पाच – पन्नास कुरवल्या , कुरवळं अशी शे – दीडशे माणसं गडांगणाला गेलेली . मुलाला बी त्याच्या बँडवाल्यांनी वाजवीत आणलं होतं . नवऱ्याकडच्या , नवरीकडच्या तरण्या पोरींची चेष्टामस्करी चालली होती . थोरला बरगा आन् त्याच्या भावांची धावपळ चालली होती . गडांगणाच्या जागी नवरदेवाकडच्या त्याच्या दोस्तांनी फोटो काढायला कॅमीरा आणला होता . नवरा – नवरीचा फोटो काढायची इच्छा त्यांनी सांगितली असावी . नवऱ्याचा भाऊ नवरीच्या भावाला म्हणाला , ‘ बर्गे , नवरदेव फोटो काढायचाच म्हणतुया . जरा नवरी मुलगी झोपाळ्यावर बसवा . झोपाळ्यावर बसून फोटू काढायचाय .

‘ बर्गा बगतच राहिला . त्यो म्हणला ,

‘ पावणं , अहो लगीन अजून लागल्यालं न्हाय . तवरच फोटूचं काय धिवून बसलाय ? लगीन लागू दे , मग पायजे तवढं फुटू काढा म्हणावं !

‘ झालं ! नवरदेवापतुर ही गोष्ट गेली आन् नवरदेव चिडला , ‘ आयला फोटो आताच काढायचा ! ‘ नवरदेव ताटून बसला . झालं . सारीकडं एकच चर्चा सुरू झाली . थोरला बर्गा जरा शांत माणूस , त्यानं नवरदेवाला समजाविण्याचा प्रयत्न केला ,

‘ जावाय , आपल्यात लगीन लावल्याबिगार नवरा – नवरी एकत्र येत न्हाईत . तवा फुटू लगीन लावल्यावर काडा , पायजीतर बारामतीस्नं आमी फुटू काढणारी माणसं टायलीभर आणतो . पर आता हट्ट धरून बसू नगा . ,

नवरदेव म्हणाला ,

‘ मामा , लगीन लावल्यावर फुटू काढाय तुमी कशाला सांगता ? मंग तर फुटू काढूच ! लगीन झालं नसलं तर काय बिगाडलं ? लगीन तर व्हईलच . लग्नाच्या आधी फुटू काढला , तर काय बिगाडलं ?

‘ नजरेला नजर लावून जावयानं चार मानसांत आपलं ऐकलं न्हाय . ह्याचा कायतरी डाव दिसतोय , असं वाटून बर्गा पेटला .

‘ आयला ! हाळद लागली , म्हंजी का ह्याची बायकू झाली की काय ? ‘ बर्गा म्हणाला ,

‘ पावनं , आमच्यात लगनाच्या आधी फुटू काढायची रीत न्हाय . आमी फुटू काढू देणार न्हाय .

‘ नवरदेवपण पेटला . त्यो म्हणाला ,

‘ मामा , फुटू काढत न्हाय , तर हे लगीनबी होणार न्हाय , मी हाळद लावली तवाच लगीन झालं .

‘झालं . दोगा सासरा – जावयांची जुंपली . बाकी शेल्या ठकुऱ्याची मानसं बोलाय लागली आन् वावटलीवाणी हे फुटूचं लफडंसाऱ्या गावात आन् वराडात झालं . आबरूचं खोबरं झालं म्हनून बर्गा चिडलेला तर पावण्यानी ‘ आमच्या गावात येऊन आमचा अपमान केला ‘ , म्हणून लगीनघरची मंडळी हातघाईवर आलेली . शानीसुनी मानसं , पुढारी मंडळी मिटवामिटवी करीत होती . पन मानापमानाचा वणवा भडाकलेला . सारीच नशा चढल्यावाणी हातघाईवर आलेली . नवरदेवाच्या बाचा शांत स्वभाव , भडकून त्योबी , ‘ ह्यांच्या आईला घोडा लावला ह्यांच्या ! आसल्या चालीची आसत्याल , हे माहीत नव्हतं . ही बर्गाची माणसं म्हारामांगावानी कलागतीला आल्याती . फुटू काढू दिला , तर लगीन लागंल , न्हाईतर जा म्हणावं आई घालीत मागारी ! आशा छपन्न रांडा जमा करून आणीन , म्हणावं . शिर सलामत , तर पगडी पचास , तोटा न्हाय ! ‘ म्हणू लागला .

वराडी मंडळीबी काय कमी नव्हती . त्याच गावच्या बोरी आन् त्याच गावच्या बाभळी . आता कलागत होणार आन् शे – पाचशे डोस्की फुटणार , अशी येळ आलेली . दोनी बाजूची पोरं कानात वारं शिरावं , तशी वाऱ्यावर सवार झाल्याली . लागली म्हणता म्हणता कलागतीनं पेट घेतला . तसं वराडी मंडळींना भान आलं . सारी वराडाकडं पळत सुटली . ‘ आयला ? दुसऱ्याच्या म्हातारीसाठी आपुन का म्हन मिशा उतरवा ? ‘ म्हणून बचावात्मक पवित्रा घेऊन तर लोकाच्या गावात रगात सांडल , म्हणून धूम पळत जानवस घर गाठलं . पोरं आन् बायांचा नुसता कालवा झालेला . दिसंल त्ये माणूस गाडीत घाल आन् गाडी पळव , असं करीत करीत तिकडं भांडणांचा आवाज शिगंला पोचत होता आन् हिकडं वराडातल्या गाड्या तशाच झपाट्यानं मागारी सुटल्या व्हत्या . नवरीच्या चुलत भावानं रागरंग बगितला , नवरीला गाडीत घातली आन् गाडी वाऱ्यागत सांगवीकडे धुमाट पळाली . मारामारी होणार म्हणून बानं मला आन् इठल्याला आधीच व – हाडघरी पाठवलेलं . भांडणात आपल्या माणसांना लागू न्हाय म्हणून आमचा जीव खालीवर होत होता . बगता बगता बायामान्सांना गाड्यांत घालून गाड्या गेलेल्या . तवर मानसांची पळापळ इतकी वाढली की , कोण कुणाला मारतंय समजत नव्हतं . बा , दत्तू , आप्पा , तात्या सारी वाजवायची सनगं काकत घालून पळत आले . बरेच घाबरले होते .

‘ अल ख्वांड्यगा अल यालगो ” (आरं, मारून टाकला. चला, पळा !)

म्हणत आमी सारी बाजेवाली पळायला लागलो. मागं गावात एवढा कालवा झाला होता , की पुसाय नगं.

मिळंल त्या पायवाटनं आमी सोमथली गाठली. तवा रात बरीच झाली होती .

दुसऱ्या दिवशी सकाळी बर्याच्या घराम्होरं सुतकी चेहऱ्यानं माणसं जमली होती . चार – दोगान्ला दवाखान्यात नेलं होतं . त्यात बर्याच्या भावकीतली बरीच पोरं व्हती . लगनाचं इगीन झालं होतं . आता पोरीचं काय करायचं ? बाम्होरं मोठं कोडं पडलं होतं . पैका खूप होता . पण आता पैक्याचा उपेग काय होता ? पांढऱ्या कापडावर डाग पडावा तसा पोरीच्या काळजावर डाग पडलेला . त्याला काय करायचं ? तिनं जेवन – खान टाकलं होतं . पोरगी खचून गेली होती. पायावर पाय दुसरा उभा करणं येवढंच करावं लागणार, न्हाईतर तोंडाला डांबर पुसून घ्यायची पाळी येणार. बा मोठ्या काळजीत पडला होता . लालीला दुक झालं आन् चुळून चुळून लाल केलं . फुटू काढला असता तर … पण ते शक्य नव्हतं . आन् आता पोरीला दुसरा घरुबा मिळणंबी सोपं नव्हतं. लगीन लागलं न्हाय हे खरं, पण हळद तर लागली होतीच की ! सारी माणसं बर्याच्या वाड्याम्होरं जमून गप्प बसून राहात .

दिवस उलटायला लागलं. पण रत्ना काही घरातून बाहेर दिसंना. तिनं हातरून धरलेलं.लई जबर घाव बसल्याला.

गावाचा गावगाडा पुन्हा सुरू झाला . बर्याच्या घरात मातर भयाण शांतता होती. रोजची कामं संपून दिवस बुडत होता. पण बर्याच्या रत्नाचं लगीन काय जमत नव्हतं . तोळ्यांची आन् नोटांची हुंड्यात लई लालूच दाखिवली, पण काय उपेग हुईना, बर्या दिसन् दिस खचाय लागला . अब्रूचा तमाशा आपल्या डोळ्यानं बगत होता. त्यात पोरगी सुकाय लागल्याली . पांढऱ्या पायाची म्हणून आयाबाया बोलायच्या . भवल्यावर रंडकी झाली असती , तरी परवाडलं असतं . निदान त्याच्या नावानं दिस काढलं असतं, पन हे कुमारी रांडावपण कसं होनार, म्हणून बायाबापड्या बोलायच्या. मधीच कवातरी बा सांगायचा,

‘ पाटलाची रत्ना वरडत उठतीया .

‘ मदीच सांगायचा ,

‘ ती बग त्येच्याकडं बगून हासतीया . आंगावर कापडं ठिवंना झालीया . तिला झटकं येत्यात . पाटील लई खचलाय . पाटलीनबी जेवत न्हाय की पईल्यावाणी घडाघडा बोलत न्हाय . न्हाइतर पाटलाचा वाडा म्हंजी खळाळता वाडा . पर ह्या पोरीच्या लग्नाच्या भानगडीपास्नं नुसता सुतकात ऱ्हातुया .

मी हायस्कूलला फलटणात असायचो . दरवर्षी पावनं बगायला यायचे आन् जायचे . लगीन सराया यायच्या आन् जायच्या . पण रत्नाचं लगीन काय जमत नव्हतं . पाटलाच्या घरचा लोकांचा राबताबी कमी झाला होता . आन् गाड्याबी कमी झाल्या होत्या .

एकदा ऐतवारच्या बाजाराला आई आली होती . तिचा चेहरा पडला होता . मी राहात होतो , त्या खोलीवर आली होती . मी इकडचं – तिकडचं बोलत होतो . निगता – निगता विषय निगाला .

आई सांगत व्हती,

‘ पाटलाच्या रत्नाला लईच झालं म्हणं. सकीरवारी पुन्याला नेहली हुती पेशल टेक्सी करून . पर उपेग झाला न्हाय, काल तिचं मडं तसंच पेशल टेक्सीत आनलं. नुसता हाडांचा सापळा राहिला व्हता . समदं गाव जमलं हुतं. लई मानसं रडली . पोरगी लई गुनाची हुती .

आई बगता बगता रडाय लागली . तिनं वाढलेलं शिळंपाकं , दिलेल्या मिरच्या आन् गवारी आन् कायबाय सांगत होती . जनू घरचं मानूस गेलं असावं , तसा तिचा ऊर भरून आला होता . मलाबी रडायला आलं होतं . आमीबी लांबनं लांबनं पण तिला खेळताना बगितलं होतंच . पण तिच्याबर लगीन कुणीच का केलं न्हाय ? आपल्यात तर एक – एक बाय कितीबी नवरं करती . एका नवऱ्यानं सोडून दिली , तरी ती पुन्हा दुसऱ्या नवऱ्यास्नं उठून पयल्या नवऱ्याकडं नांदती , हे कसं ?

आई म्हणत होती .

‘ आपुन बिनभिकार . आपल्यात चालतंय . त्यांच्यात चालत न्हाय . बाबा , बाय म्हंजी काचंचं भांडं !

एका तिथीला लई लग्नांची गर्दी होती . पण बानं एकच सुपारी घेतली होती . सामन्याला सुरवडीचा बाजा होता . रेसल सारकी चालू होती . साकरवाडीला लग्न होतं . शहरात वाजवायचं तर चार – पाच तरी गाणी बसली पाहिजेत . म्हणून रातदिस रेसल चालू होती . गावातली माणसं कोकलत होती .

‘ लेकांनो , मानसान्ला झोप तरी लागू द्या . सारकं भो – भो – काय करताय ? डोस्कं नुसतं उठतंय …

‘ कुणीकुणी येऊन ऐकतबी बसायची .

झालं , साकरवाडीला वाजवायला गेलो . सारं लगीन वाजवत आनलं . मी ठेक्यात ढोल पिटत होतो . धुंद होत होतो . सिनेमातली गानी वाजवायची . नवरा वरदाव्याला घेऊन गावात आलो . मारुतीच्या देवळाम्होरं नवरदेव पोशाख करीत होता . गाणं रंगात आलं होतं . वाजिवता वाजिवता माझी नजर समोरच्या माडीकडं गेली . आन् तालाचा ठेका चुकला . सारं लक्ष माडीवर होतं . तीच मुलगी होती . जी तिच्या वडलांच्या बदलीमुळं फलटण सोडून गेली होती . माझं वाजिवण्यावरचं सारं लक्ष उडालं . ठेका चुकाय लागला . समोर दुसरी पार्टी होती . मी चुकलो . बा शेजारीच पडघम वाजवीत होता . इतक्या मानसांत बानं बसायच्या जाग्यावर लात घातली . आन् ‘ काय वाजिवतूयस ? ‘ म्हणत दुसरी उगारली . तंवर आप्पानं बाला गप्प केलं . माझा पुरा नक्शा उतारला होता . ती माडीवर फिदी फिदी हसत होती आन् मी भानावर येऊन वाजवीत होतो.

गाणं संपलं . बा नुसता इंगळागत तापला होता . ध्यान कुठं असतं , आता वरातीत तरी ‘ आई नीट घाला ‘ म्हणत होता . मी पुरता ओशाळलो होतो .

अन् वरातीत मान खाली घालून नवरदेव मांडवात आणला .

सांचं वरातीत खूप चांगलं वाजिवलं . समोरच्या बाजेवाल्यानं पाट थोपाटली . बाच्या अंगावर मूठभर मांस चढलं . डोळं भिरभिरत होतं . पण आपलं कुणीच आलं नव्हतं .

अकरावीच्या वर्गात अडचणी काहीच नव्हत्या . दहावीला गणित – इंग्रजीला दांडी मारली होतीच . आन् इंग्रजीशिवाय मॅट्रिकला कोण इचारणार ? आता समज चांगली आली होती . आता आई – बाला अहो – जाहो करीत बोलावीत होतो . भाषेत खूप फरक पडला होता , इंग्रजी घेऊन अकरावीला बसलो . अर्थात , सोपे विषय घेण्याकडं नेहमीच कल राहिला . गणितानं उभा दावा मांडलेला . त्याला सोडचिठी दिली . पेपर विकीत , कऱ्यांच्या हॉटेलात कपबश्या धूत , बटर विकत अन् मुख्य म्हणजे नारायणच्या संगतीत , रामदासच्या संगतीनं मॅट्रिकचं वर्ष संपवत आणलं . मॅट्रिकची परीक्षा संपली . पुन्हा बँड होताच . जून महिन्यात निकाल लागला आणि नारायण फक्त पास झाला . बाकी आमच्या मित्र कंपनीतलं कुणीच पास झालं नाही . नेहमीप्रमाणं इंग्रजीनं बहिष्कार टाकला होता . बाकीचे विषय सुटले , तरी इंग्रजीचं काय ?

आता घरात बानं सांगितलं ,

‘ येवढं सहा महिनं काढा..इंग्रजी का काय ते नीट ध्यान दिऊन शिका आन् लगीन करून मार्गाला लागा . बास झाला आता धुळीत दिवा !

‘ मुकाट्यानं ऐकत होतो , आतापर्यंत जसं रेटत गेलो , तसंच रेटत जावं लागेल … मनात पक्कं ठरवलं . इंग्रजीची शिकवणी लावली .

नारायणला कोल्हापूरला शेतकी कॉलेजला प्रवेश मिळाला होता . आम्ही सारे तसे दुःखात होतो , पण नारायणला प्रवेश मिळाला . सगळ्यांना आनंद झाला होता . नारायण म्हणाला , ‘

तुम्हा सर्वांना सोडून जावं , असं वाटत नाही , पण गेलं पाहिजे . घरच्यांचा फार आग्रह आहे . आणि तुम्ही सगळे ऑक्टोबरला पास व्हा . कोल्हापूरला या . मग आपण पुन्हा एका कॉलेजला नसलो , तरी एका खोलीत राहू शकू .

‘ माझ्या मदतीचा हात आखडला म्हणून मलातर फारच वाईट वाटत होतं . तो जाणार , त्याच्या आदल्या दिवशी तो सोमंथलीला आला होता . जेवण केलं आणि वडलांना म्हणाला,

‘ भाऊ , तुम्ही काळजी करू नका . चार वर्ष आम्ही त्याला सांभाळला , त्याला शिकू द्या . मी कोल्हापूरला गेलो , तरी बाकीची पोरं हिथंच हायती . मी त्यांना सांगतो . आन् ह्याला फुडल्या वर्षी कोल्हापूरला नेतो .

‘ आई – बा त्याला फार मानत असत . बानं मान हलवली … त्याला बाजूला नेला आणि सांगितलं …

‘त्यो सिकू दे , त्याला आमी न्हाई म्हनत न्हाई , पर त्यानं लगीन करू दे…

क्रमशः
स्रोत:(पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या उपरा कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading